12 July, 2022

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांचा मोलाचा आधार

 

            शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. जर कोणत्याही आपत्तीमुळे तुमच्या पिकावर परिणाम झाला असेल  तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. शेतकरी अन्नधान्य पिके (तृणधान्ये, बाजरी आणि कडधान्ये), तेलबिया, वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके घेतात, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हवामान घटकांचा पिकांवर होणारा परिणाम

हवामान घटकांच्या  प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे नुकसान होते यासाठी खरीप हंगामातील अपुरा पाऊस हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित किंवा मुख्य पिकांच्या सर्वसाधारण  क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय आहे.

प्रतिकुल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान

सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहते.

पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात होणारी घट

पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पनाची तुलना उंबरठा उत्पनाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी झाले तर नुकसान भरपाई देय राहील.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती

स्थानिक नैसर्गिक आपत्ती  या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान झाल्यास ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत 14 दिवस गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

पीक काढणीच्या वेळी होणारे नुकसान

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घटल्या पासून 72 तासाच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषी व महसुल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.

या योजनेअतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा व न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. योजनेच्या मार्गदर्शन सूचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पीक पेरणी/लावणीपूर्वी नुकसान भरपाई हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान स्थानिक आपत्ती या जोखमींच्या बाबीकरिता नुकसान भरपाई पूर्तता करतील. ज्याप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखिमींच्या नुकसान भरपाईची पूर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील. विमा योजनेअंतर्गत विविध जोखिमी अंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई, परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसान संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही. पीक विमा नोंदणी सीएससी (csc) केंद्रामध्ये विनाशुल्क केला जाईल. पीक विमा भरण्यासाठी मोबदला म्हणून सीएससी केंद्र चालकास प्रति अर्जानुसार 32 रुपये शुल्क शासनाकडून अदा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी विमा हप्त्याव्यतिरिक्त झेरॉक्‍स व इतर खर्च वगळून जास्त रक्कम सीएससी चालकास देवू  नयेत .

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बॅंक पासबूक, पीक पेरा स्वंय घोषणापत्र, सातबारा होल्डींग तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

                                                                                                            श्वेता पोटुडे-राऊत

                                                                                        प्र.जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                        हिंगोली 

*****

No comments: