16 September, 2023

 जवळा बाजार येथे पोषण आहार आणि किशोरवयीन आरोग्य  विषयावर जनजागृती अभि‍यान संपन्न

केंद्र सरकारच्या वतीने  राष्ट्रीय पोषण अभियान विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 




हिंगोली, (जिमाका) दि. 16  :   केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या (Central Bureau of Communication)  वतीने व महिला व बालकल्याण वि‍भाग जि. प. हिंगोली यांच्या सहभागातून औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा  बाजार येथे  पोषण आहार आणि किशोरवयीन आरोग्य या वि‍षयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.

जवळा बाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात आयेाजि‍त करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय संचार ब्युरो नांदेड कार्यालयाचे सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल, बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, वि‍द्यालयाच्या मुख्य अध्यापिका सुरेखा बांगर,  मुरलीधर मुळे, पर्यवेक्षिका एस.डी.मस्के , शीला दोडल आदी मान्यवरांची प्रमख उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्यावतीने दि. 01 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्‍ट्रीय पोषण अभि‍यान राबविण्यात येत असून या अभियानातंर्गत आयोजि‍त करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये किशोरवयीन मुलींचे आरोग्य या वि‍षयावर बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती दिली तसेच संवाद साधला. या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. यात दैनंदि‍न आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहजरित्या पोषण आहाराच्या पाककृती कशा प्रकारे तयार कराव्यात याचीही माहिती यावेळी विद्याथ्यांना आणि उपस्थितांना दिली. 

बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या जवळा बाजार सर्कलच्या सहा गटांच्यावतीने पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात सहजपणे बनवि‍ता येतील अशा पोषण आहार पाककृतींचे प्रदर्शनी मांडण्यात आले. भरडधान्य पाककृतींचा समावेश मोठ्या प्रामाणावर या प्रदर्शनात करण्यात आला. तसेच रानभाज्‍या आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांनी सर्वांचे लक्ष वेधले. फाष्ट फूड, पॅकिंग पदार्थ खाण्याचा संदेशही या प्रदर्शनामध्ये देण्यात आला.

            तत्पूर्वी विद्यार्थीनींच्या सहभागातून कि‍शोरवयीन आरोग्य आणि पोषण आहाराचे महत्व या विषयावर आयोजित पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू आणि‍ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर पोषण आहार प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी कार्यकर्तींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित दोडल यांनी  तर सूत्र संचालन बापूराव शिरसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी विद्यालयाचे हनुमंत  सावंत, त्र्यंबक जांभळे, रमेश नातेवाड आदिनी परिश्रम घेतले.

 

******

No comments: