09 February, 2017

मे-2017 अखेर नागरी भाग हागणदारीमुक्‍त करावेत
                                                                          -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी  
        हिंगोली, दि.09:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत मे-2017 पर्यंत जिल्ह्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त व शहर स्वच्छ करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिले.
            नगर परिषद प्रशासन, हिंगोली यांच्यावतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी सभागृहात सर्व लोकप्रतीनीधी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळेत श्री. भंडारी बोलत होते. यावेळी हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख, सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, प्रमुख पाहुणे पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, औंढा ना. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी ज्योती भगत आणि सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे  यांची या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, 2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याबाबतचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्टिने प्रशासनाने  नियोजन केलेले आहे. नगर परिषद व नगर पंचायतस्‍तरावरून लोकप्रतिनीधी यांनी आप-आपल्या प्रभागातील नागरिकांच्या बैठकी घेवून त्यांना वैयक्तीक शौचालय बांधुन वापर करणे किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी. नागरी स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांची मानसिकता बदलण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावेत. जिल्ह्यातील नगर परीषदा - नगर पंचायतींनी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरविले आहे.  सार्वजनिक स्वच्छतेसाठी सामुहीक प्रयत्नांबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विविध घटकांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनीधी आणि नगर परीषद/ नगर पंचायत प्रशासनाने करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न केल्यास नागरी क्षेत्रातील शौचालयांच्या बांधकामाला अपेक्षित गती मिळण्यास नक्कीच मदत होईल. आणि निश्चित केलेल्या कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती करणे शक्य होईल असे ही  जिल्हाधिकारी श्री. भंडारी यावेळी म्हणाले.  
            हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परीषद / औंढा ना. सेनगाव नगर पंचायत क्षेत्रात एकुण 10 हजार 136 शौचालय बांधकामाचे उद्दीष्‌ट असून, त्यापैकी 3 हजार 138 शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर 4 हजार 130 शौचालयाची बांधकामे सुरु आहेत.  जिल्ह्यातील नागरी भागातील स्वच्छता अभियानाने गती घेतली असून, लवकरात - लवकर शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न नगर परीषद - नगर पंचायतीनी करावा. नागरी भागातील स्वच्छता अभियानात जिल्हा कुठल्याही परिस्थितीत मागे राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील हिंगोली नगर परिषद फेब्रूवारी-2017 अखेर तर वसमत नगर परिषद मार्च-2017 अखेर हागणदारी मुक्तीसाठी कालावधी निर्धारीत केला असून, कळमनुरी नगर परिषदेने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर औंढा ना. आणि सेनगाव या नवीन नगर पंचायती हागणदारी मुक्तीसाठी मे-2017 पर्यंतचा कालावधी निर्धारीत केला आहे. नागरी भागातील लोकप्रतिनीधी आणि नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन, जिल्ह्याला नागरी स्वच्छता अभियानातही अग्रेसर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ही श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
            यावेळी पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी पाथरी येथे यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत सादरीकरणांद्वारे मार्गदर्शन केले. तसेच हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख  आणि सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी ही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
            या जिल्हास्तरीय कार्यशाळेत लोकप्रतिनीधी आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नागरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प केला. यावेळी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर परिषद आणि औंढा ना. सेनगाव नगर पंचायतीचे सदस्यांची उपस्थिती होती.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले. तर औंढा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत यांनी आभार मानले.

*****


No comments: