27 April, 2024

हिंगोली लोकसभा मतदार संघात 63 टक्के मतदान

• किनवट विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान • हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक • पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी हिंगोली,(जिमाका) दि.27: हिंगोली लोकसभा मतदार संघात शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 63.54 टक्के मतदारांनी मतदान केले, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 62.54, हदगाव 65.53, हिंगोली 59.92, कळमनुरी 63.60, किनवट 65.86 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 64.37 टक्के मतदान झाले आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली, श्री. कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. आर. जयंथी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये विधानसभानिहाय एकूण मतदार आणि झालेले मतदान याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 1 लाख 5 हजार 984 पुरुष, 90 हजार 743 महिला तर एका तृतीयपंथी मतदारामध्ये समावेश आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 1 लाख 77 हजार 258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 93 हजार 655 पुरुष, 83 हजार 601 महिला, तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 2 हजार 997 पुरुष, 87 हजार 338 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 94 हजार 89 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 7 हजार 691 पुरुष, 86 हजार 397 महिला तर एका तृतीयपंथी मतदाराने आपल्या मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 2 हजार 845 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 11 हजार 196 पुरुष, 91 हजार 648 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 1 लाख 93 हजार 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार 781 पुरुष, 86 हजार 918 महिला आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 18 लाख 17 हजार 734 मतदारांपैकी 11 लाख 54 हजार 955 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 6 लाख 28 हजार 302 पुरुष, 5 लाख 26 हजार 644 महिला आणि 9 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 83-किनवट विधानसभा मतदार संघ (65.86 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (59.92 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात 25 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 जणांनी या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग नोंदवला. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी श्रीमती कावली मेघना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, श्रीमती क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ, डॉ. सखाराम मुळे, अविनाश कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुखांनी प्रयत्न केले. निवडणुकीचा दुसरा टप्पा देशात दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा या पाच आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. *****

जिल्हा हिवताप कार्यालयात जागतिक हिवताप दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील जिल्हा हिवताप कार्यालयात नुकताच जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, तसेच आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केला आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे आहे. भारतामध्ये सन 2016 ते 2030 पर्यंत हिवताप दूरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे, त्याबाबतचे ध्येय व नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे, हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील पाणी साठ्यांना घट्ट झाकणे लावावीत, घरावरील, घराभोवती पडलेले भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे हिवताप आणि त्याचा प्रसार हिवताप हा आजार प्लाझमोडीअम या परोपजीवी जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे 30 ते 50 कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. हिवतापाचा प्रसार अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या यकृतमध्ये जात त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला ताप येते. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डासांच्या नियंत्रणासाठी घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजण, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत. डबकी बुजावीत, पाणी वाहते करावे, साठलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. घरातील भंगार सामान निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी. कुलर, चायनीज प्लँट व फ्रिजचा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावा. शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात. शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी अथवा कापड बांधावे. वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा. ताप आल्यास रक्त नमुना तपासून घ्यावा. आवश्यक औषधोपचार घ्यावा. हिवतापाने निदान व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हिवताप नियंत्रणासाठी हिवताप निदान व उपचार महत्वाचे आहेत. अॅनाफिलिस डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या, डबके, छतावरील पाणी, भातशेतीतील पाणी कॅनॉल, नदी, नाले, ओबे, इत्यादी. अॅनाफिलिस द्वारा एडीस डासांमुळे या आजारांचा प्रसार होतो. हे डास घरगुती स्वच्छ पाण्यात म्हणजेच हौद, बॅरल, रांजण, पाण्याच्या टाक्या, पायनिज प्लॅट डेस कुलर, फ्रिजचा दिप सामान टावरमध्ये साठलेले पाणी यामध्ये तयार होतात. एडीस डास, क्युसेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. हे डास शौचालयाच्या सेप्टीक टँक, तुंबलेली गटारे, ड्रेनेज लाईन, अस्वच्छ पाण्यात तयार होतात. हिवतापाची लक्षणे व औषधोपचार थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, ताप नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. याबाबत प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करावी. हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासून करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात. ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने आपला रक्त नमुना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासून घ्यावे. हिवताप दूषित रक्त नमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशीपोटी घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी प्रायमाक्वीन औषधी घेऊ नये व शून्य ते एक वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देऊ नये. हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. आतील बाजू व तळ घासूनपुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणीने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदीची वेळीच विल्हेवाट लावा. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. *********

26 April, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांची पहाटेच मतदान केंद्राला भेट

• निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांनी केली सखी मतदान केंद्राची पाहणी हिंगोली (जिमाका), दि. 26 : लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज पहाटे 5.45 वाजता सरजू देवी भिकुलाल आर्य कनिष्ठ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर जावून निवडणूक यंत्रणेच्या तयारीची पाहणी केली. तसेच श्रीमती अर्चना व निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांनी ही सिटी क्लब येथील सखी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती एम.एस.अर्चना यांनी यावेळी सिटी क्लब येथील मतदान केंद्र क्र. २८६ येथील महिला कर्मचारी संचालित सखी मतदान केंद्रवरील पॉईंटवर सेल्फी घेत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी माणिक स्मारक येथील दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदान केंद्राचीही भेट देत पाहणी केली. *****

हिंगोली लोकसभा मतदार संघात अंदाजे 62.67 टक्के मतदान

• निवडणूक विभागाची 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर • पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त • आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रांचे संचलन हिंगोली, (जिमाका) दि.26: हिंगोली लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज मतदारसंघात 2008 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 18 व्या लोकसभा निवडणुकीत आज अंदाजे 62.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघ 60, हदगाव 66, हिंगोली 60, कळमनुरी 63, किनवट 65 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात अंदाजे 62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 77 हजार 734 मतदार असून, त्यामध्ये 9 लाख 46 हजार 674 पुरुष तर 8 लाख 71 हजार 35 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 25 मतदारांचा यात समावेश आहे. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती आर. जयंथी यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. संपूर्ण लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनीही वॉर रूमला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पापळकर यांनी दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. मतदान प्रक्रिया (मॉक पोल) सुरू असतानाच 39 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र, लोकशाहीचं लग्न असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. *****

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

• जिल्हाधिकारी यांनी घेतली सेल्फी • लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी केले आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज दि. 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करुन, रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ******

25 April, 2024

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 25 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज हिंगोली विधानसभा मतदार संघातील पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षकांसोबत सहायक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिवाजी रोडगे, शेख मुजीब, पोलीस पाटील राधेशाम जैस्वाल उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधांची माहिती श्री. अन्वर अली यांनी घेतली. ******

निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांच्याकडून यंत्रणेचा आढावा

• मतदार संघाच्या सीमांवर काटेकारेपणे तपासणी करण्याचे निर्देश • अचूक नोंदीवर निवडणूक विभागाचा विशेष भर हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून खर्चाच्या अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना खर्चाचे निवडणूक निरीक्षक अन्वर अली यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दीपक खंदारे, जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते, संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी उपस्थित होते. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी यावेळी दिले. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या. लोकसभा मतदार संघात कोठेही संशयास्पद अवैध मद्य विक्री व साठा, रोख रक्कमेचे वितरण, विविध साहित्य वाटप यासारखे अनुचित प्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्थिर संनियंत्रण (एसएसटी) पथकामध्ये वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग व पोलीस विभागाने लक्ष ठेवावेत. सीमेवर येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश श्री. अन्वर अली यांनी दिले. तसेच जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समिती पथक प्रमुखाने एकही पेड न्यूज नसल्याचे सांगितले. ********

लोकशाहीच्या महोत्सवासाठी मतदान करा - जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर

• मतदान करून नवदाम्पत्यांना द्या बळकट लोकशाहीचे ‘गिफ्ट’ • आज दिवस तुमचा; मतदानाचा हक्क बजावण्याचा • मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज • गृहभेटीतून तब्बल 1207 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क • मतदारसंघात गृहभेटीदरम्यान झाले 92 टक्के मतदान • ज्येष्ठ व दिव्यांगांनी सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करून ने-आण सुविधेचा लाभ घ्यावा हिंगोली, (जिमाका) दि.25: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार, दि. 26 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी केली आहे. तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होत असल्याने या सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यापूर्वी वधू-वरांसह सर्व नातेवाईक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावूनच नवदाम्पत्याला बळकट लोकशाहीचे गिफ्ट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने दोन गृहभेटी घेत निवडणूक विभाग मतदारांपर्यंत पोहोचला आहे. लोकसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी डोंगर-दऱ्या, माळरान, आणि धरणांच्या काठावर राहणाऱ्या झोपडीपर्यंत पोहोचत तब्बल 1207 मतदारांचे मतदान करून घेतले असून, ते 92 टक्के झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदानाचा अर्जाचा नमुना 12 डी हे 39 हजार 709 मतदारांना वितरीत केले होते. त्यापैकी 1391 ज्येष्ठ, दिव्यांग आणि सैनिक मतदारांकडून प्राप्त झाले आहेत. तर नमुना 12 डीचे 1312 अर्जांना स्वीकृती देण्यात आली असून, आतापर्यंत 1207 मतदारांकडून मतदान करण्यात आले आहे. हे 1207 मतदान आता कडक सुरक्षा व्यवस्थेत पेटीबंद करण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकही कोविड रुग्ण नाही, ही समाधानाची बाब असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. निवडणूक विभागाने निवडणूक पथकांनाच मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या सोहळ्यात आपल्या मतांचे दान केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. आतापर्यंत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या 2574 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान सुविधा केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत या लोकशाहीच्या लोकोत्सवात आपला सहभाग नोंदवला असून, 1348 सैनिकांना संगणकीय प्रणालीद्वारे (ईटीपीबीएमएस) पाठविण्यात आले होते, यापैकी 178 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, दि. 4 जून 2024 रोजी सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघात 82-उमरखेड विधानसभा मतदार संघात 342 मतदान केंद्र असून त्यापैकी धारकना-36, उमरखेड-218,219 आणि 220, धानकी-291 आणि 292 हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 330 मतदान केंद्र असून त्यापैकी पापळवाडी-58, धुंद्रा-68, मांडवी-127 आणि 128, चिखली-243 व 244 हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 319 मतदान केंद्र असून त्यापैकी चोरंबा खु.-246 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 327 मतदान केंद्र असून त्यापैकी किन्होळा-185 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. तर 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात 345 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 मतदार केंद्र असून या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने उद्या शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. *****

हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 144 कलम लागू

हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च, 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ची प्रक्रिया हिंगोली जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर होणार आहे. त्या ठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. हे आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि. 25 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेश दिले आहेत. ******

हिंगोली लोकसभा मतदार संघात 19 आदर्श मतदान केंद्र, लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत नोंदवा - निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• महिला कर्मचारीद्वारे संचालित सात आदर्श सखी मतदार केंद्राची व्यवस्था • दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित सहा आदर्श दिव्यांग मतदार केंद्राची व्यवस्था • युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सहा आदर्श युवा मतदान केंद्र हिंगोली (जिमाका), दि. 25 : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य असे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्र हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड, हदगाव, वसमत, कळमनुरी व हिंगोली येथील प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक व किनवट विधानसभा मतदार संघात 2 याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित 7 सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 202-नगर परिषद कर विभाग रुम, उमरखेड, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 215-महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दक्षिण बाजू, गोकुंदा व मतदान केंद्र क्र. 24-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहूर पूर्व बाजू, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 108-विवेकानंद हायस्कूल हदगाव वर्ग पहिला (सी), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 190-बर्हिजी स्मारक विद्यालय गिरगाव पूर्व विंग रुम नं. 2 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 80-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1 येथे महिला कर्मचारीद्वारे संचालित 7 सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 6 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 206-नगर परिषद ऊर्दू प्राथमिक शाळा इमारत (पूर्व बाजू) एन.पी. गार्डन दक्षिण बाजू खोली क्र.1 उमरखेड, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 218-महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पश्चिम बाजू, गोकुंदा, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 82-जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव वर्ग 7 वा (ए), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 252-बर्हिजी स्मारक विद्यालय वसमत येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 307-माणिक स्मारक आर्य विद्यालय हिंगोली खोली क्र. 1 येथे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 6 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. आदर्श युवा मतदान केंद्र हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 6 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 215-साकले विद्यालय लोकमान्य टिळक हॉल उमरखेड येथे, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 25-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहूर पूर्वेस बाजू जवळ, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 59-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा (जे), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 229-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बौद्धवाडा नवीन इमारत पूर्व विभाग खोली क्र. 4 वसमत येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 180-जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा औंढा नागनाथ खोली क्र. 3 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय हिंगोली खोली क्र. 1 येथे अशाप्रकारे 6 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. ******

24 April, 2024

हिंगणी गावातील मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी 144 कलम लागू

हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगणी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, गावातील विविध प्रार्थनास्थळाजवळून ही मिरवणूक काढली जाणार आहे. सध्या लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या गावातील ही मिरवणूक शांततेत पार पाडली जावी. नागरिकांकडून कायद्याचे पालन व्हावे, यासाठी हिंगणी गावात व परिसरात दि. 28 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 ते दि. 30 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 11 वाजेपर्यंत कलम 144 (1) प्रमाणे संचारबंदी लागू करावी व हिंगणी गावात इतर गावातील लोकांना प्रवेश बंदी करण्याबाबत समितीच्या अध्यक्षांनी विनंती केली आहे. त्यामुळे हिंगोलीचे उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मौ. हिंगणी गावात व परिसरात दि. 28 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 ते दि. 30 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करुन मौ. हिंगणी गावात इतर गावातील लोकांना प्रवेश बंदी केली आहे. संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नाही, आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे. *******

प्रभातफेरीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 24 : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रँलीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय आधिकारी नवनाथ वगवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, आदर्श आचार संहिता अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे, स्विप समितीचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी गंगाधर बिरमवार, स्वीप समितीचे प्रा. माणिक डोखळे, सुदर्शन सोवितकर, विनोद चव्हाण, कुंडलीक शिंदे, राजकुमार मोरगे, अनिकेत देशमुख, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीमध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवृंद, महाविद्यालयीन विद्यार्थी, आरोग्य विभागातील शिकाऊ नर्स, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान कला पथकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीते गाऊन मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश देण्यात आला. ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पोस्ट ऑफिस ते भारतीय विद्या मंदिर शाळा मार्गे जवाहर रोड ते शेवटी गांधी चौक येथे हिंगोली येथील रत्नाकर महाजन यांच्या द्वारे" मतदान जनजागृतीची" सामूहिक शपथ घेण्यात आली व कलापथकाचे सुर्यप्रकाश दांडेकर व संच यांनी मतदान जनजागृतीपर गीत सादर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करून मतदान जनजागृतीपर संदेश दिला. ******

मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज • मौजे शिरड शहापूर येथील नमुना 12 डी भरून दिलेला एकही मतदार मतदानापासून वंचित नाही

हिंगोली, (जिमाका) दि. 24: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारासंघासाठी शुक्रवार, दि. 26 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने गृहभेटी घेत निवडणूक विभाग त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. लोकसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी डोंगर-दऱ्या, माळरान, आणि धरणांच्या काठावर राहणाऱ्या झोपडीपर्यंत पोहोचत त्यांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघात दिव्यांग 2219 आणि ज्येष्ठ मतदार 5319 असे एकूण 7 हजार 538 मतदारांना 12 ड नमुने वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 52 दिव्यांग मतदारांनी तर 85 ज्येष्ठ मतदार असे एकूण 137 अर्ज बीएलओंमार्फत सहायक निवडणूक अधिकारी वसमत यांना प्राप्त झाले होते. या सर्व दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांच्या मागणीनुसार गृहभेटी घेत मतदान करून घेण्यासाठी पथक 14 आणि 15 एप्रिल रोजी त्यांच्याकडे पोहोचले. या प्रथम भेटीमध्ये मतदार न भेटल्यामुळे त्यांनी 20 एप्रिल रोजी दुसरी गृहभेट घेण्यात आली. या दोन्ही गृहभेटीमधून निवडणूक यंत्रणेच्या पथकांनी 14 एप्रिल रोजी 64 ज्येष्ठ मतदारांचे तर 38 दिव्यांग मतदारांचे असे एकूण 102 जणांचे मतदान करून घेण्यात आले तसेच 15 एप्रिल रोजी 15 ज्येष्ठ तर 12 दिव्यांग असे 27 मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. तर 20 एप्रिल रोजी एका दिव्यांग मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. या ज्येष्ठ 79 आणि 51 दिव्यांग अशा एकूण 130 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 12 डी भरून दिल्यानंतर दरम्यान 2 मतदारांचा मृत्यू झाला तर 5 मतदार अनुपस्थित होते. त्यामुळे वरील अनुपस्थित असलेल्या 5 मतदारांना 26 एप्रिल रोजी त्यांच्या केंद्रावर मतदान करता येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागाने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. गृहभेटीद्वारे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी दोन वेळा निवडणूक यंत्रणा त्यांच्या दारापर्यंत पोहचत त्यांनी या लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला. दोन गृहभेटीमध्ये संबंधित मतदाराची भेट न झाल्यामुळे तो मतदार येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे. मौजे शिरड शहापूर येथील एकूण 5 मतदान केंद्रांच्या बीएलओंकडे गृहभेटी मतदान करून घेण्यासाठी ज्येष्ठ मतदारांसाठी 158 तर 20 दिव्यांग मतदारांना नमुना 12 डी वाटप करण्यात आले होते. त्यापैकी संबंधित पथकातील बीएलओंना केवळ 2 ज्येष्ठ मतदारांनी नमुना 12 डी भरून दिला होता. त्यानुसार 2 ज्येष्ठ मतदारांचे 14 एप्रिल रोजी पथकाने गृहभेटीदरम्यान मतदान करून घेतले. त्यामुळे शिरडशहापूर येथे नमुना 12 डी भरून देण्यात आलेला एकही ज्येष्ठ किंवा दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहिलेला नाही, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ***

‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ अंतर्गत काढलेली सेल्फी शेअर करा

हिंगोली (जिमाका), दि. 24: लोकसभा निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया म्हणजेच लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव आपल्याकडे शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दि. 26 एप्रिलला आपल्या आई-बाबा, ताई-दादा तसेच आजी आजोबांनी मतदान केल्याची निशाणी अर्थातच बोटाला लावलेली शाई दाखवत विद्यार्थ्यांसोबतचा सेल्फी आपापल्या शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांकडून त्यांच्याच नातेवाईकांसोबतचे मतदान केल्याचे हे सर्व सेल्फी शिक्षकवृंदांनी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय व्हाट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर करावेत. तसेच आपापल्या फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमावर #चुनाव का पर्व, देश का गर्व या हॅशटॅगसह अपलोड करावेत, असे आवाहनही स्वीपच्या नोडल अधिकारी यांनी केले आहे. ******

हिंगोली लोकसभा निवडणूक कामासाठी 555 वाहने अधिग्रहीत

हिंगोली (जिमाका), दि. 24: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यातर्फे निवडणूक कामासाठी जवळपास 555 वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. यातील वसमत विधानसभा मतदारसंघासाठी विविध मतदान पथके यांच्यासाठी जवळपास 145 वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक श्री. तडवी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पारशेट्टी व विजय दिघे यांच्या पथकाने उपलब्ध वाहने अधिगृहीत केली आहेत. वरीलपैकी सर्व वाहने वसमत सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाचे आवारात दाखल देखील झाली आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली आहे. *****

मतदानासाठी 26 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 3 एप्रिलच्या अधिसूचनेनुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान करण्यास सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे. उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदानाच्या हक्कापासून कोणताही शासकीय कर्मचारी वंचित राहू नये, तसेच सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक संस्था, व्यापारी केंद्र, औद्योगिक कारखाने इत्यादीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचित केले आहे. ******

मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य

हिंगोली (जिमाका), दि. 24 : येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दि. 26 एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदानकेंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

घरोघरी जावून मतदारांमध्ये जनजागृती करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर

* मतदारसंघात शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाचे आवाहन * सकाळच्या सत्रातच मतदान करून घेण्यावर भर हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगोली लोकसभा मतदार संघात 100 टक्के मतदान होण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) संदीप सोनटक्के आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पापळकर म्हणाले, कोणत्याही पक्षाचा अभिनिवेष न करता कोणालाही मतदान करा, अशी घोषणा करा, मतदानाची टक्केवारी वाढवा. बाहेरगावी गेलेल्या मतदारांची आदल्या दिवशीच तपासणी करून त्यांचे मतदान करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करा. एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना मतदान केंद्राच्या बाहेर मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सकाळी 7 ते 10 यावेळेत जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावेत. महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करावे. यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढता येईल. एखादे मतदान केंद्र दूर असल्यास ने-आण करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्या वाहनावर ‘निवडणूक आयोगाच्या सेवार्थ’ असा फलक लागलेला असावा. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे. तसेच गावात असलेल्या संस्थानातील ध्वनीक्षेपकाद्वारे प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची मतदार यादीतील नावे शोधून द्यावीत. त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे. तसेच दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. प्रत्येक घरी बीएलओ मार्फत मतदान चिठ्ठी पोहोच करावी. शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी आवश्यक त्या सोयी सुविधा वाढवून व मतदारामध्ये जनजागृती करुन जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी घरोघरी भेटी देण्याचे गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे विभागाचे उप मुख्य कार्यकारी यांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबवून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करतील यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून आवाहन करावेत. बीएलओंनी मतदारांची यादीतील नावे तपासून द्यावीत. मतदारांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय करावी. तसेच आवश्यक सुविधा पुरवाव्यात व जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी सर्व सबंधित अधिकारी व यंत्रणेला दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. तसेच मतदान केंद्रावर रॅम्प, व्हील चेअर, शौचालय व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. आणि जास्तीत जास्त मतदार करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया, आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर व संदीप सोनटक्के यांनी केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. ********

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 06 : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक श्रीमती एम.एस अर्चना यांच्या उपस्थितीत तिसरी सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती एम. एस. अर्चना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही तिसरी सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघात मतदानाच्या ठिकाणी कोणता अधिकारी-कर्मचारी मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, हे निश्चित करण्यात आले. तसेच दहा टक्के अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय निवडणूक कामी नियुक्त करण्‍यात आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते. *****

23 April, 2024

तिसऱ्या तपासणीतील निवडणुकीचे दैनंदिन लेखे सादर न केलेल्या दोन उमेदवारांना नोटीस

• तातडीने खुलासा सादर न केल्यास उमेदवारांवर होणार कारवाई हिंगोली (जिमाका), दि. 23 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्च नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवाराचा होणारा दररोजचा खर्च सनियंत्रण पथकास दि. 23 एप्रिल, 2024 सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु गजानन धोंडबा डाळ आणि महेश कैलास नप्ते या उमेदवारांनी अद्याप नोंदवही व खर्चाचे प्रमाणके सादर केलेली नाहीत. त्यामुळे निवडणूक खर्चाच्या निर्देशांचे संकलन विभाग सी (1) पृष्ठ क्रमांक 76, 77 मधील निर्देशानुसार व भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार न्यायालयात तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर तातडीने खुलासा सादर करावा अन्यथा आपणाविरुद्ध भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ********

शुक्रवारी ‘आधी मतदान, मगच लगीन’ - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मतदारांना आवाहन

• मतदारांनी 100 टक्के मतदान करण्यासाठी आपले योगदान द्यावे हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या शुक्रवारी 26 एप्रिल 2024 रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या दिवशी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारसंघातील नववधू-वरासह सर्व मतदारांनी सकाळी 7 वाजता आधी मतदान, मगच लगीन म्हणत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. देशभरासह हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी 16 मार्च 2024 पासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 16 मार्चपासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील 16 पथके या प्रक्रियेत सहभागी असून, निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक आर. जयंथी हे या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 2006 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याकामी मतदारसंघातील विविध अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात विवाह समारंभ असले तरीही नवमतदारांनी आपले मतदान करत, आई-वडीलांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहचवत 100 टक्के मतदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारी पोहचला असून, निवडणूक यंत्रणा डोंगर-दऱ्या, नदी-नाले, काट्याकुट्याचे रस्ते तुडवत एकेक ज्येष्ठ व दिव्यांगांचे टपाली मतदान करून घेत आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भावाचे-बहिणीचे, मित्र, आप्तेष्ठातील कोणाचेही लगीन असले तरीही आधी मतदान करूनच लग्नाला निघावे. तसेच सर्वांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. *****

अठरा वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजी लसीकरण

हिंगोली (जिमाका), दि. 23 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी या एप्रिल महिन्यात सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम मे, जून कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थी शोधण्याकरिता आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्याची यादी तयार होणार आहे. सोबतच सक्रीय क्षयरुग्ण शोध व संशयित क्षयरुग्ण शोधण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्याचे मे महिन्यात प्रत्यक्ष लसीकरण होणार असून सर्व प्रशिक्षित लस टोचक यांच्याद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण सत्राचे दिवस वगळून विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस अत्यंत सुरक्षित असून भारतात ही लस इ. स. 1978 पासून बालकांचे लसीकरण करण्यासाठी वापरात आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे व जोखमीच्या घटकातील 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी कर्मचाऱ्याकडे प्री रजिस्ट्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांनी केले आहे. लस कोणाला द्यावी : पूर्वी टीबीचा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण, क्षयरुग्णाच्या सहवासीत राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षयरुग्णाच्या सहवासात राहत असलेले व्यक्ती, 60 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेले व्यक्ती (स्वयंघोषित), ज्यांना धुम्रपानाचा पूर्व इतिहास अशा व्यक्ती, ज्या व्यक्तीचा बॉडी माक्स इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, अशा नागरिकांना बीसीजी लसीकरण करण्यात येते, अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. लस कोणाला देऊ नये : अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती, जे व्यक्ती संमती पत्रावर सही करणार नाही अशा व्यक्ती, ज्या व्यक्तींना एचआयव्हीचा पूर्व इतिहास आहे अशा व्यक्ती, गरोदर व स्तनदा माता, ज्यांनी मागील तीन महिन्यात रक्त चढवून घेतलेले आहे अशा व्यक्ती, बीसीजी लसीकरणाचा दुष्प्रभावाचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती, सध्या कुठल्याही आजाराचा उपचार घेत असणाऱ्या व्यक्तींना बीसीजी लस देऊ नयेत, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी दिली आहे. *******

जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी दि. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी दि. 25 एप्रिल, 2024 रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत डासअळी सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, ॲबेटींग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या कीटकजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी या मोहीम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकन ठेवावे. नाल्या, गटारे वाहते ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. मच्छरदानीचा वापर करावा, उघड्या खिडक्यांना जाळ्या बसवावेत, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी. कुलर फ्रिजच्या ड्रिप पॅनमधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावेत. पाण्याचा हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावेत. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाचे लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून योग्य तो औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. *******

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्यासाठी जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दि. 26 एप्रिल, 2024 पार पडत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावेत. यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रनिहाय मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी इत्यादीचा तीन ते चार जणांचा एक गट तयार करण्यात यावा. या गटामार्फत संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी जनजागृती मोहीम राबवून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात यावे. तसेच अद्याप वोटर गाईड व वोटर माहिती स्लीप वाटल्या नसल्यास त्यांचेही वाटप करण्यात यावे, अशा सूचना हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व स्वीपचे नोडल अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. *****

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यामध्ये खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापार, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासाची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सूचनाचे योग्य ते अनुपालन करून कामगारांना सुट्टी अथवा सवलत द्यावी. याबाबत मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाली नसल्यामुळे मतदान करता आले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ********

22 April, 2024

स्विप कार्यक्रम अंतर्गत उमरखेड शहरात बाईक रॅलीचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने (15-हिंगोली ) लोकसभा मतदारसंघातील 82-उमरखेड विधानसभा मतदार संघांतर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या निर्देशानुसार उद्या, मंगळवारी दुपारी चार वाजता स्विप कार्यक्रमांतर्गत उमरखेड शहरातील मुख्य रस्ते मार्गाने बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तरी 82- उमरखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व नोडल्स अधिकारी तसेच कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी आपली बाईक घेऊन तहसिल कार्यालयाच्या मैदानावर हजर राहावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. *****

निवडणूक खर्चाची तृतीय लेखे तपासणी आज

हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची तृतीय निवडणूक खर्च लेखे तपासणी उद्या मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा कोषागार कार्यालय हिंगोली येथे ही तपासणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांच्या उपस्थितीत ही तपासणी होणार आहे. निवडणूक खर्च सादर करण्यात अपयशी ठरलेले उमेदवार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 (1) अंतर्गत दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र राहतील, असे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून अहवाल तात्काळ सादर करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर

• सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश हिंगोली (जिमाका), दि.22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चे मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. या काळात निवडणूक कर्तव्यावर अनुपस्थित राहणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्याचे अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना आज दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार असून, या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज करण्याचे आदेश यापूर्वीच संबंधिताना देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही निवडणुकीच्या कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्यांविरोधात कडक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये ही कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणू‍क‍ निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सहा उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत. ******

उमेदवारांनी मतदानापूर्वी यादी तपासून घ्याव्यात- निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना

हिंगोली (जिमाका), दि.22 : सर्व उमेदवारांनी आपल्या पोलींग एजंटमार्फत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मतदार यादी प्राप्त होताच तपासून घ्याव्यात, असे आवाहन निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज येथे उमेदवारांना केले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित श्रीमती अर्चना यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला निवडणूक (खर्च)निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, सुशांत उबाळे आणि श्रीमती पुष्पा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इलेक्ट्रोल रोल अथवा इतर कोणतीही समस्या असल्यास उमेदवारांनी ते तात्काळ तपासून घ्यावेत. तसेच पोलींग एजंटही तात्काळ नेमावेत. यामध्ये काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींना तात्काळ मतदार यादीची तपासणी करून घेण्याबाबत सूचना कराव्यात. तसेच मतदान केंद्रावर जावून नावे तपासून घ्यावीत. पोलींग एजंट शिवाय मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जावू शकत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोहोचावे. काही अडचण असल्यास १९५० या क्रमांकावर किंवा सी व्हीजील ॲपवर तक्रार नोंदवावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी यावेळी सांगितले. उद्या सर्वांनी वेळेत येऊन आपले खर्च लेखे तपासून घ्यावेत. लेखे तपासणी करून घेण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उद्या मंगळवार, दि. 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी वेळेत दाखल करून घ्यावेत, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी यावेळी सांगितले. मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी 75 मिनिटे मॉक पोल सुरु होईल. तत्पूर्वी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या पोलींग एजंटांनी उपस्थित राहावे. या पोलींग एजंटांचे ओळखपत्र, तेथील प्रत्यक्ष कामकाज, मतदानाची प्रक्रिया पाहतील. उमेदवारांनी या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांकडून मतदान करून घेत प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढवण्यास आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. *****

21 April, 2024

अवैध रेती उत्खनन करणाऱ्याविरुध्द गुन्हा नोंद महसूल विभागाची कारवाई

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या विशेष पथकाद्वारे सेनगाव तालुक्यातील लिंबाळा (हुडी) येथे बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रेतीचे उत्खनन होत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे कळताच शुक्रवारी रात्री 10 वाजता लिंबाळा (हुडी) येथे पथकाने भेट दिली. यावेळी लिंबाळा (हुडी) येथील गट क्र. 7 मध्ये सेक्शन पाईपसह बोट आढळून आली. पथक आल्याचे पाहताच ऑपरेटरनी ठिकाणाहून पळ काढला. पथकाने त्या ठिकाणाहून रेती उत्खनन करणारी बोट, सेक्शन पाईप, लोखंडी पाईप, ड्रम इत्यादी साहित्य ताब्यात घेऊन ते साहित्य सेनगाव तहसील कार्यालयात जमा केले. याची स्थानिक चौकशी केली असता सदरील बोट गोपाल शामसुंदर दुबे रा.हिंगोली यांची असल्याची बाब निदर्शनास आली. त्याआधारे पोलीस स्टेशन सेनगाव येथे भादवि संहिता कलम-379 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व 48 (8) नुसार संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही जप्त बोट शुक्रवारी नष्ट करण्यात आली. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, मंडळ अधिकारी सर्वश्री. एस. जी. झोळगे, घुगे, दंडिमे, तलाठी सर्वश्री. प्रशांत देशमुख, पुरुषोत्तम हेंबाडे, मोहीब, सोमटकर, गळाकाटू, उपेंद्र पत्की, नवनाथ वानोळे, काळबांडे, कोतवाल प्रल्हाद घोडके, राजू सावंत, वाहनचालक व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्ण केली असल्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

निवडणुकीचे दैनंदिन लेखे सादर न केलेल्या तीन उमेदवारांना दुसरी नोटीस • विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर होणार कारवाई

हिंगोली (जिमाका), दि. 21 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्च नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवाराचा होणारा दररोजचा खर्च सनियंत्रण पथकास दि. 15 एप्रिलपर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु दि. 15 एप्रिल, 2024 च्या रोजीच्या खर्च तपासणीस तीन उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने दि. 16 एप्रिल रोजी नोटीस देऊन 48 तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीसाठी सादर करण्याबाबत कळविले होते. परंतु अनिल देवराव मोहिते, श्रीमती वर्षा देवसरकर, अशोक पांडूरंग राठोड या तीन उमेदवारांनी नोंदवही व खर्चाचे प्रमाणके अद्याप सादर केलेली नाहीत. तसेच त्यांनी दि. 15 व 19 एप्रिल रोजीही निवडणूक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे सादर केले नाहीत. त्यामुळे निवडणूक खर्चाच्या निर्देशांचे संकलन विभाग सी (1) पृष्ठ क्रमांक 76, 77 मधील निर्देशानुसार व भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार न्यायालयात तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर सोमवार, दि. 22 एप्रिल, 2024 पर्यंत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण कक्ष, जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास निवडणुकीदरम्यान वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ********

हिंगोली उपविभागीय कार्यालयात टपाली मतदानाची सुविधा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या इतर लोकसभा मतदार संघातील मतदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राची (FACILITATION CENTER) सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत, त्यानुसार 94- हिंगोली विधानसभा मतदार संघा अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ईतर लोकसभा मतदार संघातील मतदार असलेले जे अधिकारी, कर्मचारी फाॕर्म क्र. 12 भरुन दिलेले आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी दि. 21 ते 24 एप्रिल, 2024 पर्यंत सकाळी 9.00 ते सांय. 5 दरम्यान उपविभागीय अधिकारी, हिंगोली येथे तसेच दि. 25 एप्रिल, 2024 रोजी लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी 9 ते सांय. 5 वाजेपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या सुविधेचा लाभ निवडणूक कर्तव्यातील ईतर लोकसभा मतदार संघातील मतदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहन हिंगोलीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे. *******

महिला मतदान अधिकारी यांना मतदान यंत्राचे प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि.21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सखाराम मुळे व नायब तहसीलदार (निवासी) मनोहर नकितवाड, मंडळ अधिकारी संजय वाघमारे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान, उमरखेड येथे पार पडले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणी व कंट्रोल युनिट हाताळणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व बाबीची माहिती देण्यात आली. संकलन केंद्रावर निवडणूक साहित्य आणि तपासणीबाबत माहिती देण्यात आली. या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे बदल झालेले, टपाली मतदान, 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या मतदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सी-व्हीजील ॲप, मतदारांना ‘नो युवर कँडीडेट’यासह विविध ॲपची माहिती देण्यात आली. *******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (15- हिंगोली) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी घेतला निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि.21 : मतदानपूर्व आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापली भूमिका आणि जबाबदारी योग्य पद्धतीने समजून घ्यावी. राष्ट्रीय कर्तव्यावरील ही जबाबदारी पार पाडताना कोणतीही चूक होता कामा नये, याची सर्वांची दक्षता घेण्याचे निर्देश उमरखेडचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी दिले. तहसीलदार आर. यु. सुरडकर, नायब तहसीलदार वैभव पवार, मंडळ अधिकारी संजय वाघमारे यावेळी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट आदी साहित्य वाटप, स्वीकरणे आणि मतदानोत्तर ते सर्व साहित्य परत स्ट्राँग रूमकडे घेऊन येताना घ्यावयाची संपूर्ण खबरदारी कर्तव्य पार पाडताना लक्षात ठेवावी. या काळात कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक होता कामा नये, असे सांगून सहायक निवडणूक अधिकारी डॉ. मुळे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवार, दि. 25 एप्रिल रोजी साहित्य वाटप व 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदानानंतर मतदानाचे साहित्य स्वीकार करणे, मतदानाची प्रभागनिहाय टक्केवारी क्षेत्रीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून दर दोन तासाला टक्केवारी ऑफलाइन गोळा करून अहवाल नियंत्रण अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश डॉ. मुळे यांनी दिले. 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झोन निहाय मतदानाची टक्केवारी क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वेळेत पाठवावी. यामध्ये संबंधितांना अडचण आल्यास प्रत्यक्ष कामकाज करण्यापूर्वी ती प्रक्रिया समजून घेण्याच्या सूचनाही सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी उपस्थितांना दिल्या. ******

20 April, 2024

हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. गर्भवती महिला व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो वेळीच उपचार घ्यावा. आवश्यक उपाययोजना : कीटकनाशक, आळी नाशकाची, डासोउत्पत्तीस्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडणे, डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप साठे व्यवस्थित झाकून ठेवावे, इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये, वैयक्तिक सुरक्षतेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्तीचा वापर, घरांच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावणे, घराच्या सभोवतालील परिसरामध्ये पाण्याची डबके साचू देऊ नये. ते वाहते करावी किंवा त्यामध्ये जळके ऑइल किंवा रॉकेल टाकावे, नारळाच्या करवंट्या, टायर्स, फुलदाण्या, कुलर्स यामध्ये पाणी साचू देऊ नये. कोरडा दिवस पाळा, हिवताप, डेंगू आजार टाळा : आठवड्यातून एक दिवस शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. या दिवशी आपल्या घरातील सर्व पाणी साठा स्वच्छ पुसून कोरडे करून त्यामध्ये पाणी भरावे. जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे आणि हिवताप, डेंगू आजार टाळावा, असे आवाहनही जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. ******

निवडणूक खर्चाची तृतीय लेखे तपासणी 23 एप्रिल रोजी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची तृतीय निवडणूक खर्च लेखे तपासणी मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा कोषागार कार्यालय हिंगोली येथे ही तपासणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांच्या उपस्थितीत ही तपासणी होणार आहे. निवडणूक खर्च सादर करण्यात अपयशी ठरलेले उमेदवार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 (1) अंतर्गत दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र राहतील, असे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

19 April, 2024

लोकसभा निवडणुकीमुळे 25 एप्रिल रोजीची स्थानिक सुट्टी रद्द

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन 2024 या वर्षासाठी गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 रोजी हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अल उर्फ चिरागशहा दर्गा संदल ऊर्स हिंगोली, बुधवार‍ दि. 11 सप्टेंबर, 2024 साठी ज्येष्ठा गौरीपूजन (महालक्ष्मी) व गुरुवार दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुदर्शी याप्रमाणे तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान दि. 26 एप्रिल रोजी असल्याने मतदानाच्या सुट्टीसह 25 ते 28 एप्रिलपर्यंत सलग चार दिवस शासकीय सुट्या येत आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या लोकसभा मतदानाच्या टक्केवारीवर या सुट्ट्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 25 एप्रिल, 2024 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द केल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. *****

आदर्श आचारसंहितेची प्रकरणे विचारात घेण्यासाठी स्थायी समितीची स्थापना

हिंगोली (जिमाका), दि. 19 : सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सहकार्याने निवडणूक आचारसंहिता, आदर्श आचारसंहितेच्या अनुपालनाची खात्री करण्यासाठी आणि त्या संहितेच्या उल्लंघनाची विनिर्दिष्ट प्रकरणे विचारात घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञावंत मोरे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आर. आर. कोरडे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)चे जिल्हाध्यक्ष अंकुशराव बुधवंत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ऊर्फ बंडू कुटे, उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)चे जिल्हाध्यक्ष अजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोपाल पांडूरंग ढोणे व 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार या समितीचे सदस्य असणार आहेत. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. उपरोक्त समितीमार्फत निवडणुका या निर्भिड व निष्पक्ष वातावरणात पार पडतील तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही आणि सर्व उमेदवारांमध्ये सहकार्याची भावना राहील, याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तथा 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे. *****

18 April, 2024

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मद्यपी उपअभियंत्यावर कारवाई

हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गंत 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय डॉ. सखाराम मुळे यांनी आज निवडणूक कर्तव्यावर असताना उपअभियंता माधव उघडे याने मद्यप्राशन करून निवडणूक कामात व्यत्यय आणल्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार आर. यु. सुरडकर उपस्थित होते. उप अभियंता माधव गोविंद उघडे सिलिंग मशीनचे काम चालू आहे. आज शुक्रवार (दि. 18) रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे काम सुरू होते. या अधिकाऱ्याची टेबल क्रमांक 27 व नियुक्ती करण्यात आली होती. ईव्हीएमबाबत काम सुरु असताना तो मद्यपान करून येत निवडणूक कामात व्यत्यय आणला. तसेच त्याने टेबलवरील ईव्हीएम व सिलिंग व्यवस्थित व अचूक केली नाही. त्याला या कामात सुधारणा करून दुरुस्ती करण्यास सांगितले असता, त्याने नकार देत दिला. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून येणे व राष्ट्रीय कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा केल्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुळे यांनी तात्काळ दखल घेतली. नायब तहसीलदार व्ही. व्ही. पवार यांनी सदरील मद्यधुंद अधिकाऱ्याविरोधात लोकप्रतिनिधी १९५१ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये तात्काळ फिर्याद देण्यात आली. सदर व्यक्तीला उत्तरवार ग्रामीण रुग्णालय, उमरखेड येथे रक्ताचे नमुने घेत तपासणीसाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. *****

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम आजपासून सुरू

हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गंत 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय डॉ. सखाराम मुळे व तहसीलदार आर. यु. सुरडकर, सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या देखरेखीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम सुरू आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. या कामाकडे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी लक्ष घातले असून, संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्याबाबत दक्षता घेत आहेत. *****

निवडणुकीचे पोस्टर्स, पॉम्पलेट प्रकाशित करताना मुद्रकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि. 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 आणि आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने प्रिंट माध्यमामध्ये प्रकाशकाद्वारे प्रकाशित केलेली सामग्री आदर्श आचारसंहिता किंवा वैधानिक योजनेच्या चौकटीनुसार अयोग्य असल्याचे आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चितीसाठी प्रकाशकाची माहिती प्रकाशित सामग्रीच्या मुख्य पृष्ठावर उघड करणे आवश्यक आहे. निवडणुकीचे पोस्टर्स, पॉम्पलेट्सच्या मुख्य पृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव, पत्ता मुद्रीत करणे आवश्यक आहे. प्रकाशक व मुद्रकाचे नाव व पत्ता न टाकता मुद्रण किंवा प्रकाशन करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. आयोगाच्या वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी सर्व महानगर पालिका, नगर पालिका अधिकाऱ्यांच्या किंवा होर्डींग, पोस्टर्स, बॅनर्स इत्यादीसाठी जबाबदार असलेल्या अशा प्राधिकरणांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंद प्रिंटींग प्रेस, विकास प्रिंटर्स, सुरभी ऑफसेट, माऊली ऑफसेट, गुरु ग्राफिक्स यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील इतर सर्व मुद्रकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या पोस्टर्स, पॉम्पलेटसच्या मुख्य पृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव, पत्ता मुद्रीत करूनच प्रकाशित करावेत. तसेच मुद्रीत केलेल्या पोस्टर्स, पॉम्पलेटच्या प्रत्येकी दोन प्रती जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समितीला सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, हिंगोली दिले आहेत. ******