22 April, 2024

उमेदवारांनी मतदानापूर्वी यादी तपासून घ्याव्यात- निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना

हिंगोली (जिमाका), दि.22 : सर्व उमेदवारांनी आपल्या पोलींग एजंटमार्फत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मतदार यादी प्राप्त होताच तपासून घ्याव्यात, असे आवाहन निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज येथे उमेदवारांना केले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित श्रीमती अर्चना यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला निवडणूक (खर्च)निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, सुशांत उबाळे आणि श्रीमती पुष्पा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इलेक्ट्रोल रोल अथवा इतर कोणतीही समस्या असल्यास उमेदवारांनी ते तात्काळ तपासून घ्यावेत. तसेच पोलींग एजंटही तात्काळ नेमावेत. यामध्ये काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींना तात्काळ मतदार यादीची तपासणी करून घेण्याबाबत सूचना कराव्यात. तसेच मतदान केंद्रावर जावून नावे तपासून घ्यावीत. पोलींग एजंट शिवाय मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जावू शकत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोहोचावे. काही अडचण असल्यास १९५० या क्रमांकावर किंवा सी व्हीजील ॲपवर तक्रार नोंदवावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी यावेळी सांगितले. उद्या सर्वांनी वेळेत येऊन आपले खर्च लेखे तपासून घ्यावेत. लेखे तपासणी करून घेण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उद्या मंगळवार, दि. 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी वेळेत दाखल करून घ्यावेत, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी यावेळी सांगितले. मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी 75 मिनिटे मॉक पोल सुरु होईल. तत्पूर्वी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या पोलींग एजंटांनी उपस्थित राहावे. या पोलींग एजंटांचे ओळखपत्र, तेथील प्रत्यक्ष कामकाज, मतदानाची प्रक्रिया पाहतील. उमेदवारांनी या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांकडून मतदान करून घेत प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढवण्यास आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. *****

No comments: