23 April, 2024

अठरा वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजी लसीकरण

हिंगोली (जिमाका), दि. 23 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी या एप्रिल महिन्यात सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम मे, जून कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थी शोधण्याकरिता आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्याची यादी तयार होणार आहे. सोबतच सक्रीय क्षयरुग्ण शोध व संशयित क्षयरुग्ण शोधण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्याचे मे महिन्यात प्रत्यक्ष लसीकरण होणार असून सर्व प्रशिक्षित लस टोचक यांच्याद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण सत्राचे दिवस वगळून विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस अत्यंत सुरक्षित असून भारतात ही लस इ. स. 1978 पासून बालकांचे लसीकरण करण्यासाठी वापरात आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे व जोखमीच्या घटकातील 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी कर्मचाऱ्याकडे प्री रजिस्ट्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांनी केले आहे. लस कोणाला द्यावी : पूर्वी टीबीचा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण, क्षयरुग्णाच्या सहवासीत राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षयरुग्णाच्या सहवासात राहत असलेले व्यक्ती, 60 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेले व्यक्ती (स्वयंघोषित), ज्यांना धुम्रपानाचा पूर्व इतिहास अशा व्यक्ती, ज्या व्यक्तीचा बॉडी माक्स इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, अशा नागरिकांना बीसीजी लसीकरण करण्यात येते, अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. लस कोणाला देऊ नये : अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती, जे व्यक्ती संमती पत्रावर सही करणार नाही अशा व्यक्ती, ज्या व्यक्तींना एचआयव्हीचा पूर्व इतिहास आहे अशा व्यक्ती, गरोदर व स्तनदा माता, ज्यांनी मागील तीन महिन्यात रक्त चढवून घेतलेले आहे अशा व्यक्ती, बीसीजी लसीकरणाचा दुष्प्रभावाचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती, सध्या कुठल्याही आजाराचा उपचार घेत असणाऱ्या व्यक्तींना बीसीजी लस देऊ नयेत, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी दिली आहे. *******

No comments: