29 July, 2022

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्ह्यात दि. 31 जुलै, 2022 ते 9 ऑगस्ट, 2022 या कालावधीत मुस्लीम धर्मीयांचा मोहरम साजरा होत आहे. तसेच दि. 1 ऑगस्ट, 2022 रोजी पहिला श्रावण सोमवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होत आहे. दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली शहर ते कळमनुरी व कळमनुरी ते हिंगोली शहर अशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे.

            तसेच जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच शेतकरी संघटना, केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ भरतीपूर्वी प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने, सद्यस्थितीत राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटना त्यांच्या मागणी संदर्भाने समर्थनार्थ अथवा विरोध प्रकट करण्यासाठी  मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे  तसेच इतर प्रकारच्या निषेध आंदोलने करीत आहेत. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 30 जुलै, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 13 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी

उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळ व ॲप्लीकेशनचा वापर करावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाबाबत प्रचार, प्रसिध्दी व जाणीव जागृती करणे, झालेल्या कार्यक्रमाचा तपशील अपलोड करणे, अभियानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत mahaamrut.org या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर विविध विभागामार्फत पार पडलेले कार्यक्रम, वेगवेगळ्या अभियानाची , आगामी कार्यक्रमाची माहिती, छायाचित्र दालन, चित्रफिती दालन, सर्वसाधारण सूचना इत्यादीबाबत माहिती दिली आहे.

तसेच हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाने harghartirangahingoli.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. तसेच गुगल प्ले स्टोअर वर  harghartirangahingoli हे ॲप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. त्यावर या उपक्रमाबद्दल माहिती, झेंडा मिळण्याचे ठिकाण, वितरक, फ्लॅग डोनेट इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

सर्व नागरिकांनी वरील संकेतस्थळ व ॲप्लीकेशन वरील सोयी सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा

30 जुलै रोजी हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि. 30 जुलै, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 30 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे पूर परिस्थितीची पाहणी करतील. नंतर मोटारीने अर्धापूर-मालेगाव-जिंतूर फाटा मार्गे येऊन दु. 12.45 वाजता वसमत तालुक्यातील जिंतूर फाटा, कौठा, कुरुंदा येथील पूर परिस्थितीची पाहणी करतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन 1.45 वाजता राखीव  (श्री.जयप्रकाश दांडेगावकर/आ.श्री.चंद्रकांत उर्फ राजू नवघरे). नंतर मोटारीने प्रयाण करुन 3.15 वाजता वसमत येथील उपविभागीय कार्यालयात आगमन करुन हिंगोली जिल्ह्यातील पूर व अतिवृष्टीबाबत चर्चा करतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन मयूर मंगल कार्यालय, हिंगोली येथे आगमन करुन पत्रकार परिषद व कार्यकर्त्याच्या भेटीसाठी राखीव. नंतर मोटारीने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला, खडकी, मालेगावकडे प्रयाण.

*******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 592 मिमी पावसाची नोंद

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 15.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 592 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 68.87 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 29 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 19.20 (614.60) मि.मी., कळमनुरी 8.30 (697.10) मि.मी., वसमत 10.60 (603.70) मि.मी., औंढा नागनाथ 30.70 (561.90) मि.मी, सेनगांव 15.50 (467.60) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 592 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******


 

हिंगोली परिषदेच्या 57 जागासाठी आरक्षण सोडत जाहीर

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत 57 जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर  उपस्थित होते.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या या 57 जागामध्ये अनुसूचित जातीसाठी 9 जागा यापैकी 05 जागा महिलासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी 6 जागा असून यापैकी 3 जागा महिलासाठी आरक्षित आहेत. नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी 13 जागा आरक्षित असून यापैकी 7 जागा महिलासाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 29 जागा असून त्यापैकी 14 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तालुकानिहाय आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हिंगोली तालुक्यातील 1-फाळेगाव अनुसूचित जमाती महिला, 2-आडगाव सर्वसाधारण महिला, 3-खेर्डा सर्वसाधारण महिला, 4-पेडगाव अनुसूचित जाती महिला, 5-बासंबा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 6-बळसोंड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 7-भांडेगाव अनुसूचित जाती, 8-उमरा अनुसूचित जाती महिला, 9-नर्सी नां. अनुसचित जमाती महिला, 10-डिग्रस क. नागरिकाचा मागास प्रवर्ग , 11-माळधामणी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला.

कळमनुरी तालुक्यातील 12-खरवड सर्वसाधारण महिला, 13-वाकोडी सर्वसाधारण महिला, 14-येहळेगाव तु. सर्वसाधारण महिला, 15-कोंढूर अनुसूचित जमाती, 16-नांदापूर अनुसूचित जाती महिला, 17-सिंदगी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 18-पोत्रा सर्वसाधारण महिला, 19-आखाडा बाळापूर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 20-शेवाळा सर्वसाधारण महिला, 21-वारंगा फाटा अनुसूचित जाती महिला, 22-जवळा पांचाळ नागरिकाचा मागास प्रवर्ग,              23-डोंगरकडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

सेनगाव तालुक्यातील 24-सवना अनुसूचित जमाती महिला, 25-गोरेगाव सर्वसाधारण, 26-बाभुळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, 27-आजेगाव सर्वसाधारण महिला, 28-पानकनेरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,         29-जयपूर अनुसूचित जाती, 30- वरुड चक्रपान अनुसूचित जाती, 31-साखरा नागरिकांचा मागास प्रवर्ग, 32-हत्ता सर्वसाधारण महिला, 33-भानखेडा अनुसूचित जमाती, 34-पुसेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग .

औंढा नागनाथ तालुक्यातील 35-येहळेगाव सोळुंके सर्वसाधारण, 36-पिंपळदरी त. नांदापूर सर्वसाधारण,       37-जलालदाभा सर्वसाधारण महिला, 38-दुधाळा अनुसूचित जमाती, 39-सिध्देश्वर सर्वसाधारण, 40-अंजनवाडी सर्वसाधारण महिला, 41-उखळी सर्वसाधारण, 42-जवळा बाजार सर्वसाधारण, 43-पुरजळ अनुसूचित जाती,           44-शिरड शहापूर सर्वसाधारण महिला .

वसमत तालुक्यातील 45-पांग्रा शिंदे सर्वसाधारण, 46-पार्डी बु. सर्वसाधारण, 47-कुरुंदा सर्वसाधारण,        48-गिरगाव सर्वसाधारण महिला, 49-कौठा सर्वसाधारण, 50-आंबा सर्वसाधारण, 51-टेंभूर्णी नागरिकांचा मागास प्रवर्ग, 52-करंजाळा अनुसूचित जाती महिला, 53-हट्टा सर्वसाधारण, 54-खांडेगाव सर्वसाधारण, 55-हयातनगर सर्वसाधारण महिला . 56-बाभुळगाव सर्वसाधारण, 57-आसेगांव सर्वसाधारण .

*******

28 July, 2022

 

पेनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरण सद्यस्थितीत 91 टक्के भरला असून नदीत 1295 क्यूसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पेनगंगा नदीपात्रात पाणी सोडल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

तसेच कोणीही नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा इत्यादी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना तहसीलदार कळमनुरी यांना दिलेल्या आहेत.

*******

 

दंड माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी

मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार व रविवारी सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : शासनाची दंड माफी योजना-2022 सुरु आहे. या योजनेत               दि. 31 जुलै, 2022 पर्यंत सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास जवळपास 90 टक्के माफी शासनाने दिलेली आहे. तसेच यानंतर म्हणजे दि. 1 ऑगस्ट, 2022 नंतर सहभाग नोंदविणाऱ्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास 50 टक्के माफी राहणार आहे.

दंड माफी योजना-2022 चा पहिला टप्पा दि. 31 जुलै, 2022 रोजी संपणार आहे. या दंड माफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सहभाग नोंदविता यावा यासाठी दि. 30 व 31 जुलै, 2022 रोजी अनुक्रमे शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये उघडी राहणार आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.    

*******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 576 मिमी पावसाची नोंद

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 576.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 67.03 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 28 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 0.40 (595.40) मि.मी., कळमनुरी 0.10 (688.80) मि.मी., वसमत निरंक (593.10) मि.मी., औंढा नागनाथ 0.30 (531.20) मि.मी, सेनगांव 5.50 (452.10) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 576.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

27 July, 2022

 

मतदार ओळखपत्र होणार "आधार"शी लिंक

मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्यासाठी व नोंदीचे प्रमाणिकरण करण्यासाठी आधार लिंक करावे

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्या व्दारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमुद केले आहे . या कार्यक्रमाचा उद्देश विद्यमान मतदाराकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरुन आहे. तथापि आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे.

उपरोक्त कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणानंतर मतदार नोंदणी अधिकारी (ERO) हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना दि. 17 जून, 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 01 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्याच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब मध्ये नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब च NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पध्दती असतील. (1) स्व-प्रमाणिकरण भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल अॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6 ब भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP व्दारे आधारचे प्रमाणिकरण करु शकतो. तथापि तपशिलात फरक असल्यास प्रमाणिकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे. (2) स्व-प्रमाणिकरणाशिवाय जर मतदारास स्व-प्रमाणिकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणे प्रमाणिकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार त्याचा स्व-प्रमाणिकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6 ब भरुन त्यासोबत योग्य दस्ताऐवज सादर करु शकतो. अर्जाव्दारे घरोघरी भेटी देवून मतदारांडुन छापील नमुना अर्ज क्र 6 ब व्दारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी यांचे व्दारा करण्यात आलेल्या आहेत.

मतदारांचा आधार क्रमांक संकलित करताना आणि हाताळताना कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक होणार नाही. तसेच मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदारांचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यात येणार नाही.

मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मतदारांनी मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करुन पुढाकार घ्यावा. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिक व राजकीय पक्ष यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले आहे.

*******

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात क्षयरोग फोरमची  बैठक संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज दिनांक 27 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा क्षयरोग फोरम बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गणपत मिरगुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक  श्रीपाद गारुडी यांच्यासह  जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, डॉ.सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश रुणवाल, डॉ.नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे, डॉ.प्रेमकुमार ठोंबरे व इतर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी,उपस्थित होते.

यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने प्रती तालुका 15 याप्रमाणे दाते शोधून पोषण आहारासाठी मदत उपलब्ध करुन देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले. तसेच  या बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार व गुणात्मक आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना दिल्या.

यावेळी हिंगोली जिल्हा 2025 पर्यंत टी बी मुक्त करण्याचा निर्धार केला. तसेच आरोग्य साथी अँपच्या माध्यमातून रुग्णामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याबाबत व उपचाराखालील रुग्णास दर महा 500 रुपये एवढे अनुदान रुग्णाच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करावे. जिल्ह्यातील जें रुग्ण क्षय रोगाचा उपचार घेतात त्यांनी नियमित न चुकता उपचार घ्यावा. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी  संशयित क्षयरोग रुग्णाची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्र येथे द्यावी. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी संशयित क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणावे, अशा सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यानी यावेळी  दिल्या.

 

*******

 हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 575 मिमी पावसाची नोंद


हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 8.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 574.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 66.88 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज दिनांक 27 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.
हिंगोली 3.80 (595) मि.मी., कळमनुरी 8.60 (688.70) मि.मी., वसमत 12.50 (593.10) मि.मी., औंढा नागनाथ 12.40 (530.90) मि.मी, सेनगांव 4.90 (446.60) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 574.90 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
******

26 July, 2022


 

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत

महावितरणच्या ‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

 जिल्हयात आज व उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 26 : आजादी का अमृत महोत्सवा अंतर्गत "उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर ॲट 2047" हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत राज्यात सर्वत्र साजरा करण्यात  येणार आहे. यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यात दि.27 व 28 जुलै, 2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या आठ वर्षात हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या वतीने विविध योजनांतर्गत झालेल्या विद्युतीकरणांच्या कामांची चित्रफित, पथनाट्य, कलापथक तसेच लाभधारकांची मनोगते अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 जुलै रोजी कळमनुरी येथे तोष्णीवाल मंगल कार्यालयामध्ये दुपारी दोन वाजता तर दि. 28 जुलै रोजी हिंगोली शहरात वीज कर्मचारी पतसंस्था कार्यालय, नारायण नगर येथे दुपारी दोन वाजता जिल्ह्यातील सन्माननीय खासदार, आमदार यांच्या प्रमूख उपस्थितीत लाभधारकांच्या साक्षीने उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर ॲट 2047 हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर आयोजित या कार्यक्रमात देशातील 773 जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध ‍विद्युत योजनाच्या माध्यमातून गावपाड्यात, शेतात ऊर्जीकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना संदर्भात व्ही.सी.द्वारे मार्गदर्शन केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर म्हणून महावितरणच्या हिंगोली मंडळाच्या अधीक्षक अभियंता रजनी देशमूख यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील पीएफसीचे उपमहाव्यवस्थापक गेवेश पाकमोडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास सर्व लाभधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता रजनी देशमुख यांनी केले आहे.

******

 

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

 

हिंगोली (जिमाका),  दि. 26 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यवसाईक व्यक्तीना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

या महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यासाठी  सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरुन एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेसाठी 100 चे,  20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेसाठी 47, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 119, गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 13 व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 11 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचा योजनानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेसाठी 100 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हत्यांमध्ये राहील. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर दर साल दर शेकडा 4 टक्के  व्याजदर आकरण्यात येणार आहे.

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेसाठी 47 चे उदि्दष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर दर साल दर शेकडा 6 टक्के व्याज आकारण्यात येते व यामध्ये  लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के आहे. या योजनेची कर्ज मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 119 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या मर्यादेत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

            गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 13 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 50 लक्ष रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट. भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 11 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 20 लक्ष रुपये पर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 वे 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावे. विद्यार्थी 12 वीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

ही कर्ज योजना ही बँकेमार्फत असून लाभार्थ्याने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील जास्तीत जास्त व्यक्तीने घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय : डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसालाबाजार, हिंगोली-413513, दूरध्वनी क्र. 02456-224465, ई-मेल  dmobcparbhani@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एन. झुंजारे जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले आहे.

**********

 

विमा सल्लागार भरतीसाठी 29 जुलै रोजी थेट मुलाखतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 26 : परभणी डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) च्या भरतीसाठी दि. 29 जुलै, 2022 रोजी सकाळी 9.30 ते सायं.6.00 या वेळेत अधीक्षक, डाकघर, परभणी विभाग, परभणी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावेत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी केले आहे.   

            हे अर्ज डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी विभाग, परभणी येथे उपलब्ध आहेत. हे अर्ज परिपूर्ण भरुन मुलाखतीसाठी येताना बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. या पदासाठी पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.

मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्याला केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदींनी टपाल जीवन विमासाठी थेट अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमाबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपीच्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून  तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केले जाईल. ही परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी कळविले आहे.    

*****

 

मधमाशा पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  राज्यात सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. तसेच मधमाशांमुळे शेती उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्याने मध उद्योगाला अधिक चालना देणे आवश्यक आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके, फळबागायतीच्या ठिकाणी तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाव्दारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 15 ते 45 टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक आहे.

त्यादृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा या उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात मधकेंद्र योजना ( मधमाशा पालन ) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर जि. सातारा येथे मध संचालनालय कार्यरत आहे. या योजनेची माहिती शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कातकरी लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने देण्यात येत आहे. या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.

1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

3. केंद्र चालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नांवे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली संस्था असावी.

मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा सरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. 

लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860537538, ई-मेल पत्ता- dviohingoli@rediffmail.com आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी – 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

 

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन




 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले.   

यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित जाधवर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक सुरेश भालेराव, बसरुध्दीन शेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील संजय केवटे, कल्याण संघटक उत्तमराम लेकुळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 567 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 5.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 566.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 65.93 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 26 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 6.50 (591.20) मि.मी., कळमनुरी 13.40 (680.10) मि.मी., वसमत 1.90 (580.60) मि.मी., औंढा नागनाथ 2.90 (518.50) मि.मी, सेनगांव 0.30 (441.70) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 566.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

25 July, 2022

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण निश्चित करण्यासाठी

28 जुलै रोजी सभेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम-12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणांसह ) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्यासाठी दि 28 जुलै, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली  जिल्हा परिषदेसाठी  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव पंचायत समितीसाठी संबंधित तहसील कार्यालयात व वसमत पंचायत समितीसाठी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद  अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची  आरक्षण निश्चितीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी दिलेल्या वेळेत हजर राहावे.

जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आरक्षणाचे प्रारुप दि. 29 जुलै, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना दि. 29 जुलै ते 02 ऑगस्ट, 2022 या कालावधीत सादर करता येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी

31 जुलैपर्यंत बँक खाती आधार संलग्न करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 :  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 7 जुलै, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 60.35 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 46.44 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. याबाबत केंद्र शासनाने दूरचित्रवाणी परिषदेमार्फत राज्यातील प्रलंबित ई-केवायसी दि. 31 जुलै, 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 562 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 5.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 561.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 65.33 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 25 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 5.70 (584.70) मि.मी., कळमनुरी 8.40 (666.70) मि.मी., वसमत 5.80 (578.70) मि.मी., औंढा नागनाथ 6.00 (515.60) मि.मी, सेनगांव 3.60 (441.40) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 561.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 

23 July, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

 


हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी मिलींद वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

******