05 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तीं व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप,

जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

 

 







            हिंगोली, (जिमाका) दि. 05  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्र वाटप व ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षा छाया पडघन, लक्ष्मीबाई मागासवर्गीय संस्थेच्या अध्यक्षा रेखा देवकर, हिंगोली तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष विनोद खरटमोल, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. घट्टे मॅडम, ज्येष्ठ नागरिक श्री.पोपळाईत, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम वागतकर, विशाल इंगोले इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            तद्नंतर जेष्ठ नागरीकांचा सत्कार करुन 60 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 50 ऊसतोड महिला कामगारांना ओळखपत्र वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 16 तृतीयपंथी यांना ओळखपत्राचे वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच प्राथमिक स्वरुपात 18 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.

             या प्रसंगी  मान्यवरांनी ऊसतोड कामगारांच्या समस्येविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तृतीयपंथी यांना येणारे अडी-अडचणी बाबत साक्षी रमेश पाईकराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात सहायक आयुक्त समाज कल्याण राजू एडके यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय घटकासाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली व जास्तीत जास्त पात्र मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल सुलोचना ढोणे यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक इंगोले  यांनी  केले.  

            या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हयातील  450 ते 500 ऊसतोड कामगार, तृतीयपंथी व्यक्ती, जेष्ठ नागरिक तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे लाभार्थ्यांची  उपस्थिती  होती.

            या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

*****

 

No comments: