16 September, 2023

 

हिंगोली येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त गौरव रॅली

 



 

हिंगोली, (जिमाका) दि. 16  :   मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली येथील देवडा गार्डन हुतात्मा स्मारक येथून स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या घरापर्यंत गौरव रॅली काढण्यात आली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्षभर हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. आज तहसील कार्यालय हिंगोलीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटशिक्षणाधिकारी गंगाधर बिरमवार, शिक्षण विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी,  महसूल सहायक, नगरपरिषद कर्मचारी, सहशिक्षक, विद्यार्थी व  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टाकळगव्हाणकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील त्यांच्या आठवणी सर्व उपस्थितांना सांगितल्या. मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींचे स्मरण करुन त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

******

No comments: