14 July, 2022

 

‘‘ढाई आखर’’ या शीर्षकाखाली राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा

 

हिंगोली (जिमाका),  दि. 14 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘‘ढाई आखर’’ या शीर्षकाखाली पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पत्राचा विषय ‘‘Vision For India 2047’’/ ‘‘माझ्या दृष्टीक्षेपातील 2047 चा भारत’’ या विषयावर पत्र लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेत लिहिता येते. ही पत्र लेखन स्पर्धा 18 वर्षापर्यंत वय असलेले एक गट व 18 वर्षाच्या वर असेलेले दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. म्हणून स्पर्धकांनी दि. 01 जानेवारी, 2022 रोजी माझे वय 18 वर्षापेक्षा कमी/जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच आपले नाव, पत्ता व वयाचा उल्लेख करावा. जसे की, ‘‘मी असे प्रमाणित करतो की, माझे वय दि. 01 जानेवारी, 2022 रोजी 18 वर्षापेक्षा कमी/जास्त आहे.’’

हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावाने लिहून जवळच्या टपाल पेटीत किंवा जवळच्या डाक घरात द्यावयाचे आहे. पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा एक हजार व आंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. पत्र पाठविण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2022 ही आहे. या तारखेनंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही.

राज्यस्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी पारितोषिक अनुक्रमे 25 हजार रुपये, 10 हजार रुपये व 5 हजार रुपये राहील. राज्य स्तरावर प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल व राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल.

जास्तीत जास्त संख्येनी जनतेनी पत्र लेखन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, डाक अधीक्षक, परभणी यांनी केले आहे.  

*****

No comments: