24 April, 2024

घरोघरी जावून मतदारांमध्ये जनजागृती करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर

* मतदारसंघात शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाचे आवाहन * सकाळच्या सत्रातच मतदान करून घेण्यावर भर हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगोली लोकसभा मतदार संघात 100 टक्के मतदान होण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) संदीप सोनटक्के आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पापळकर म्हणाले, कोणत्याही पक्षाचा अभिनिवेष न करता कोणालाही मतदान करा, अशी घोषणा करा, मतदानाची टक्केवारी वाढवा. बाहेरगावी गेलेल्या मतदारांची आदल्या दिवशीच तपासणी करून त्यांचे मतदान करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करा. एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना मतदान केंद्राच्या बाहेर मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सकाळी 7 ते 10 यावेळेत जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावेत. महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करावे. यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढता येईल. एखादे मतदान केंद्र दूर असल्यास ने-आण करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्या वाहनावर ‘निवडणूक आयोगाच्या सेवार्थ’ असा फलक लागलेला असावा. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे. तसेच गावात असलेल्या संस्थानातील ध्वनीक्षेपकाद्वारे प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची मतदार यादीतील नावे शोधून द्यावीत. त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे. तसेच दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. प्रत्येक घरी बीएलओ मार्फत मतदान चिठ्ठी पोहोच करावी. शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी आवश्यक त्या सोयी सुविधा वाढवून व मतदारामध्ये जनजागृती करुन जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी घरोघरी भेटी देण्याचे गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे विभागाचे उप मुख्य कार्यकारी यांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबवून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करतील यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून आवाहन करावेत. बीएलओंनी मतदारांची यादीतील नावे तपासून द्यावीत. मतदारांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय करावी. तसेच आवश्यक सुविधा पुरवाव्यात व जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी सर्व सबंधित अधिकारी व यंत्रणेला दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. तसेच मतदान केंद्रावर रॅम्प, व्हील चेअर, शौचालय व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. आणि जास्तीत जास्त मतदार करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया, आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर व संदीप सोनटक्के यांनी केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. ********

No comments: