05 June, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

 


·   मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात ‘मियावाकी’ पध्दतीने होणार वृक्ष लागवड.

 

हिंगोली,(जिमाका)दि.5: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने वृक्ष लागवड करुन शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जपान हा देश विविध नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी नेहमीच सर्वत्र चर्चेत असतो. ‘मियावाकी’ हा देखील जपान मधील दोन-तीन दशकापूर्वीचा घनदाट जंगल निर्मितीचा प्रयोग आहे. या प्रयोगाचे निर्माते आणि संशोधक डॉ. अकिरा मियावाकी असून, त्याच्या नावानेच ‘मियावाकी’ ही वृक्ष लागवडीची  पध्दत ओळखली जाते. ‘मियावाकी’ पध्दतीमध्ये कमीत-कमी जागेत 50 ते 100 देशी व दुर्मिळ वृक्षाची लागवड केली जाते. या पध्दतीने 20 ते 30 वर्षात घनदाट जंगलाची निर्मिती होऊ शकते. डॉ. अकिरा मियावाकी यांनी त्यांच्या या नाविन्यपूर्ण संशोधनातून आजपर्यंत सुमारे 40 लाखाहून अधिक झाडांची लागवड करुन घनदाट जंगलाची निर्मिती करुन हे सिध्द केले आहे.

त्याच धर्तीवर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘मियावाकी’ पध्दतीने देशी व दुर्मिळ असे विविध प्रजातीच्या 21 हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणे राबविण्यात येत आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची संपूर्ण देशात टंचाई निर्माण झाली होती. ऑक्सिजन अभावी अनेक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तीस गमावले आहेत. या आपत्तीजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने किमान 3 वृक्षाची लागवड करुन त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments: