13 April, 2024

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत प्राप्त होण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि 13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने ‘समता पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 25 एप्रिलपर्यंत जातपडताळणी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समता पंधरवड्यात सन 2023-24 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने समता पंधरवड्यात जिल्ह्यातील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे. ******

No comments: