04 July, 2022

 

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी

मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहीम यशस्वीपणे राबवावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

आज येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम राबविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, स्वयंसेवी संस्थेचे जयाजी पाईकराव यांच्यासह पोलीस विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांन शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दि. 5 जुलै ते दि. 20 जुलै, 2022  या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत. या सर्वेक्षणाच्या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, वसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, विटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून करण्यात याव्यात. तसेच मागास, वंचित गटातील व अल्पसंख्याक वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व खेडी, गांव, वाडी, तांडे, पाडे व शेतमळ्यात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात यावा. महिला बालविकास अंतर्गत बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशनमध्ये समावेश करण्यात यावा. एकही शाळाबाह्य , स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  

शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्के यांनी या सर्वेक्षणात दाखलपात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करुन त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरु ठेवणे व बालकांची गळती शुन्यावर आणणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. 6 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण शिक्षकामार्फत करण्यात येणार आहे. तर 3 ते 6 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडी पर्यवेक्षकामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी यावेळी दिली.

*****

No comments: