22 July, 2022

 

जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट अधिनियमानुसार लावण्यासाठी

आरोग्य विभागानी दक्षता घ्यावी

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : वैद्यकीय आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट "जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016" प्रमाणे लावण्यात येईल, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी,  असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी- म. प्र. नि.मंडळ परभणी, पोलीस उपअधीक्षक हिंगोली इत्यादी उपस्थित होते.

या  बैठकीमध्ये  जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, डिस्पेंसरी, पॅथॉलॉजी लॅब, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र व प्राधिकारपत्र घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले.  सर्व वैद्यकीय आस्थापना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीपत्र व प्राधिकारपत्राशिवाय चालू राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

*******

No comments: