18 April, 2024

निवडणुकीचे पोस्टर्स, पॉम्पलेट प्रकाशित करताना मुद्रकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि. 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 आणि आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने प्रिंट माध्यमामध्ये प्रकाशकाद्वारे प्रकाशित केलेली सामग्री आदर्श आचारसंहिता किंवा वैधानिक योजनेच्या चौकटीनुसार अयोग्य असल्याचे आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चितीसाठी प्रकाशकाची माहिती प्रकाशित सामग्रीच्या मुख्य पृष्ठावर उघड करणे आवश्यक आहे. निवडणुकीचे पोस्टर्स, पॉम्पलेट्सच्या मुख्य पृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव, पत्ता मुद्रीत करणे आवश्यक आहे. प्रकाशक व मुद्रकाचे नाव व पत्ता न टाकता मुद्रण किंवा प्रकाशन करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. आयोगाच्या वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी सर्व महानगर पालिका, नगर पालिका अधिकाऱ्यांच्या किंवा होर्डींग, पोस्टर्स, बॅनर्स इत्यादीसाठी जबाबदार असलेल्या अशा प्राधिकरणांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंद प्रिंटींग प्रेस, विकास प्रिंटर्स, सुरभी ऑफसेट, माऊली ऑफसेट, गुरु ग्राफिक्स यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील इतर सर्व मुद्रकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या पोस्टर्स, पॉम्पलेटसच्या मुख्य पृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव, पत्ता मुद्रीत करूनच प्रकाशित करावेत. तसेच मुद्रीत केलेल्या पोस्टर्स, पॉम्पलेटच्या प्रत्येकी दोन प्रती जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समितीला सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, हिंगोली दिले आहेत. ******

No comments: