05 September, 2023

 

सेनगाव येथील रोजगार मेळाव्यात 274 बेरोजगार उमेदवारांची केली प्राथमिक निवड

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 533 उमेदवार उपस्थित होते. या 533 उमेदवारांपैकी 274 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर हे होते, तर प्रमुख पाहूणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे, तसेच प्रमुख उपस्थिती आयटीआय हिंगोलीचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर हे होते.

यावेळी सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी महारोजगार मेळावा आयोजनामागील हेतू विशद करत युवकांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून संधीचे सोने केले पाहिजे, असे सांगून याबरोबरच उद्योजक आपल्या दारी या उक्तीचा देखील उच्चार केला. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व करिअर निवडावे याबाबत नॅशनल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली या कार्यालयात करण्यात आले असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उमेदवारांना देण्यात आली. यावेळी  जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी केले. तर डॉ. एस. आर. पजई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली कार्यालयाचे म. ना. राऊत, अ.अ.घावडे, ना.ज.निरदुडे, र.ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.   

 

*****

No comments: