09 July, 2022

 

वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरातील  पुराचा धोका असणाऱ्या ग्रामस्थांना

जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरु

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




हिंगोली,दि .9  (जिमाका)  :  हिंगोली जिल्ह्यात काल  रात्रभर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील  आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा आणि परिसरातील गावांतील 400 ते 450 घरांमध्ये  सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करुन संबंधित ग्रामस्थांना सुक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पावळकर यांनी आज येथे दिली .             

या पूर पतिस्थितीची  माहिती मिळताच पहाटे 4.50 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अद्याप कोणतीही जिवित हानी झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार 50 ते 60 जनावरे, 30 ते 35 शेळ्या दगावल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित गावातील पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे.

        तसेच वसमत तालुक्यातील टाकळगाव येथील दोन शेतकरी, इंजन गाव येथील दोन शेतकरी अशा एकूण चार शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या सहायाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच रुंज गावातील शेतात अडकलेल्या एका नागरिकांस सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

        पूरग्रस्त गावातील घराच्या आणि शेतीच्या नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. या नुकसानग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली असून माझ्या सोबत   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने होते असेही श्री .पापळकर  यांनी सांगितले आहे .                

जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात  शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या  पूरग्रस्त गावात अद्याप मदत कार्य सुरु असून या मदत कार्यात माझे संपूर्ण लक्ष आहे,असेही श्री .पापळकर यांनी सांगितले आहे .

*****

No comments: