11 April, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्याकडून तपासणी नाके, मतदान केंद्राची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि.10 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रेणेने वेग घेतला असून, मतदारसंघात निवडणूक निरीक्षक संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी मतदारसंघातील विविध विधानसभा मतदसंघनिहाय तपासणी नाके आणि मतदान केंद्रांना भेटी देऊन पथकांकडून करण्यात येणा-या निवडणूक‍विषयक कामांची पाहणी केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे आणि हदगावचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार, हिमायतनगरच्या तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर, संपर्क अधिकारी सुनिल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्र आणि तपासणी नाक्यांना भेट देत पाहणी केली. तसेच मतदान केंद्रांवरील तयारी आणि तपासणी नाक्यांवरील यंत्रणेच्या मतदान केंद्रावरील सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. सध्या उन्हाळा सुरू असल्याने मतदान केंद्रावरील पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणारे साधन उपलब्धतेची पाहणी करत समाधान व्यक्त केले. शहरातील पंचशील हायस्कूल व विवेकानंद हायस्कूल येथील मतदान केंद्रावर तसेच तालुक्यातील ल्याहरी, डोरली, केदारगुडा या गावातील मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रांवर मतदारांना मतदानाच्या दिवशी सर्व सोयीसुविध उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. दिव्यांग मतदारांना मतदान करताना व्हीलचेअर, ज्येष्ठ मतदारांसाठी केंद्रावर असलेल्या सुविधा, पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी करण्यात येणारा निवारा, आदी बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना श्रीमती अर्चना यांनी केल्या. कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील एस. एस. टी पथकास भेट देऊन पाहणी केली. मतदान अधिकारी यांच्या होणाऱ्या प्रशिक्षण ठिकाणी शहरातील सुमन गार्डन मंगल कार्यालयास ही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. निवडणूक निरीक्षकांनी घेतला सेल्फी मतदानाचा टक्का वाढावा आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक‍ निर्णय अधिकारी मतदारसंघात विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे नवमतदारांसह सर्वांना मतदान केल्यानंतर सेल्फी काढता यावा आणि इतर मतदारांना समाजमाध्यमांवरून मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी. मतदारांमध्ये मतदान करण्याप्रती जनजागृती व्हावी, यासाठी मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनीही आज हदगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर जनजागृती करणाऱ्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज येथील खर्च निरीक्षक पथकास तसेच एक खिडकी पथक आणि मीडिया कक्षास त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील होत असलेल्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. निवडणूक स्ट्रॉंग रूमची ही त्यांनी पाहणी करत निवडणूक साहित्य स्वीकृती व वाटप पथकाला, पोस्टल बॅलेट पथकाला भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सहाय्यक निवडणूक खर्च पथकातील गणेश पुजारी, सचिन कदरे सोनकांबळे, मीडिया कक्षातील नायब तहसिलदार तथा पथक प्रमुख अनिल तामसकर, अनिल दस्तूरकर, राजेश येलूतवाड, नायब तहसिलदार दामोधर जाधव, एक खिडकी पथकातील ए. एम. तामसकार, सतिश देशमुख यांच्यासह सर्व कर्मचारी कक्षात उपस्थित होते. *****

No comments: