21 June, 2021

 

 

‘हिंगोली येथे 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा’

योगामूळे मनुष्य निरोगी राहतो

                                     -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


हिंगोली, दि.21 : योगविद्येद्वारे भारताच्या प्राचिन विद्येचे महत्व जगास  कळाले असून दैनंदिन योग साधना केल्याने मनुष्याचे शरिर निरोगी राहण्यास मदत होते. योगाचे महत्व कळावे या साठीच आज सर्व जगात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रिडा विभाग, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय व योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री बेतेवार, श्री. सोनकांबळे यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व देशाला पटवून दिले आहे. शरीर, मन, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी योग हा अतिमहत्त्वाचा असून, जीवनशैली समृध्द करण्यासाठी योगाचे महत्व आहे. त्यामुळेच योग अभ्यासात सातत्य राखण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी योग दिनाचे महत्व प्रत्येक मनुष्यास ज्ञात व्हावे म्हणून जागतिक आरोग्य संघटना व जगातील सर्व देश आज योग दिन साजरा करत असल्याचे यावेळी सांगितले.

योग गुरु सुधाकर महाजन यांनी योग दिनामध्ये सहभाग झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योग दिनाचा शेवट प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने झाला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त येथील परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

****

No comments: