21 April, 2024

अवैध रेती उत्खनन करणाऱ्याविरुध्द गुन्हा नोंद महसूल विभागाची कारवाई

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या विशेष पथकाद्वारे सेनगाव तालुक्यातील लिंबाळा (हुडी) येथे बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रेतीचे उत्खनन होत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे कळताच शुक्रवारी रात्री 10 वाजता लिंबाळा (हुडी) येथे पथकाने भेट दिली. यावेळी लिंबाळा (हुडी) येथील गट क्र. 7 मध्ये सेक्शन पाईपसह बोट आढळून आली. पथक आल्याचे पाहताच ऑपरेटरनी ठिकाणाहून पळ काढला. पथकाने त्या ठिकाणाहून रेती उत्खनन करणारी बोट, सेक्शन पाईप, लोखंडी पाईप, ड्रम इत्यादी साहित्य ताब्यात घेऊन ते साहित्य सेनगाव तहसील कार्यालयात जमा केले. याची स्थानिक चौकशी केली असता सदरील बोट गोपाल शामसुंदर दुबे रा.हिंगोली यांची असल्याची बाब निदर्शनास आली. त्याआधारे पोलीस स्टेशन सेनगाव येथे भादवि संहिता कलम-379 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व 48 (8) नुसार संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही जप्त बोट शुक्रवारी नष्ट करण्यात आली. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, मंडळ अधिकारी सर्वश्री. एस. जी. झोळगे, घुगे, दंडिमे, तलाठी सर्वश्री. प्रशांत देशमुख, पुरुषोत्तम हेंबाडे, मोहीब, सोमटकर, गळाकाटू, उपेंद्र पत्की, नवनाथ वानोळे, काळबांडे, कोतवाल प्रल्हाद घोडके, राजू सावंत, वाहनचालक व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्ण केली असल्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: