25 April, 2024

निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांच्याकडून यंत्रणेचा आढावा

• मतदार संघाच्या सीमांवर काटेकारेपणे तपासणी करण्याचे निर्देश • अचूक नोंदीवर निवडणूक विभागाचा विशेष भर हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून खर्चाच्या अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना खर्चाचे निवडणूक निरीक्षक अन्वर अली यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दीपक खंदारे, जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते, संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी उपस्थित होते. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी यावेळी दिले. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या. लोकसभा मतदार संघात कोठेही संशयास्पद अवैध मद्य विक्री व साठा, रोख रक्कमेचे वितरण, विविध साहित्य वाटप यासारखे अनुचित प्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्थिर संनियंत्रण (एसएसटी) पथकामध्ये वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग व पोलीस विभागाने लक्ष ठेवावेत. सीमेवर येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश श्री. अन्वर अली यांनी दिले. तसेच जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समिती पथक प्रमुखाने एकही पेड न्यूज नसल्याचे सांगितले. ********

No comments: