28 February, 2017

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानअंतर्गत बचत गटाचा कार्यक्रम संपन्न
हिंगोली,दि.28: नगरपरिषद वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपमुख्याधिकारी मुजीब खान, कार्यालयीन अधिक्षक शाळ माळवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना विविध वार्डात दि. 15, 17, 18 व 25 फेब्रुवारी, 2017 रोजी प्रशिक्षण देण्यात आले.
सदरील सर्व प्रशिक्षणात राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बचत गट संकल्पना, वस्तीस्तर संघ, शहरस्तर संघाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन अभियानाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी संघरत्न नरवाडे व समुदाय संघटक सौ. निर्मला ताटेवार यांनी केले.
त्याचबरोबर सदरील सर्व प्रशिक्षणात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत नगर परिषद अभियंता सनोबर तसनीम, एम. एम. बळवंते, अविनाश चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. ज्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, शौचालय बांधकामाचे तांत्रिक मार्गदर्शन, उघड्यावर शौच विधीस गेल्याने त्यांचा आरोग्यावर होणारा अनिष्ट परिणाम सांगून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कुटूंबाने घेऊन शौचालय बांधकाम व त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला बचत गटातील सदस्यांनी स्वत: शौचालय बांधून वार्डातील इतर महिलांनी शौचालय बांधून वापर करण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सौ. रेखा म्यानेवारताई, एल.आय.सी. चे विकास अधिकारी श्री. शिरपुरकर, श्री. पत्रे, कार्यालयीन अधिक्षक शाम माळवटकर, नगरपरिषद अभियंता सनोबर तसनीम, एम. एम. बळवंते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संघरत्न नरवाडे, समुदाय संघटक सौ. निर्मला ताटेवार, अजगर पटेल, रविकिरण वाघमारे, नदीम सौदागर, शेख वसीम, अविनाश गायकवाड, शेख मोबीन, शेख खयुम, अलीमोद्दीन, शेख पाशा, नगरसेविका सौ. साधनाताई पुंडगे, नगरसेवक, मोईनोद्दीन संदलजी, दिवाकर पुंडगे, नगरपरिषद, वसमतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेवक सचिन दगडू, नगरपरिषद अभियंता अविनाश चव्हाण, एम. एम. बळवंते यांचा सहभाग होता तसेच अनुसयामाता महिला बचत गट, अन्नपूर्णा, ईश्वरी, भाग्यलक्ष्मी, अष्टविनायक, चिंतामणी, मार्कन्डे, अण्णाभाऊ साठे महिला बचत गट, जयमाता, दामिनी, पुजा, करुणा, नगमा, नगीना, सुविद्या, प्रज्ञा, तिरुपती महिला बचत गट, रत्नेश्वरी, मुस्कान, वैष्णवी, संध्या, मिर्झा, साईश्रध्दा महिला बचत, श्रावणी, विघ्नहर्ता, दुर्गा, वज्रेश्वरी, श्रध्दा, दुर्गेश्वरी या महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

*****

27 February, 2017

मराठी भाषा गौरवदिन निमित्त ग्रंथप्रदर्शन
हिंगोली,दि.27: येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा दि. 27 फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मराठी भाषेवरील ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमंत नायक, श्री. देशमुख या उपस्थित विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे विवेक डावरे उपस्थित होते. त्यांनी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त वाचक/ विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व या ग्रंथालयातील ग्रंथाचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाविषयी माहिती दिली. यावेळी कार्यालयाचे श्री. पुनसे, विद्यार्थी, वाचक उपस्थित होते.

*****
महिला दिनानिमित्त महिलांचे नाव मतदार यादीत नोंदणी कार्यक्रम
हिंगोली,दि.27: मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या महिलांना लगेच ओळखपत्र वाटप होणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या मतदार यादीत 1 हजार पुरुषामागे सरासरी 896 महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने आगामी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर महिला मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे. निवडणूकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) 27 फेब्रुवारी, 2017 रोजी महिला मतदार नोंदणीचे नियोजन करावयाचे आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील बीएलओनां नमुना क्रमांक 6,7 व 8 अ चे अर्ज वाटप करण्यात येणार असून 8 मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात महिला मतदारांची संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे.
या कामी वसतिगृहातील महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट, अशासकीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागात विवाह झाल्यानंतर महिलांची नोंदणी होत नाही. अनेक वेळा महिलांकडे जन्म तारखेचा दाखला नसतो. तसेच माहेरी मतदार यादीत असलेले नाव कमी केले जात नाही. अशा कारणांमुळे महिला मतदारांची नोंदणी कमी होते. याबाबी लक्षात घेऊन निवडणूक विभाग, जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास रेशनकार्ड, लग्नपत्रिका किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे देखील नावनोंदणी करून घेणार आहेत.
तरी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व महिलांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

***** 
जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
हिंगोली,दि.27: कळमनुरी तालुक्यातील उमरा येथे जयभवानी विद्यालयात दि. 18 ते 27 फेब्रुवारी, 2017 या कालावधीपर्यंत चाललेल्या जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून शिवछत्रपती क्रीडा प्राप्त डॉ. बंकट यादव, जयभवानी विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत निरगुडे, मुख्याध्यापिका सौ. सविता निरगुडे, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी संतोष फुफाटे, अनंत जाधव उपस्थित होते.
सदरील 10 दिवस झालेल्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तत्पुर्वी श्री. पाठक यांनी प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बंकट यादव यांनी खऱ्या अर्थाने क्रीडा शिक्षक हा नेहमी मैदानात व खेळाडूच्या सहवासात असावा व काळानुरूप स्वत: मध्ये बदल करावा. श्री. निरगुडे यांनी ही विद्यार्थी म्हणजे कच्चा माल आहे याला परिपक्व करण्याची संधी आपल्या हाती आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनातून शाळेतील क्रीडा शिक्षक हा शाळेचा कणा आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत काळे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी केले.

*****
जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत  
                --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी  
हिंगोली,दि.28:- गाव आरखडे तयार करुन देण्यात यावेत. तसेच कार्यालय प्रमुखांनी शिवार फेरीचे दोन दिवसात कार्यक्रम घेण्यात यावेत. तसेच जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी निर्देश दिले.
सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र -2019 जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन 2015-2016 व 2016-2017 मधील गावाबाबत व तसेच 2017-2018 च्या नियोजबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कळमनुरी सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एन. देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) के. ए. तडवी, वसमत उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) एस.आर. भागानगरे, भुजल सर्वेखण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके, उगम ग्रा.वि.सं. अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्ह्यातील सर्व  तालुका कृषि अधिकारी , अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी आदि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थिती होती.

****   




22 February, 2017

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार

हिंगोली,दि.22:- श्री. वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेबद्दल गौरव म्हणून श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रत यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन " मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्याच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयान्वये सुचित केले आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुख यांनी सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2017 रोजी पुढील विविध उपक्रम आयोजित करुन " मराठी भाषा गौरव दिन " सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या वर्षासाठी  " संगणक व महाजालावरील मराठी  " या संकल्पनेवर भर देण्यात येत असून  यावर्षी उपक्रमांची सूची पुढील प्रमाणे राहील.

मातृभाषेची महती आणि माहिती , तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयावर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सकस साहित्याची, नव्या माहितीची, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतून राज्यभर ग्रंथप्रदर्शन / ग्रंथोत्सव / ग्रंथदिंडी आयोजित करणे, शाळा / महाविद्यालय / शासकीय व निमशासकीय कार्यालये / खाजगी संस्थांमध्ये विविध स्तरांवर मराठी भाषा , साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध प्रकारच्या स्पर्धा ( निबंध, वक्तृत्व इ.) आयोजित करणे. न्यायव्यवहार, शासन प्रशासन, प्रसार माध्यमे, केंद्र तथा राज्य शासनाची कार्यालये, इतर अशासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी होणारा मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरकरणे यांचे आयोजन , मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिध्दी देणे, आकाशवाणी व दुरदर्शनवरुन सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मराठी भाषा विषयक मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करणे, मराठी भाषा / साहित्य/ कोश वाड्:मय या विषयावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ज्ञ, विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन, प्रसारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने , चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा सादरीकरणे यांचे आयोजन, युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मीडिया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी महाजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने सादरीकरणे यांचे आयोजन . कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. कुसुमाग्रज व इतर सुप्रसिध्द थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन. दिवंगत साहित्यिकांच्या जन्मगावी /कर्मभुी ( उदा: नाशिक-कुसुमाग्रज, मालगुंड-कवी केशवसुत, खोपोली र. वा. दिघे) येथे शाळांच्या / ग्रंथालयांच्या मदतीने शाळा/ ग्रंथालय/वाचनालय येथे स्थानिक शिक्षण संस्था / महाविद्यालये यांच्यामार्फत दिवंगत साहित्यिकांचे स्मरण करुन त्यांच्या गौरवार्थ कार्यक्रमांचे आयोजन , बोली भाषावरील कार्यक्रमांचे आयोजन ( व्याख्याने , चर्चासत्रे, सादरीकरणे…इ.) शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा, म्हणी , वाक् प्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे, मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधित कार्यशाळांचे आयोजन , मराठी कविता, प्रसिध्द उतारे , मराठी भाषा विषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धांचे आयोजन, मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान किंवा परिसंवादाचे आयोजन, मराठी भाषंच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या नि:स्पृह व्यक्ती व त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना किंवा प्रकल्पांना भेट देणे.
यात सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेवून हा सोहळा पार पाडण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने शासन परिपत्रकान्वये कळविले आहे.
**** 

21 February, 2017

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश
हिंगोली,दि.21: हिंगोली जिल्ह्यातील नांमाकित निवासी शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्ह्यातील परभणी व हिंगोली सर्व अनुसूचित जमातीच्या पालकांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शांळांमध्ये सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. खालील प्रमाणे अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्यांना सदर शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत.  
याकरीता पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र एक लाखापेक्षा कमी असावे, पालक शासकीय नौकरीत नसल्याचे प्रमाणपत्र, पालकांचे जातीचे प्रमाणपत्र,  जन्माचा दाखला / शाळा शिकत असल्याचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यास सदर निवासी शाळेत प्रवेश मिळणार आहे. वरील कागदपत्रं चुकीचे अढळून आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही पालकांनी किंवा शाळांनी परस्पर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करु नये. तसे केल्यास सदर विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकस प्रकल्प कळमनुरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****


19 February, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
हिंगोली, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी  यांची उपस्थिती होती.         

*****

18 February, 2017


प्रधान सचिव शाम तागडे यांनी घेतला अल्पसंख्यांक योजनांचा आढावा
हिंगोली,दि.18:- हिंगोली दि. १८: महाराष्‍ट्र शासन अल्‍पसंख्‍यांक आयोगाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभाग़हात जिल्‍हयामध्‍ये अल्‍पसंख्‍याक विभागाचया राबविण्‍यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे,  जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नईम कुरुशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा श्रीमती दिपाली कोतवाल, हिंगोली तहसीलदार विजय अवधाने, कळमनुरी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, वसमत तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, औंढा नागनाथ तहसीलदार शाम मदनुरकर, शिक्षणाधिकारी (माध्य) दिपक चवणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी द. रा. आव्हाड तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.  

****

17 February, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी
जिल्ह्यात 73.77 टक्के मतदान

हिंगोली, दि.17: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 73.77 टक्के इतके मतदान झाले. दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार पडलेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्ह्यात 3 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार तर 3 लाख 37 हजार 555 स्त्री मतदार असे एकुण 7 लाख 15 हजार 745 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 80 हजार 787 पुरुष मतदार आणि  2 लाख 47 हजार 191 स्त्री मतदार असे एकूण 5 लाख 27 हजार 978 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 73.77 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 फेब्रुवारी, 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.

***** 

16 February, 2017

तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा प्रबोधनी चाचण्यांचे आयोजन
हिंगोली, दि. 16 :- शासनाने दि. 18 नोव्हेंबर, 1995 च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये पुणे येथे क्रीडा विद्यापीठ व 14 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुणे येथील क्रीडा संकुलात शिवछत्रपती क्रीडापीठ व राज्यामध्ये 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधनी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. या 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये दरवर्षी  8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतातील खेळ प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ स्टेट, (क्रीडा नैपुण्य चाचणी) व सरळ प्रवेश भरती प्रक्रियेव्दारे निवड करून क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2016-17 साठी शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध 11 क्रीडा प्रबोधिनीत बॅटरी ऑफ टेस्टव्दारे व सरळ प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश देण्यास मान्यता मिळाली आहे.
बॅटरी ऑफ टेस्टमध्ये 1) वजन 2) उंची, 3) 30 मीटर भरधाव धावणे, 4) 6x10 मीटर शटल रन, 5) उभी लांब उडी, 6) उभी उंच उडी, 7) मेडिसीन बॉल थ्रो, 8) लवचिकता, 9) 800 मीटर धावणे या 9 चाचण्यांचे एकुण 27 गुणांपैकी 17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2016-17 या वर्षाकरिता आयोजित करावयाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यासाठी मुला-मुलींचे वयोगट पुढीलप्रमाणे असणार आहे. 1) 14 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2003 तदनंतरची असावी, 2) 13 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2004 तदनंतरची असावी, 3) 12 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2005 तदनंतरची असावी, 4) 11 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2006 तदनंतरची असावी, 5) 10 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2007 तदनंतरची असावी, 6) 9 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2008 तदनंतरची असावी, 7) 8 वर्षे वयोगट - 1 जुलै, 2009 तदनंतरची असावी.
सन 2016-17 या वर्षाकरिता नवीन प्रवेश देण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे (बॅटरी ऑफ स्टेट) आयोजन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम प्रस्थापित करण्यात येत आहे.
क्रीडा नैपुण्य चाचण्या (बॅटरी ऑफ टेस्ट) आयोजनाचा कालबध्द कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता खालील दर्शविलेल्या दिनांक व ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
अ.क्र.
कार्यक्रमाचे स्वरुप
क्रीडा नैपुण्य चाचण्या राबविण्याचा दिनांक
तालुका
आयोजनाचे ठिकाण
1
तालुकास्तरीय चाचण्यांचे आयोजन
22 ते 23 फेब्रुवारी, 2017
कळमनुरी
तालुका क्रीडा संकुल, कळमनुरी
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
हिंगोली
जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली
22 ते 23 फेब्रुवारी, 2017
सेनगांव
तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
औंढा (ना.)
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
23 ते 24 फेब्रुवारी, 2017
वसमत
बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत
2
जिल्हास्तरीय चाचण्यांचे आयोजन
25 ते 26 फेब्रुवारी, 2017


जय भवानी विद्यालय, उमरा ता. कळमनुरी जि. हिंगोली
3
राज्यस्तर चाचण्यांचे आयोजन (अंतिम निवड चाचणी) व वैद्यकिय चाचणी सदर तारखा इयत्ता 5 ते 9 वी शालांत परिक्षा कालावधी गृहित धरुन ठरविण्यात आल्या आहेत.
06 ते 07 मार्च, 2017

शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे

वरील दिलेल्या तारखानिहाय शाळास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्याचे काटेकोर व पारदर्शक पध्दतीने आयोजन करून एकुण 9 चाचण्यांमध्ये 17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे खेळाडूंची अंतिम मूळ यादी व सविस्तर अहवालाची मूळ प्रत उपरोक्त तालुकास्तर चाचणीच्या वेळी खेळाडूसोबत घेऊन यावी जिल्हास्तर चाचणीच्या वेळी तालुका क्रीडा संयोजक यांनी तालुकास्तरावरील पात्र खेळाडूंची यादी व अहवाल या कार्यालयात किंवा जिल्हास्तर चाचणीच्या वेळी म्हणजेच दि. 25 फेब्रुवारी, 2017 पर्यंत या कार्यालायास सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
विवाह मंडळ व विवाह यांची नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 16 :- महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनयिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विभाग, 1999 यास अनुसरून राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील अस्तित्वात असलेल्या येणाऱ्या विवाह मंडळांनी विवाह मंडळ चालवू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट किंवा वधू-वर सूचक वेबसाईटस अशा विवाह मंडळ नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे नोंदविणे वैज्ञानिक कलम 5 (1) अनुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे विवाह नोंदणी देखील कलम 6 (1) नुसार विवाह झालेला पक्षकार (वधु-वर) यांनी 3 साक्षीदारासह वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात, त्या कोणत्याही एका ठिकाणच्या निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे व्यक्तीश: उपस्थित राहून त्यांचे विवाह नोंदणी करावयाचे आहे.
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 14 फेब्रुवारी, 2006 रोजी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक विवाहांची नोंदणी करणे बंधनकारक केलेली आहे. तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे दाखल विवाह नोंदणीबाबतच्या याचिका PIL 52/2013 संदर्भात विवाह मंडळांची नोंदणी करणे अनिवार्य केलेली आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनयिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विभाग, 1999 ची प्रत राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विवाह मंडळांच्या नोंदणीची नियमावली, अर्जाचे नमुने, भरावयाची फीस इत्यादी सविस्तर माहिती व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विहीत वेळेत केली नसल्यास, अधिनियमातील कलम 12 (2) वैधानिक तरतूदीनुसार त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
विवाह मंडळ चालविणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे विवाह मंडळाची नोंदणी व पक्षकारांची (वधु-वर) त्यांच्या विवाहाची नोंदणी संबंधित क्षेत्रातील, निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे विनाविलंब करून घ्यावी.
याव्दारे आम जनतेस सूचित करण्यात येते की, विवाह मंडळाची नोंदणी तसेच झालेल्या विवाहांची नोंदणी करून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेशी अपेक्षित कागदपत्रासह संपर्क साधावा व नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
कसुरदार पक्षकार (वधु-वर) अथवा विवाह मंडळ यांचेवर विवाह मंडळाचे नियिमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 मधील तरतुदीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची कृपया नोंदणी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

15 February, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी
 मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी कलम 144 लागु
हिंगोली, दि. 14 :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मतदान केंद्रावर दि. 15 फेब्रुवारी, 2017 चे सकाळी 10.00 वाजेपासून ते दि. 16 फेब्रुवारी, 2017 च्या 24.00 वाजेपर्यंत लागु राहिल तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी 23 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली कार्यालयानी कळविले आहे. 
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हिंगोली तालुक्यात 167 मतदान केंद्र असणार आहे. तर कळमनुरी - 203, सेनगाव - 183, औंढा नागनाथ - 162 आणि वसमत तालुक्यात 187 असे 902 मतदान केंद्र आहेत.  तसेच 23 फेब्रुवारी 2017 रोजी सदर निवडणुकीची मतमोजणी हिंगोली तालुक्यातील कल्याण मंडप, नगर परिषद, हिंगोली, वरचा मजला येथे होणार आहे. तर कळमनुरी येथील निवडणूक विभाग हॉल, तहसिल कार्यालय, कळमनुरी,  सेनगाव येथे महसुल शाखा हॉल, तहसिल कार्यालय, सेनगाव, औंढा नागनाथ येथे महसुल शाखा हॉल, तहसिल कार्यालय, औंढा नागनाथ आणि वसमत येथील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वर्कशॉप, आयटीआय, परभणी रोड, वसमत या केंद्रावर सदर निवडणूकीची मतमोजणी होणार आहे.
वरील मतदान केंद्र व मतमोजणी परिसर हद्दी पावेतो मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सदर प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. या आदेशान्वये उपरोक्त नमुद ठिकाणी 200 मिटरच्या परीसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन पार्टीचे / उमेदवाराचे नाव असलेले कोणतेही प्रचार साहित्य उदा. चिन्ह छपाई केलेले टी-शर्ट, टोप्या, उपकरणे, तसेच छापील चिठ्ठया इत्यादी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये आणण्यास व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच संबंधितास नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येत आहे, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

***** 

13 February, 2017

जमनालाल बजाज पुरस्कार 2017 करिता अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 13 :- जमनालाल बजाज फॉऊंडेशनमार्फत ग्रामीण भागात रचनात्मक कार्य, विज्ञान तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासात वापर, सामाजिक कल्याण व गांधी विचारांचा विदेशात प्रसार या चार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती / संस्थेस दरवर्षी जमनालाल बजाज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
            तरी सन 2017 च्या जमनालाल बजाज पुरस्काराकरिता हिंगोली जिल्ह्यातील वरील क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था अथवा शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
            या पुरस्कारांमध्ये गांधी तत्वांचा परदेशात प्रसार करणे या क्षेत्रातील पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याकरिता 28 फेब्रुवारी, 2017 पर्यंत अर्ज करावा.
            तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक व्यक्ती / संस्था / शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी जमनालाल बजाज पुरस्कार 2017 करिता अर्ज करावेत. अर्ज, अटी व शर्तीसाठी http;//jamnalalbajajfoundation.org/awards/nomination-forms या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

*****
कामगारांना मतदान करण्यासाठी एक दिवसाची अथवा दोन तासाची सुट्टी
हिंगोली, दि. 13 :- जिल्ह्यात दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रीक निवडणुका असल्यामुळे राज्य निवडणुक आयोग यांच्या दिनांक 18 जानेवारी, 2017 व कामगार विभागाने दिनांक 2 फेब्रुवारी, 2017 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा कार्यक्षेत्रातील दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्नगृह , नाट्यगृहे, व्यापार, औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदाराना मतदानाच्या  दिवसी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्यात यावी असे निवडणुक आयोग व कामगार विभाग यांचे आदेश आहेत.
तरी हिंगोली जिल्हयातील वरील आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगांराना मतदान करण्याकरिता दिनांक 16 फेब्रुवारी, 2017 रोजी एक दिवसाची भरपगारी सुट्टी देण्यात यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

10 February, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
हिंगोली, दि. 10 : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये, सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी गुरूवार दि, 16 फेब्रुवारी, 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे.

                                                              *****           
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व
प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 10 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींना सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता शासन निर्णय आदेशाचे अधीन राहून खालील अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्याच उमेदवारांची निवड करण्यात येईल.
1) उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. 2) उमेदवार हा 18 ते 25 वयोगटातील असावा. 3) उमेदवाराची उंची पुरुष 165 से.मी. महिला 155 से.मी. असावी. 4) उमेदवाराची छाती पुरुष 79 से.मी. फुगवून 84 से.मी. असावी. 5) शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. 6) जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत आवश्यक राहिल. 7) उमेदवार शारिरिक दृष्टया निरोगी सक्षम असावा. 8) वार्षिक कौंटुंबिक उत्पन्न 1 लाख पर्यंत असावे.
उमेदवारांना दिनांक 06 मार्च, 2017 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण हे शासनाच्या वतीने होणार आहे. प्रशिक्षणार्थीस जाण्या-येण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे अधिकृत पत्र मिळविण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी, 2017 पर्यंत कार्यालयात विहीत नमून्यात अर्ज सादर करावा. सदर अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत नि:शुल्क उपलब्ध असून विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.    

***** 

09 February, 2017

मे-2017 अखेर नागरी भाग हागणदारीमुक्‍त करावेत
                                                                          -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी  
        हिंगोली, दि.09:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत मे-2017 पर्यंत जिल्ह्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त व शहर स्वच्छ करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिले.
            नगर परिषद प्रशासन, हिंगोली यांच्यावतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी सभागृहात सर्व लोकप्रतीनीधी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळेत श्री. भंडारी बोलत होते. यावेळी हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख, सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, प्रमुख पाहुणे पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, औंढा ना. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी ज्योती भगत आणि सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे  यांची या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, 2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याबाबतचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्टिने प्रशासनाने  नियोजन केलेले आहे. नगर परिषद व नगर पंचायतस्‍तरावरून लोकप्रतिनीधी यांनी आप-आपल्या प्रभागातील नागरिकांच्या बैठकी घेवून त्यांना वैयक्तीक शौचालय बांधुन वापर करणे किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी. नागरी स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांची मानसिकता बदलण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावेत. जिल्ह्यातील नगर परीषदा - नगर पंचायतींनी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरविले आहे.  सार्वजनिक स्वच्छतेसाठी सामुहीक प्रयत्नांबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विविध घटकांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनीधी आणि नगर परीषद/ नगर पंचायत प्रशासनाने करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न केल्यास नागरी क्षेत्रातील शौचालयांच्या बांधकामाला अपेक्षित गती मिळण्यास नक्कीच मदत होईल. आणि निश्चित केलेल्या कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती करणे शक्य होईल असे ही  जिल्हाधिकारी श्री. भंडारी यावेळी म्हणाले.  
            हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परीषद / औंढा ना. सेनगाव नगर पंचायत क्षेत्रात एकुण 10 हजार 136 शौचालय बांधकामाचे उद्दीष्‌ट असून, त्यापैकी 3 हजार 138 शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर 4 हजार 130 शौचालयाची बांधकामे सुरु आहेत.  जिल्ह्यातील नागरी भागातील स्वच्छता अभियानाने गती घेतली असून, लवकरात - लवकर शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न नगर परीषद - नगर पंचायतीनी करावा. नागरी भागातील स्वच्छता अभियानात जिल्हा कुठल्याही परिस्थितीत मागे राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील हिंगोली नगर परिषद फेब्रूवारी-2017 अखेर तर वसमत नगर परिषद मार्च-2017 अखेर हागणदारी मुक्तीसाठी कालावधी निर्धारीत केला असून, कळमनुरी नगर परिषदेने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर औंढा ना. आणि सेनगाव या नवीन नगर पंचायती हागणदारी मुक्तीसाठी मे-2017 पर्यंतचा कालावधी निर्धारीत केला आहे. नागरी भागातील लोकप्रतिनीधी आणि नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन, जिल्ह्याला नागरी स्वच्छता अभियानातही अग्रेसर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ही श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
            यावेळी पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी पाथरी येथे यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत सादरीकरणांद्वारे मार्गदर्शन केले. तसेच हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख  आणि सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी ही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
            या जिल्हास्तरीय कार्यशाळेत लोकप्रतिनीधी आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नागरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प केला. यावेळी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर परिषद आणि औंढा ना. सेनगाव नगर पंचायतीचे सदस्यांची उपस्थिती होती.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले. तर औंढा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत यांनी आभार मानले.

*****