26 September, 2023

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्यामुळे

बेरोजगार अशोक जाधव झाले यशस्वी व्यवसायिक

 


            हिंगोली येथील एनटीसी भागात राहणारे अशोक जाधव हे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होते. त्यानंतर त्यांनी पदवी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण घेत असताना त्यांनी नोकरीच्या संधी शोधत वेगवेगळ्या विभागात अर्ज सादर करीत होते. त्यामध्ये श्री. जाधव यांना नियमितपणे अपयश येत होते. पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतानाच श्री. जाधव यांना अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळत असल्याचे समजले. त्यानंतर श्री. जाधव यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे धाव घेतली व माहिती मिळवली. त्यांना महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे महामंडळाकडे अर्ज केले. त्यानंतर त्यांना पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे श्री. जाधव हे इतर कागदपत्रे घेऊन युको बँकेकडे गेले. बँकेने सांगितल्याप्रमाणे हिंगोली येथील कळमनुरी रोडवडील खटकाळी बायपास येथे गजानन ट्रेडर्स या नावाने छोटा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर युको बँकेकडील कर्मचारी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या व्यवसायाची पाहणी केली. त्यानंतर बँकेने श्री. जाधव यांना 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले. त्यामुळे श्री. जाधव यांच्या व्यवसायाला चांगली सुरुवात झाली. बँकेने दिलेल्या कर्जाचा व्याज परतावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने 2 लाख 10 हजार रुपये व्याज परतावा रक्कम मंजूर केले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांने केलेल्या अर्थसहाय्यामुळे मे. गजानन ट्रेडर्स या नावाने श्री. जाधव यांचा व्यवसाय नावारुपाला आला. या व्यवसायातून त्यांनी ज्या ठिकाणी जागा भाड्याने घेतली होती, ती जागा विकत घेतली व त्या जागेचे ते मालक झाले. अशाप्रकारे श्री. जाधव यांचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरु झाला असून या यशाचे सर्व श्रेय  श्री. अशोक जाधव यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला दिले आहे. महामंडळाने त्यांना एका विद्यार्थ्यांपासून व्यवसायिक बनविल्यामुळे त्यांनी सदैव महामंडळाचा ऋणी असल्याचे सांगितले.

 

                                                                                                                                                - चंद्रकात स. कारभारी

                                                                                                                                                   माहिती सहायक/उपसंपादक,

                जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*******   

No comments: