13 April, 2024

निवडणूक खर्चाची प्रथम लेखे तपासणी 15 एप्रिल रोजी हिंगोली (जिमाका), दि 13 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रथम निवडणूक खर्च लेखे तपासणी 15 एप्रिल रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे, जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे ही तपासणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही तपासणी करुन घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांच्या उपस्थितीत ही तपासणी होईल. या लेखे तपासणीसाठी अनुपस्थित राहणाऱ्याविरुद्ध निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील बाब क्र. 77 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. दिनांक 15 एप्रिल रोजी पहिली तपासणी असल्यामुळे आणि बरेच उमेदवार नवीन असल्यामुळे त्यांना नोंदवह्या ठेवण्याबाबतची परिपूर्ण माहिती असेल असं म्हणता येणार नाही. जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण समितीतील सदस्यांनी त्यांच्याकडे दिलेल्या उमेदवारांना नोंदवही कशी भरावी याची माहिती द्यावी व खर्च नोंदवह्या तपासणीसाठी येताना बँकेचे पासबुक तसेच इतर अत्यावश्यक कागदपत्रे जसे काही उमेदवारांनी प्रतिनिधींची नेमणूक केली असल्यास तसे प्राधिकृत पत्र उमेदवाराच्या स्वाक्षरीचे व इतर अत्यावश्यक माहिती घेऊन यावेत. दि. 15 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे खर्च नोंदवह्या तपासण्यासाठी कोषागार कार्यालय येथे येत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक खर्च निरीक्षक यांनीही त्यांच्याकडे असलेले सर्व अभिलेखासह जिल्ह्यातील खर्च नियंत्रण कक्षामध्ये दि. 15 एप्रिल, 2024 रोजी दहा वाजता उपस्थित राहावे. सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी त्यांच्याकडील सर्व अभिरुप नोंदवह्या व उमेदवारवाराने आतापर्यंत केलेला खर्च या बाबतची माहिती तातडीने ई-मेलवर सादर करावी, असेही खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. अनुपस्थितीत राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांच्या अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये 3 वर्षाच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. *****

No comments: