24 April, 2024

मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज • मौजे शिरड शहापूर येथील नमुना 12 डी भरून दिलेला एकही मतदार मतदानापासून वंचित नाही

हिंगोली, (जिमाका) दि. 24: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारासंघासाठी शुक्रवार, दि. 26 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने गृहभेटी घेत निवडणूक विभाग त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. लोकसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी डोंगर-दऱ्या, माळरान, आणि धरणांच्या काठावर राहणाऱ्या झोपडीपर्यंत पोहोचत त्यांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघात दिव्यांग 2219 आणि ज्येष्ठ मतदार 5319 असे एकूण 7 हजार 538 मतदारांना 12 ड नमुने वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 52 दिव्यांग मतदारांनी तर 85 ज्येष्ठ मतदार असे एकूण 137 अर्ज बीएलओंमार्फत सहायक निवडणूक अधिकारी वसमत यांना प्राप्त झाले होते. या सर्व दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांच्या मागणीनुसार गृहभेटी घेत मतदान करून घेण्यासाठी पथक 14 आणि 15 एप्रिल रोजी त्यांच्याकडे पोहोचले. या प्रथम भेटीमध्ये मतदार न भेटल्यामुळे त्यांनी 20 एप्रिल रोजी दुसरी गृहभेट घेण्यात आली. या दोन्ही गृहभेटीमधून निवडणूक यंत्रणेच्या पथकांनी 14 एप्रिल रोजी 64 ज्येष्ठ मतदारांचे तर 38 दिव्यांग मतदारांचे असे एकूण 102 जणांचे मतदान करून घेण्यात आले तसेच 15 एप्रिल रोजी 15 ज्येष्ठ तर 12 दिव्यांग असे 27 मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. तर 20 एप्रिल रोजी एका दिव्यांग मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. या ज्येष्ठ 79 आणि 51 दिव्यांग अशा एकूण 130 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 12 डी भरून दिल्यानंतर दरम्यान 2 मतदारांचा मृत्यू झाला तर 5 मतदार अनुपस्थित होते. त्यामुळे वरील अनुपस्थित असलेल्या 5 मतदारांना 26 एप्रिल रोजी त्यांच्या केंद्रावर मतदान करता येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागाने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. गृहभेटीद्वारे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी दोन वेळा निवडणूक यंत्रणा त्यांच्या दारापर्यंत पोहचत त्यांनी या लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला. दोन गृहभेटीमध्ये संबंधित मतदाराची भेट न झाल्यामुळे तो मतदार येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे. मौजे शिरड शहापूर येथील एकूण 5 मतदान केंद्रांच्या बीएलओंकडे गृहभेटी मतदान करून घेण्यासाठी ज्येष्ठ मतदारांसाठी 158 तर 20 दिव्यांग मतदारांना नमुना 12 डी वाटप करण्यात आले होते. त्यापैकी संबंधित पथकातील बीएलओंना केवळ 2 ज्येष्ठ मतदारांनी नमुना 12 डी भरून दिला होता. त्यानुसार 2 ज्येष्ठ मतदारांचे 14 एप्रिल रोजी पथकाने गृहभेटीदरम्यान मतदान करून घेतले. त्यामुळे शिरडशहापूर येथे नमुना 12 डी भरून देण्यात आलेला एकही ज्येष्ठ किंवा दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहिलेला नाही, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ***

No comments: