15 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा स्मृती जागृत ठेवून पुढच्या पिढीला माहिती देण्यासाठी

नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

  • मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मराठवाडा गीत, राज्यगीत व राष्ट्रगीत कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करुन केले ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम 75 अमृत महोत्सव’ असे विहंगम दृष्य

 



हिंगोली, (जिमाका) दि. 15  :  मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील लोकांना करुन ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात अत्याचाराचा प्रतिकार केला त्यांचे स्मरण व्हावे. या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा वेगवेगळ्या स्मृती जागृत ठेवून पुढच्या पिढीला माहिती देण्यासाठी असे नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित मराठवाडा गीत, राज्यगीत व राष्ट्रगीताचा कार्यक्रम येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदावर आज घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, शिक्षणाधिकारी माधव सलगर, संदीपकुमार सोनटक्के उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम सामुहिकपणे राष्ट्रगीत सादर केले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. तर मराठवाडा गीत सुनिता राठोड यांनी सादर केले. यावेळी संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीमय वातावरण तयार झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करुन ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम 75 अमृत महोत्सव’ असे विहंगम दृष्य तयार करत राष्ट्रभक्तीमय वातावरण झाले होते.

या कार्यक्रमात जिल्हा परिषद कन्या प्रशाला, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, संभाजी विद्यामंदीर, शिवाजी माध्यमिक विद्यालय, महादेव मान्नीराम प्राथमिक विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पी. एफ. कनिष्ठ महाविद्यालय, खाकीबाबा इंग्लीश स्कूल, संत नामदेव माध्यमिक विद्यालय, शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, शिवाजी प्राथमिक विद्यालय, माणिक स्मारक आर्य माध्यमिक विद्यालय, विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल, सरजूदेवी भिकुलाल आर्य कन्या विद्यालय, सरस्वती विद्यामंदीर, ऊर्दू ज्युनिअर कॉलेजमधील जवळपास 2744 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: