21 April, 2024

निवडणुकीचे दैनंदिन लेखे सादर न केलेल्या तीन उमेदवारांना दुसरी नोटीस • विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर होणार कारवाई

हिंगोली (जिमाका), दि. 21 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्च नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवाराचा होणारा दररोजचा खर्च सनियंत्रण पथकास दि. 15 एप्रिलपर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु दि. 15 एप्रिल, 2024 च्या रोजीच्या खर्च तपासणीस तीन उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने दि. 16 एप्रिल रोजी नोटीस देऊन 48 तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीसाठी सादर करण्याबाबत कळविले होते. परंतु अनिल देवराव मोहिते, श्रीमती वर्षा देवसरकर, अशोक पांडूरंग राठोड या तीन उमेदवारांनी नोंदवही व खर्चाचे प्रमाणके अद्याप सादर केलेली नाहीत. तसेच त्यांनी दि. 15 व 19 एप्रिल रोजीही निवडणूक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे सादर केले नाहीत. त्यामुळे निवडणूक खर्चाच्या निर्देशांचे संकलन विभाग सी (1) पृष्ठ क्रमांक 76, 77 मधील निर्देशानुसार व भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार न्यायालयात तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर सोमवार, दि. 22 एप्रिल, 2024 पर्यंत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण कक्ष, जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास निवडणुकीदरम्यान वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ********

No comments: