11 June, 2021

12 जून रोजी जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे आयोजन

 


बालकामगार कामावर ठेवू नये

सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 :  बाल कामगार विरोधी दिनानिमित्त दि. 12 जून, 2021 रोजी कामगार विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाल कामगारांना त्यांचे बाल वयात कामावर ठेवल्यामुळे  त्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा येऊन त्यांचे बालपन हिरावले जाते. त्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही. परिणामत: बाल कामगारांचे वैयक्तीक, त्यांचे कुटुंबियांचे  नुकसान होऊन  देशाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. बाल कामगारांना त्यांचे बाल वयात काम करावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते व ते शिक्षणापासून वंचित राहतात, बाल वयातच  कामाच्या ठिकाणी बालकांचे शोषण करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे हिंगोली जिल्हयातील  सर्व कारखानदार,  दुकाने, आस्थापना, हॉटेल व इतर संस्था यांनी त्यांच्याकडे 14 ते 18 वर्षाखालील बाल कामगार कामावर ठेऊ नये. 

            बाल कामगार कामावर ठेवल्यास बाल व किशोरवयीन कामगार ( प्रतिबंध व नियमन) सुधारीत  अधिनियम, 2016  नुसार मालकास 6 महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा  किंवा  किमान वीस हजार रुपये व कमाल 50 हजार रुपये पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. त्यामुळे सर्व संबंधितांनी त्यांच्या आस्थापनेत बाल कामगार कामावर ठेऊ नयेत. अन्यथा बालकामगार कामावर ठेवल्यास आपल्या विरुद्ध बाल कामगार काद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे  आवाहन टी. ई. कराड,  सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली  यांनी केले आहे.

****

No comments: