30 June, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ;  तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

40 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार  आरटीपीसीआर टेस्टद्वारे  हिंगोली परिसरातील 01 व्यक्ती  कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर आज 02 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 18 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 21 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 943 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 521 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 40  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 382 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

**** 

 आस्थापना, दुकाने उघडण्याच्या वेळेबाबत सुधारित आदेश जारी

 

खानावळ, रेस्टॉरंट शनिवार, रविवार बंद परंतु पार्सल, घरपोच सुविधा देण्यास परवानगी 

 

हिंगोली (जिमाका) , दि. 30 :  शासन निर्देशानुसार हिंगोली जिल्हा लेवल तीनमध्ये येत असल्याने व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दि. 30 जून, 2021 रोजी पासून पुढील आदेश लागू होईपर्यंत आस्थापना व दुकाने उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

1. हिंगोली जिल्हा लेवल तीनमध्ये येत असल्याने जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. यामुळे संचारबंदी व जमावबंदी काळात वैध कारणाशिवाय आणि ज्या बाबींना , सेवा आणि क्रियांना परवानगी देण्यात आली आहे, अशांना केवळ वेळेचे पालन करुन या काळात सूट देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असेल आणि सायंकाळी 5.00 ते सकाळी 5.00 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी असेल.

2. अत्यावश्यक सेवा बाबी : जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक / संस्थेसाठी) विक्रेते यांची दुकाने, आस्थापना दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00  या वेळेप्रमाणे चालू करण्याची परवानगी राहील. या कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना दैनंदिन सकाळी  6.00 ते  9.00 आणि सायंकाळी 6.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.

जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे,कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 पर्यंत चालू राहतील.

3. जिल्ह्यातील इतर आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) : जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने, आस्थापना यांना दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु ही दुकाने, आस्थापना ह्या शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद असतील. जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट कोरोनाचे पालन करुन ग्राहकांच्या 50 टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी  9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत उघडण्यास आणि ग्राहकांना खानावळ , रेस्टॉरंटमध्ये सेवा देण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट हे शनिवार आणि रविवार बंद असतील. परंतु पार्सल, घरपोच सुविधा देण्यास परवानगी असेल.

4. कार्यालयीन उपस्थिती : जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये दुपारी 4.00 पर्यंत चालू राहतील. अपवादात्मक जसे की, खाजगी बँका, विमा कंपनी, औषधी संबंधित कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था यांची कार्यालये नियमित सुरु राहतील. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये क्षमतेच्या 50 टक्क्यानुसार सुरु राहतील. परंतु अत्यावश्यक सेवा, कोरोना कामकाज, मान्सून संबंधित यंत्रणा, दुय्यम निबंधक, एमएसआरटीसी हे कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

5. लग्न समारंभ : या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पाडावेत. जर पारंपारिक पध्दतीने लग्न आयोजित करावयाचे असल्यास वर-वधू मिळून केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात यावे. यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही . परंतु लग्न समारंभ आयोजित करत असल्याची पूर्वकल्पना संबंधित तहसील कार्यालयास देणे बंधनकारक आहे.

6. अत्यंविधी / अत्यंसंस्कारासाठी  केवळ 20 नागरिकांना परवानगी असेल.

7. खाजगी प्रवासी वाहतूक : जिल्ह्याबाहेर खाजगी वाहनाद्वारे, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी  परवानगी असेल. परंतु राज्यातील लेवल-5 या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी किंवा त्या जिल्ह्यातून प्रवास करण्यासाठी ई-पास घेवून प्रवास करने बंधनकारक असेल.

8. सार्वजनिक प्रवासी वाहतूक : MSRTC मालकीची वाहने शासन निर्देशाप्रमाणे पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास परवानगी असणार नाही. तसेच सर्व प्रवाशांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

9. माल वाहतूक : माल वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत केवळ 03  व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल.

10. बँका : जिल्ह्यातील सर्व बँका शासकीय कामकाजासाठी, व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी, शेतकऱ्यांची पिक कर्जाची कामे, सर्व सामान्य नागरिकांसाठी इत्यादी कामकाजसाठी बँकेच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

11. उद्योग : जिल्ह्यातील सर्व प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्यास शासन निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल.

12. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने येथे फिरणे, सायकलींग, सर्व क्रीडा प्रकारास (outdoor) परवानगी असेल. या क्रीडा प्रकारास सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 आणि सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत परवानगी असेल .

13. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बांधकामास परवानगी असेल. शक्यतो बांधकाम मजुरांना साईटवर राहण्याची व्यवस्था असावी.

14. जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, स्पा, केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर यांना केवळ 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी असेल. परंतु दुकानात एसी (AC)  उपकरण लावण्यास परवानगी नसेल.

15. जिल्ह्यातील लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ 50 नागरिकांच्या क्षमतेने लग्न आयोजित करण्यासाठी परवानगी असेल.

16. जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सभा, बैठका इत्यादी कार्यक्रमांना हॉलच्या 50 टक्के क्षमतेच्या नगरिकांच्या उपस्थितीत दुपारी 4.00 पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी असेल.

17. जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रशिक्षण, बैठका, एसबीआय आरईएसटीआय प्रशिक्षण इत्यादींना त्यांचे कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन आयोजित करण्यास परवानगी असेल.

18. जिल्ह्यातील सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स हे पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

19. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. (धार्मिक स्थळाशी संबंधित 02 व्यक्तींसाठी दैनंदिन विधीसाठी परवानगी असेल) तसेच धार्मिक जत्रा, यात्रा, उरुस, मिरवणूक इत्यादींना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.

20. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग) बंद असतील. केवळ ऑनलाईन शिकवणी वर्गासाठी परवानगी असेल.

21. जिल्ह्यात आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चा यांना पूर्णपणे बंदी असेल.

22. या आदेशानुसार ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे केवळ अशांनाच सद्यस्थितीत परवानगी राहील. तसेच या आदेशात ज्या आस्थापना, दुकाने, कार्यक्रम यांचा उल्लेख करण्यात आला नाही अशांना पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात बंदी असेल.

हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत  लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

****

29 June, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण ;  तर 05 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

41 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार  रॅपीड ॲटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे  हिंगोली परिसर 03 व्यक्ती व औंढा परिसर 01 व्यक्ती असे एकूण 05 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 05 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 20 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 23 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 942 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 519 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 41  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 382 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

**** 

 

परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29  : आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक पात्रता, अटी व शर्ती इत्यादीची माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत.

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन दिनांक 30 जून, 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

 कोविड-19 महामारीत मृत्यू झालेल्या चर्मकार समाजातील कुटुंबियांनी  

व्यवसायासाठी स्माईल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29  : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिविज्युल्स फॉर लाईव्हलीहूडस एन्टरप्राईज (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे, अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत 5 लाख रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत एनएसएफडीसी कडून 6 टक्के व्याजदराने 4 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तसेच 01 लाख रुपये भांडवली अनुदान देण्यात येणार आहे.

यासाठी मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात-पोटजात, मृत्यूचा दिनांक , रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न (तीन लाख रुपयांच्या आत) इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. तसेच https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7  या लिंकवर  भरण्यात यावी,  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (म.), हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

**** 

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 250.60 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 7.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 250.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 31.51 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 29 जून, 2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसात दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहेत.

हिंगोली 13.30 (250.80) मि.मी., कळमनुरी 6.10 (254.10) मि.मी., सेनगांव 7.60 (241.30) मि.मी., वसमत 3.40 (233) मि.मी., औंढा नागनाथ 4.80 (289.30) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 250.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

 ****

 



हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी शासन कटिबध्द

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

·   हिंगोलीसाठी 24.78 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29: हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मा. राज्यपालांनी घोषित केलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. चालू वर्षी हिंगोली जिल्ह्यासाठी 24.78 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आणखी निधी लागल्यास निधी कमी पडू दिला जाणार नाही. हा अनुशेष दूर करण्यासाठी शासन कटिबध्‍द आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 28 जून, 2021 रोजी हिंगोली जिल्हा सिंचन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू (चंद्रकांत) नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कुलकर्णी, मुख्य अभियंता दिलीपसिंग तंवर, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता उपरवाड, लघुपाटबंधारे जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. नखाते, वसमत पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बिरादार, आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेख आणि नांदेड येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील अनुशेषाची तूट भरुन काढण्यासाठी पूर्णा नदीवरील व सिध्देध्वर धरणाचे खालीस बाजूस पोटा उच्च पातळी बंधारा, जोड परळी उच्च पातळी बंधारा व पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा या तिन्ही बंधाऱ्यांना 28.26 दलघमी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याची किंमत अंदाजे 494 कोटी रुपये असून त्याचा लाभ सुमारे 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रास होणार आहे. हे तिन्ही बंधारे मापदंडात बसत नाहीत परंतु हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष लक्षात घेता विशेष बाब म्हणून मापदंड काही प्रमाणात शिथिल करुन शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच कयाधू खोऱ्यातील शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यास विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यात येतील. या पाण्याचे इस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पूर्णा प्रकल्पाच्या कालव्यांची वहन क्षमता 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. डीप कटमध्ये अनेक वर्षापासून गाळ साचला आहे. दगडी अस्तरीकरणाची पडझड झाली आहे. त्यावरील बांधकामेही 50 वर्ष जुनी असल्याने ढासळली आहेत. या सर्वांची दुरुस्ती करण्यासाठी एसआयएमपी (Support for Irrigation Modernisation Programe) अंतर्गत एडीबी बँक व केंद्र शासनाच्या सहकार्याने निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्पाच्या नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागातंर्गत यांत्रिकी विभागाचे एक कार्यालय हिंगोली येथे स्थलांतरीत करुन नवीन सयंत्रे घेण्यासाठी लवकरच शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

औंढा तालुक्यातील केळी लघु पाटबंधारे तलावात सिध्देश्वर धरणाचे पाणी देण्याबाबत मा.आमदार राजु (चंद्रकांत) नवघरे यांनी मागणी केली. त्याबद्दल प्राथमिक अहवाल देण्याचे निर्देश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना दिले आहेत, अशी माहितीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली. 

****

 

28 June, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 03 रुग्ण ;  41 रुग्णांवर उपचार सुरु

तर एका रुग्णाचा मृत्यू

 

 हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार  रॅपीड ॲटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे  हिंगोली परिसर 01 व्यक्ती असे एकूण 03 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 23 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 26 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 937 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 514 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 41  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 382 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****