30 September, 2023

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये स्वछता पंधरवाडा निमित्त स्वछता ही सेवा कार्यक्रमाचे 01 ऑक्टोबर रोजी आयोजन




हिंगोली (जिमाका),दि.३० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त व स्वछता ही सेवा (SHS) 2023 चा एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 01 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात 01 ऑक्टोबर रोजी स्वछतेसाठी एक तारीख एक दिवस उपक्रम राबविण्यात येत आहे. 

             या कालावधीत सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी आपले कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या माध्यमातून स्वछता ही सेवा अभियांन राबविण्याच्या सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग महाराष्ट्रा शासन या प्रशासकीय विभागा अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत हिंगोली जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत नगर, व जामगव्हाण या संस्थेतून राबविण्याच्या सूचना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा  यांनी दिलेल्या आहेत. 

           या स्वछता उपक्रमामध्ये संस्थेच्या परिसरातील नागरिकांनी सुध्दा सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मा. मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभाग यांच्याकडून प्राप्त सुचनेनुसार दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिवडी किल्ला, शिवडी पूर्व,मुंबई येथील कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते  कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमुनरी, वसमत नगर, व आदिवासी आश्रमशाळा जामगव्हाण या सर्व सहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या माध्यमातून हा स्वछता उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

          या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी नजीकच्या संस्थेतील प्राचार्य यांच्याशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन  विशाल प्रमोद रांगणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

 

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत प्रशिक्षण

 



हिंगोली (जिमाका), दि. 30 : कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित  करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. अतुल मुराई विषय, विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) साईनाथ खरात, कार्यालयीन अधीक्षक विजय ठाकरे उपस्थित होते.

            या प्रशिक्षणामध्ये विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. अतुल मुराई यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत विविध योजना व उपक्रम याविषयी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले.  तसेच विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) अनिल ओळंबे यांनी हळद प्रक्रिया उद्योग यामध्ये पॅकिंग, काढणी पश्चात प्रक्रिया, याबद्दल सविस्तर प्रशिक्षण दिले. विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) साईनाथ खरात  यांनी अन्नप्रक्रियेचे महत्व व प्रमाणिकरण यामध्ये उद्यम आधार, (FSSAI) नोंदणी प्रक्रिया, ट्रेड मार्क नोंदणी, जि. एस. टी. नोंदणी याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) राजेश भालेराव यांनी सोयाबीन पिकावरील प्रक्रिया उद्योग तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनेचा विचार करुन प्रशिक्षणार्थींना उद्योग करण्यास प्रोत्साहित केले.                        

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) साईनाथ खरात यांनी तर आभार प्रदर्शन विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)  डॉ. अतुल मुराई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हनवते, प्रेमदास जाधव यांनी सहकार्य केले.

*******

 

‘एक तारीख एक घंटा’ स्वच्छता मोहीम

या उपक्रमांत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन


 

           हिंगोली (जिमाका), दि. 30 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.00 वाजता "एक तारीख एक तास महाश्रमदान" हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.       

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या वर्षाची थीम ‘कचरा मुक्त भारत’अशी या वर्षाची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा मोहिम अंतर्गत दिनांक 01आक्टोंबर रोजी सकाळी 10.00 वाजता "एक तारीख एक घंटा महा श्रमदान" उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत "स्वच्छता ही सेवा दिनांक 01 आक्टोंबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या एक तारीख एक घंटा  महाश्रमदान हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी सुरेश बेदमुथा उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.  स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत  जिल्ह्यातील सर्व  ग्रामीण भागातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक  ग्रामपंचायतीमध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.  

या उपक्रमात ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्वच्छता करतील आणि स्वच्छता उपक्रमाचा दृश्यमान परिणाम दिसण्याच्या दृष्टीने महा श्रमदान करण्यात येणार आहे.  कचरा मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, गावातील मंदिर ,शाळा महाविद्यालय, जलस्त्रोत नदीकाठ, बाजारपेठ, धार्मिक स्थळ, सार्वजनिक व खाजगी कार्यालयाचे परिसर स्वच्छता, पर्यटन स्थळे, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, शाळा अंगणवाडी परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात  येईल. लोक सहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधी, गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, स्वच्छता सेवक, रोजगार सेवक,  गावातील ज्येष्ठ नागरिक, गावातील महिला प्रतिनिधी, बचत गटातील महिला, युवक वर्ग भजनी मंडळ, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावे, असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.

*****

28 September, 2023

 

पोलीस प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने

श्री शांती विद्या मंदीर व रेसन्स इंग्लीश स्कूल येथे बाल कायद्यांची जनजागृती

                                                           


                                                 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर व कुरुंदा पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या समन्वयाने आणि दूरक्षेत्र शिरड शहापूर येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनाने श्री शांती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि रेसन्स इंग्लीश स्कूल (Raysons English School) , शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ येथे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

            या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य)  जरीबखान पठाण यांनी बालसंगोपन योजना व लाभासाठी आवश्यक कागदपत्रे, स्पॉन्सरशीप व फॉस्टर केअर कमिटीचे कार्य याविषयी माहिती दिली. कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बालविवाह प्रतिबंधक अनिधनय, 2006, बालकांचे हक्क व अधिकार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम याबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, चाईल्ड लाईन 1098 ही संकल्पना, मदतीचे स्वरुप, ग्राम बाल संरक्षण समिती याबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे कर्मचारी राजरत्न पाईकराव यांनी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने अडचणीत असणाऱ्या बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन हिंगोली ही कशा प्रकारे मदत करते व पुनर्वसन करते याबाबत माहिती दिली.

            हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. वारल व संदीप जगताप आणि शाळेतील शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

***** 

 

इच्छाशक्ती, जिद्द आणि बँक व महामंडळाच्या सहकार्यामुळे

सुदाम पारोकर यांनी फोटोग्राफी व्यवसायात केली प्रगती


 

            हिंगोली येथील रहिवाशी सुदाम ऊर्फ बालाजी पारोकर यांना पदवीचे शिक्षण घेत असतांना आर्थिक अडचणीचा खूप सामना करावा लागत असे. श्री. पारोकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ भेटत असल्याचे कळाल्यानंतर श्री. पारोकर यांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला भेट दिली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी श्री. पारोकर यांना महामंडळाच्या योजनेची सविस्तर माहिती दिली. ती माहिती ऐकल्यानंतर श्री. पारोकर यांनी त्यांचा आवडता छंद असलेला अभय फोटो स्टुडिओ, नांदेड रोड, निधी कॉम्पलेक्स, हिंगोली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व्यवसाय सुरु केल्यानंतरही त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता.

            त्यामुळे श्री. पारोकर यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे वैयक्तीक व्याज परतावा  योजनेमध्ये अर्ज केला. पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर श्री. पारोकर यांनी बँकेकडे धाव घेतली. कर्ज प्रस्ताव मंजूर करताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. अशावेळी त्यांना महामंडळाच्या कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य करण्यात आले. त्यानंतर श्री. पारोकर यांनी ॲक्सिस बँकेतून अभय फोटो स्टुडिओ या व्यवसायासाठी 11 लाख रुपयांचे कर्ज घेतले. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय छोटा होता. बँकेकडून मिळालेली सर्व रक्कम त्यांनी व्यवसायात गुंतवली. बँकेकडून आर्थिक लाभ मिळाल्यानंतर श्री. पारोकर यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय भरभराटीस आला. बँकेने दिलेल्या कर्जाचा व्याज परतावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने 2 लाख 31 हजार रुपये व्याज परतावा रक्कम मंजूर केले. त्यामुळे इच्छाशक्ती, जिद्द आणि बँकेचे व महामंडळाच्या सहकार्यामुळे त्यांच्या व्यवसायात प्रगती करत शून्यातून विश्व निर्माण करणे शक्य झाले असल्याचे श्री. पारोकर सांगतात.

महामंडळाने कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील, इतर महामंडळाचे संचालक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.   

                                                                                                            - चंद्रकात स. कारभारी

                                                                                                               माहिती सहायक/उपसंपादक,

                जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******* 

 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

                                                                                                             

                हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी  दि. 05 ऑक्टोबर ते 07 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि. अमरावती या कंपनीमध्ये पिकर-पॅकर, वॉयर-हर्नेस मशीन ऑपरेटरची दहावी, बारावी, आयटीआय शैक्षणिक पात्रतेची 35 पदे ही 18 ते 30 वयोगटातून भरण्यात येणार आहेत. या पदासाठी 10 हजार ते 12 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

मनसा मोटर्स, हिंगोली या कंपनीमध्ये वसमत येथे संगणक चालक व अकाऊंटंटची बारावी, पदवी, टायपींग मराठी-30 व इंग्रजी-40 या पात्रतेची प्रत्येकी दोन पदे, सेल्स एक्झ्युकेटीव्हची बारावी, पदवी, पदवीधर पात्रतेची परभणी, हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथसाठी 6 पदे, मार्केटींग ऑफिसरची बारावी, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची वसमत, सेनगाव, कळमनुरीसाठी 4 पदे, तालुका मॅनेजरची बारावी, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथसाठी 5 पदे, तर स्पेअर पार्ट मॅनेजरची बारावी, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची वसमतसाठी 2 पदे भरावयाची आहेत. ही सर्व पदे 18 ते 40 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. या पदासाठी 9 हजार ते 18 हजार रुपया पर्यंत मासिक वेतन असणार आहे. 

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि. अमरावती व मनसा मोटर्स, हिंगोली या कंपनीचे 50 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7385924589 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

***** 

 

विविध योजनेच्या प्रलंबित कर्ज प्रकरणाची पडताळणी करुन तात्काळ निपटारा करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासह विविध योजनेच्या कर्जाची प्रलंबित प्रकरणाची पडताळणी करुन तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बँकांना दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, आरबीआयचे अरुण बाबू, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक सम्राट पूरकायस्थ, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले, नाबार्डचे एस. के. नवसारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा पशुसंपर्धन अधिकारी डॉ. एस.बी. खुणे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कादरी यांच्यासह विविध बँकेचे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, विविध योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा. तसेच आरसेटी मार्फत प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज देण्यात यावे. बचतगटाच्या कर्जाची प्रलंबित प्रकरणे, पशुसंवर्धन विभागाची विविध कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाचे वितरण करावेत. जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन शाखेची मागणी आहे, त्या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी किंवा त्या ठिकाणी बँक सल्लागार केंद्र सुरु करावेत, असे निर्देश दिले. 

******

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे जन माहिती अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी माहिती अधिकाराने पारदर्शकतेचे नवे पर्व सुरु केले आहे. या कायद्यामुळे खुल्या शासन व्यवस्थेच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्वाची संस्कृती गतीमान व्हावी, यासाठी व खुल्या शासन व्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगून माहिती अधिकार कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी माहिती अधिकार कायद्याची मूलभूत तत्वे समजून घेऊन माहिती अधिकार अर्जावर कार्यवाही करावी, असे सांगून माहिती अधिकार कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी आम्रपाली चोरमारे यांनीही माहिती अधिकार कायद्याची थोडक्यात माहिती सांगितली .

शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी सर्वांनी माहिती अधिकार कायद्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून कामकाज करावे, असे सांगून कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.  

                                                                        *****   

27 September, 2023

 

स्वामी विवेकानंद विद्यालयात 'नागरिकांची कर्तव्ये' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

 



          हिंगोली (जिमाका), दि. 27 :  येथील नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. 27 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करुन 'नागरिकांची कर्तव्ये' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

          यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात बोलतांना भारतीय संविधानात दिलेली नागरिकांची कर्तव्ये प्रत्येक नागरीकांनी पाळली पाहिजेत. नागरिकांना जशी हक्क प्राप्त होतात तसे त्यांची कर्तव्येही असतात. आपल्या हक्कांबाबत नागरिकांनी जसे जागृत असले पाहिजे तसे आपल्या कर्तव्यांबाबतही असले पाहिजे. आपल्या राज्यघटनेचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता अभंग राखणे व त्याचे संरक्षण करुन राष्ट्रीय सेवाकार्य बजावणे. भारतीय जनतेमध्ये एकोपा व बंधूभाव वाढविणे. पर्यावरणाचे रक्षण करुन सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. विज्ञाननिष्ठा अंगीकारुन राष्ट्र अधिकाधिक प्रगतीपथावर नेणे यासारख्या विषयांवर स्पर्धकांनी आपली परखड मते व्यक्त केली.

या स्पर्धेत नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात कु .ॠतुजा विजय कऱ्हाळे प्रथम, कु.वैष्णवी बालाजी कऱ्हाळे व्दितीय, कु.अनुराधा जयराम कऱ्हाळे तृतीय तर कु.संस्कृती प्रकाश जैस्वाल हिने प्रोत्साहन क्रमांक मिळविला. या यशाबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पाटील, प्रमुख पाहुणे नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रविण पांडे, दिपक नागरे, श्री.लोणकर यांच्या हस्ते विजेत्यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          परीक्षक म्हणून पी. एस. सुर्यवंशी, एस. जी. कऱ्हाळे यांनी काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कऱ्हाळे यांनी केले तर वाय. एम. चव्हाण यांनी आभार मानले.

यावेळी पी. आर. पाटील, बी. ए. लोणकर, एस. यु. राठोड, एस. पी. लोंढे, आर. एस. कऱ्हाळे, एस. टी. पुरी, एन. के. टाले, पी. एस. सुर्यवंशी, वाय. एम. चव्हाण, एम.एम.क्षिरसागर, एस. जी. कऱ्हाळे, एस. टी. पटवे इत्यादीसह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एम. एम. कऱ्हाळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

******

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 27 :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि  महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे . या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

            या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

यासाठी योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त , समाज कल्याण, पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इच्छूक पात्र नवउद्योजकांनी विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा

जागतिक माहिती अधिकार दिवस

 

माहिती अधिकाराबाबत सर्वप्रथम स्वीडन देशात 1766 मध्ये ‘फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट’ पारित करुन माहितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य करण्यात आला . स्वीडननंतर अमेरिका, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, फ्रॉन्स , कॅनडा, स्पेन, जपान या देशांनी माहितीच्या अधिकाराचे कायदे केले. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील त्यांच्या 1948 च्या आमसभेच्या पहिल्या अधिवेशनात युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईटसची घोषणा करुन नागरिकांना माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत मानवाधिकार असल्याचे आपल्या ठरावात संमत केले आहे.

            माहिती अधिकाराने जगभर पारदर्शकतेचे नवे पर्व सुरु केले आहे. विविध देशात झालेल्या अशा कायद्यामुळे खुल्या शासन व्यवस्थेच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्याचा एक भाग म्हणून 28 सप्टेंबर, 2002 मध्ये फ्रीडम ऑफ इन्फार्मेशन नेटवर्क या नावाने बल्गेरियामध्ये माहिती अधिकाराने भारलेल्या संघटना व कृतिगटांचे एक नवे कृतिशील संघटन जाळे उभारण्यात आले.

            तेव्हापासून जगभर माहिती अधिकाराची जागृती वाढावी, तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीतून  विविध देशातील माहिती अधिकार कायद्यामुळे जगभर पारदर्शकतेचे नवे पर्व सुरु झाले व खुल्या शासन व्यवस्थेच्या प्रक्रियेला गती मिळाली. या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्वाची संस्कृती गतीमान व्हावी, यासाठी व खुल्या शासन व्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

            महाराष्ट्र शासनाने देखील 20 सप्टेंबर, 2008 च्या शासन निर्णयानुसार 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस घोषित केला असून माहितीचा अधिकार कायद्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून या दिवशी व्यापक प्रमाणात उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

            केंद्रीय कायदा :

            भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 (1)(क) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे म्हणूनच माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे मत सर्वोच्च व उच्च न्यायालय यांनी भारतातील विविध न्यायनिवाड्यात  व्यक्त केले आहे. भारतात केंद्रीय माहिती अधिकार कायद्याला 15 जून, 2005 रोजी राष्ट्रपतींची मान्यता मिळाली व कायद्यातील काही तरतुदी अंशत: लागू करण्यात आल्या. तर 12 ऑक्टोबर, 2005 पासून या कायद्याची अंमलबजावणी जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतात सुरु झाली. त्यानिमित्त 6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येतो.

            महाराष्ट्र माहितीचा अधिकार :

            केंद्रीय कायदा येण्यापूर्वीच 9 राज्यांनी माहितीचा अधिकार कायदा तसेच 3 राज्यांनी त्यासंबंधीचे विधेयके, कोड बनवण्यास सुरुवात केली होती. राजस्थानातील सामाजिक लेखापरिक्षणाच्या यशस्वी चळवळीपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार कायदा-2002 संमत करण्यात आला. या कायद्यासंदर्भात देश व आंरराष्ट्रीय पातळीवर बदलत चालेले वातावरण तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून धरलेल्या आग्रहाखातर महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार 2002 मध्ये कायद्यात सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. माहिती अधिकार काही राज्यात पूर्वीपासून अंमलात होता. तथापि, माहिती अधिकाराचा कायदा पारित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

        माहिती अधिकाराचा उद्देश :

            नागरिकांना आवश्यक असलेली माहिती पुरविणे, प्रशासनात शिस्त निर्माण करुन अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीत व कार्यक्षमतेत वाढ करणे, शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता आणने, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारात वाव राहू नये, शासकीय कार्यपध्दतीबद्दल सामान्य जनतेला सांशकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झाली.

        कायद्याची विशेषत: :

            शासनाने आतापर्यंत केलेल्या सर्व कायद्यामागे जनतेचे हीत हाच मुख्य हेतू होता. परंतु इतर सर्व कायदे व माहितीच्या अधिकाराचा कायदा यात मुख्य फरक असा आहे की, हे सर्व कायदे जनतेने पाळावे या अपेक्षेसह शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यावर देखरेख होत होती. या भुमिकेमुळे जनता दुय्यम ठरत होती . परंतु, माहितीचा अधिकार या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला संसद सदस्याच्या बरोबरीची माहिती प्राप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे. प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक प्राधिकरण, शासकीय कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करतात की नाही हे सर्वसामान्य व्यक्ती पाहू शकणार आहे तर जनतेच्या अपेक्षेला शासकीय अधिकारी पुरे पडतात का याचीही तपासणी शासनाला करता येणार आहे.

            एखादी व्यक्ती जी माहिती मागेल त्याला ती माहिती ठराविक कालावधीत देण्याचे या कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांवर बंधन असल्यामुळे शासकीय कारभार आपोआपच अधिकाधिक पारदर्शक बनत जाईल. त्यामुळे भ्रष्टाचार आपोआप कमी होऊन राज्यकारभार जनताभिमुख होईल, हेच या कायद्याचे सामर्थ्य आहे.

            कायद्यातील तरतुदी :

            कोणत्याही भारतीय नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे. माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे, हे उघड करणे बंधनकारक नाही. माहिती मागण्यासाठी साधा अर्ज आणि दहा रुपये शुल्क, जीवित स्वातंत्र्य या संदर्भातील माहिती 48 तासात देणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण माहिती देणे अथवा नाकारणे यासाठी सर्वसाधारणपणे 30 दिवसाची मुदत, सहायक माहिती अधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या अर्जासाठी 35 दिवस तर त्रयस्थ व्यक्तींचा संबंध येत असल्यास माहिती पुरवण्यासाठी 40 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास अथवा मिळालेल्या माहितीने समाधान न झाल्यास प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे 30 दिवसात अपिल करता येईल. तेथूनही समाधान न झाल्यास राज्य माहिती आयोगाकडे 90 दिवसांच्या आत दुसरे अपील करता येते. विवक्षित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना, मानवी हक्कांचे उल्लंघन इत्यादींशी संबंधित माहिती देता येणार नाही.

            जन माहिती अधिकारी म्हणून जिल्हा किंवा तालुकास्तरावर कोणतेही वेगळे कार्यालय नाही. शासनाने प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकारी पदनिर्देशित केले आहेत. आपल्याला ज्या कार्यालयाशी संबंधित माहिती हवी आहे त्या प्रत्येक कार्यालयातील जनमाहिती  अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. तसेच प्रथम अपिलीय अधिकारी हा संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयाचा अधिकारी असतो. द्वितीय अपिल दाखल करण्यासाठी शासनाने बृहन्मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि मुंबई या सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आयोगाचे खंडपीठ आहेत. माहिती आयुक्तांचा निर्णय हा दुसऱ्या अपिलानंतरचा अंतिम निर्णय राहील. या निर्णयाविरुध्द कोणत्याही कोर्टात दावा किंवा खटला दाखल करता येणार नाही.

            माहितीच्या अधिकाराविषयीचा अर्ज दाखल करताना हव्या असलेल्या माहितीचे वर्णन योग्य रितीने मांडले जाणे अतिशय महत्वाचे आहे. प्रश्नार्थक स्वरुपाची, कारणे विचारणारी माहिती , मुद्दा नसलेले किंवा गैरसमज उत्पन्न करणारे अर्ज फेटाळण्याची शक्यता अधिक असते. एका अर्जात एका विषयाशी संबंधितच माहिती विचारावी. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 50 पृष्ठापर्यंतची माहिती मोफत देता येते.

            महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नंन्सला नेहमीच महत्व दिले आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व नागरिकांकडून आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधित माहिती देण्यासाठी शासनाने www.rtionline.maharashtra.gov.in या नावाचे पोर्टल सुरु आहे.

            माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायदा अंमलात आल्यापासून त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढतच असून या कायद्याचा प्रचार व प्रसार यातून नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव होत आहे. कायद्याचा वापर करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. अधिकाधिक लोकांनी या कायद्याचा वापर करावा हा शासनाचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून येते. देशातील अनेक घोटाळे उघडकीस आणण्यामागचा शिल्पकार माहिती अधिकार कायदा आहे. सामाजिक परिवर्तनासाठी माहितीचा अधिकार म्हणजे एक शस्त्र आहे. याचा योग्य वापर व्हावा, ही अपेक्षा. 

 

                                                                                         - चंद्रकांत स. कारभारी

                                                                                          माहिती सहायक/उपसंपादक

                                                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

**********

 

 ‘‘स्वच्छता सरपंच संवाद’’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व

स्वच्छत्ता मंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला सरपंचाशी संवाद

     





 

              हिंगोली (जिमाका), दि. 27 : "स्वच्छता सरपंच संवाद’’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व स्वच्छत्ता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी साधला सरपंचाशी ऑनलाइन दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

              येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा अंतर्गत "स्वच्छता सरपंच संवाद "  हा कार्यक्रम  ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे दि. 26 सप्टेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय  दैने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाटेगावकर हे उपस्थित होते.

              यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व स्वच्छत्ता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी कचरा मुक्त भारत व स्वच्छतेचे महत्व, आवश्यकता, गावस्तरावर आरोग्यविषयक बाबीवर ग्रामीण जनतेशी संवाद साधत असताना आपली जबाबदारी व भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालयाचा नियमित वापर, परिसर स्वच्छता त्यासोबतच वैयक्तिक स्तरावरील स्वच्छतेला किती महत्त्व आहे याबाबत गावस्तरावर काम करत असताना गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

      या स्वच्छता सरपंच संवादासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व  विस्तार  अधिकारी, जिल्हा कक्षातील पंचायत, आरोग्य, स्वच्छ भारत मिशन विभागील सर्व तज्ञ, पंचायत समितीचे  अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती स्तरावरील गट समन्वयक, समूह समन्वयक ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सेवक, ऑपरेटर, जलसुरक्षक हे स्वच्छता सरपंच संवाद  कार्यक्रमास  उपस्थित होते.

*****

 

 हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 715 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 28.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 714.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 89.88 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 27 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 22.40 (760.20) मि.मी., कळमनुरी 16.70 (782.10) मि.मी., वसमत 61.30 (749.20) मि.मी., औंढा नागनाथ 29.10 (731.60) मि.मी, सेनगांव 9.10 (545.40) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 714.80 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

****** 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी विम्याचा हप्ता भरलेल्या व

पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याबाबतचे दावे तात्काळ दाखल करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यात खरीप हंगामात पिक विमा योजना राबविण्यासाठी क्ल्स्टरनिहाय विमा कंपन्याची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इंन्शूरंस कंपनी लि. मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीप हंगाम खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे.

चालू खरीप-2023 हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्वात नुकसान या जोखमीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे इंटिमेशन देण्यासाठी विविध पयार्याचा वापर करुन योजने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषि, महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात यावी.

सर्व प्रथम क्रॉप इन्शूरंस (Crop Insurance) पिक विमा ॲपचा वापर करण्यात यावा. नंतर संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-266-0700 चा वापर करण्यात यावा. टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास झालेल्या आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका, जिल्हास्तरीय कार्यालय किंवा ते उपलब्ध न झाल्यास बँक, कृषि व महसूल विभाग यांना द्यावी. तसेच विमा कंपनीसही तात्काळ माहिती देण्यात यावी. बँकेमार्फत विमा संरक्षित बाबी जसे पिक विमा संरक्षित रक्कम, भरलेला विमा हप्ता व त्यांचा दिनांक या बाबी तपासून संबंधित विमा कंपनीस सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यासाठी पाठविल्या जातील. इंटिमेशन देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सध्या चालू असलेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखमीचा लाभ मिळण्यासाठी इंटिमेशन दाखल करणे अनिवार्य आहे.

त्यामुळे विम्याचा हप्ता (प्रिमियम) भरलेल्या व पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याबाबतचे दावे (इंटिमेशन) तात्काळ दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

26 September, 2023

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 686 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 19.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 686 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 86.26 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 26 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 32.50 (737.40) मि.मी., कळमनुरी 30.50 (765.40) मि.मी., वसमत 13.30 (688.10) मि.मी., औंढा नागनाथ 8.60 (704) मि.मी, सेनगांव 6.90 (533.20) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 686 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******