30 September, 2023

 

‘एक तारीख एक घंटा’ स्वच्छता मोहीम

या उपक्रमांत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन


 

           हिंगोली (जिमाका), दि. 30 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.00 वाजता "एक तारीख एक तास महाश्रमदान" हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.       

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या वर्षाची थीम ‘कचरा मुक्त भारत’अशी या वर्षाची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा मोहिम अंतर्गत दिनांक 01आक्टोंबर रोजी सकाळी 10.00 वाजता "एक तारीख एक घंटा महा श्रमदान" उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत "स्वच्छता ही सेवा दिनांक 01 आक्टोंबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या एक तारीख एक घंटा  महाश्रमदान हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी सुरेश बेदमुथा उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.  स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत  जिल्ह्यातील सर्व  ग्रामीण भागातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक  ग्रामपंचायतीमध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.  

या उपक्रमात ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्वच्छता करतील आणि स्वच्छता उपक्रमाचा दृश्यमान परिणाम दिसण्याच्या दृष्टीने महा श्रमदान करण्यात येणार आहे.  कचरा मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, गावातील मंदिर ,शाळा महाविद्यालय, जलस्त्रोत नदीकाठ, बाजारपेठ, धार्मिक स्थळ, सार्वजनिक व खाजगी कार्यालयाचे परिसर स्वच्छता, पर्यटन स्थळे, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, शाळा अंगणवाडी परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात  येईल. लोक सहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधी, गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, स्वच्छता सेवक, रोजगार सेवक,  गावातील ज्येष्ठ नागरिक, गावातील महिला प्रतिनिधी, बचत गटातील महिला, युवक वर्ग भजनी मंडळ, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावे, असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.

*****

No comments: