31 March, 2023

 

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार !

समाज कल्याण विभागाचा महिनाभर  सामाजिक न्याय पर्व उपक्रम

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 :  एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तीं यांची जयंती असून 01 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि. 01 एपिल् 2023 ते 01 मे 2023 या  महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. समाज कल्याण आयुक्तांनी याबाबत नुकतेच निर्देश दिले आहेत.

या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सबधित जिल्हाचे पालकमंत्री, व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, दिनांक १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीम चे आयोजन करणे, राज्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यांच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, महाविद्यालय ,आश्रम शाळा ,निवासी शाळा  व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वकृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करणे,

            तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती ,मिनी ट्रॅक्टर लाभार्थी ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रतिनिधिकस्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे. समतादुत यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाथ्य नाटकेद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे ,त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव.

ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे. नवउद्योजकांसाठी उद्योजकता शिबिर आयोजित करणे. समान संधी केंद्रा मार्फत नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची माहिती जनजागृती करणे. तृतीयपंथी व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे. शासकीय वसतिगृह, निवासशाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधने. महाराष्ट्र दिन साजरा करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे. दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याचा अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे, निर्देश समाज कल्याण आयुक्त यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक निवडणुका व आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------------------------------

 चौकट :-

महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरुषांच्या जयंती एप्रिल महिन्यात आहे. या महापुरुषांनी समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी केलेले समाज कल्याणाचे कार्याची प्रेरणा घेऊन समाज कल्याण विभागाने महिनाभर  ‘ सामाजिक न्याय पर्व ’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे .

डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त ,समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे,

---------------------------------------

*****

30 March, 2023

 

कयाधू विक्री प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद

दीड दिवसांमध्ये साधारणत: 01 लाख 62 हजाराची उलाढाल

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कयाधू विक्री प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. या महोत्सवामध्ये महिलांच्या उत्पादनास अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या कयाधू जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये एकूण 62 प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, हळद, मसाले, मठ्ठा, प्रसिद्ध गावरान मेवा, दही धपाटा, शीतपेय, कटलेरी व्यवसाय, कापड व्यवसाय, विविध प्रकारच्या डाळी, मशरुम व गटांनी स्वतः तयार केलेले सौंदर्य क्रीम यासारख्या सर्व वस्तू पदार्थ हे स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत. या स्टॉलमध्ये दीड दिवसांमध्ये साधारणत: एक लाख 62 हजार 180 रुपयाची उलाढाल झालेली आहे. आज दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनासाठी आवर्जून भेट देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती श्रीमती रुपालीताई गोरेगावकर, माजी जि.प.सदस्य विठ्ठल चौतमाल व प्रतिष्ठित नागरिक जावेद राज, विलास गोरे, प्रल्हाद मुळे, आदर्श कॉलेजचे डॉ.राजाराम पिंपळपल्ले, पी.जी. माडेवार  बँक शाखा व्यवस्थापक SBI बँक बाळापूर यांनी भेट देऊन सर्व स्टॉलधारक ग्रामीण महिलांचे कौतुक केले व त्यांच्याकडून वस्तू,पदार्थ सुद्धा खरेदी केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे महिलांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.

*****

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा

जिल्ह्यातील 1 लाख 95 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीकविमा योजनेत देखील सहभागी होता येणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीत 6 हजार रुपयांची भर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य शासनाचे दरवर्षी 12 हजार रुपये  सन्मान निधीमध्ये ही रक्कम मिळणार आहे. या योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासूनच लाभ घेत असतील, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेसाठी राज्य शासनाने 6 हजार 900 कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे.

                हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील 34 हजार 882 शेतकरी तर वसमत तालुक्यातील 43 हजार 03 शेतकरी, कळमनुरी तालुक्यातील 38 हजार 860 शेतकरी आणि सेनगाव तालुक्यातील 44 हजार 663 शेतकरी असे जिल्ह्यातील पात्र एकूण 1 लाख 95 हजार 833 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

                या योजनेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दरवर्षी केंद्र शासन 117 कोटी 49 लाख 98 हजार तर राज्य शासन 117 कोटी 49 लाख 98 हजार असे एकूण 234 कोटी 99 लाख 96 हजार एवढा निधी प्राप्त होणार आहे.

हिंगोली तालुक्यातील मौजे  भोगाव येथील सय्यद गुलाब सय्यद सरवर हे शेतकरी म्हणतात की, राज्य शासनाने  प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे 6 हजार रुपये मिळत होते. आता त्यात राज्य सरकारने देखील 6 हजार देणार असल्यामुळे एकूण 12 हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत. केंद्र शासनाची 6 हजार रुपये ही रक्कम तोकडी वाटत होती. परंतु, राज्य शासनाने त्यात 6 हजार रुपयांची भर घातल्याने नक्कीच या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

तसेच हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील गोवर्धन नारायण भालेराव या शेतकऱ्याने सांगितले की, केंद्र सरकारपाठोपाठ  राज्य शासनाने घोषणा केली असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतूनही तितकीच रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात ही रक्क्म खते, बियाणे, किटकनाशके विकत घेण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. शेतकऱ्यांना या रकमेतून पेरणीपूर्व हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने घोषणा केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आम्ही शेतकरी  राज्य शासनाचे आभार मानावे तितके कमीच  असल्याचे सांगितले .     

याशिवाय शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम देखील भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना 1 रुपया भरुन योजनेत सहभागी  होता येणार आहे. त्यासाठी 3 हजार 312 कोटी  रुपयांची  तरतूद करण्यात  येणार आहे. 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

29 March, 2023

 

कयाधू जिल्हास्तरीय विक्री  प्रदर्शनाचे उद्घाटन

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 





हिंगोली (जिमाका), दि. 29 :  ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी चांगल्या प्रकारे बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यानुसार नेहमी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोत वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास  यंत्रणा हिंगोली अंतर्गत  दि. 29 मार्च  ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कयाधू जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन उद्घाटन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी ग्रामीण भागातील महिलांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय करून त्यांच्या जीवनमानाचा स्तर वाढवावा, असे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी गटांना  मिळालेल्या शासन निधी व बँक कर्ज यामधून नवनवीन व्यवसायाच्या संधी शोधून त्यानुसार आपला गट आर्थिक उन्नती कडे मार्ग क्रमण करावे, असे सांगितले.

सर्व मान्यवरांनी हिंगोली करांना ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची जास्तीत जास्त खरेदी करुन गरीब कुटुंबांना हातभार लावावा, असे आवाहन केले.  या कार्यक्रमासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, अरुण बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सावंत, आरसेटीचे संचालक बोईले, ओम प्रकाश गलांडे, राम मेकाले, राजू दांडगे, घोगरे , गणेश पाटील व सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक सर्व समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीराम मेकाले यांनी केले.

                                            

*****

 

 

रामनवमी उत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  यावर्षी हिंगोली जिल्ह्यात दि. 30 मार्च, 2023 रोजी रामनवमी सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु सणाच्या काळात मानापानाच्या कारणावरुन किंवा इतर शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते.

अशाप्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता आहे. 

त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 30 मार्च, 2023 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 30 मार्च, 2023 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. 

                                             

*****

 

कृषि महोत्सवात चौथ्या दिवशी विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

व जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचा समारोप

·         पाककला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या महिलांना बक्षीसाचे वितरण







 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा कृषि महोत्सवामध्ये दि. 28 मार्च, 2023 रोजी चर्चासत्र व परिसंवादात करवंद लागवड तंत्रज्ञान, विक्री व्यवस्था व त्यावर करावयाची प्रक्रिया याबाबत वसमत तालुक्यातील लिंगी येथील पग्रतशील शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नांदेड येथील महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक यांनी त्यांच्याकडून उत्पादित होणारी खते, औषधी  व कृषि औजारे याचे विपणन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. साईनाथ खरात यांनी सेंद्रीय/नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. त्याबाबत करावयाच्या उपायोजनाचे तंत्रज्ञानाविषयी उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले.

जालना येथील सिताबाई मोहिते यांनी बचतगटांनी फळ प्रक्रिया व इतर उद्योगाचे विक्री व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून  यामध्ये ग्राहका सोबत बोलतांना डोक शांत ठेवुन बोलणे, गोड भाषेत संभाषण करणे तसेच ग्राहकासोबत विश्वासार्हता निर्माण करणे ही त्रिसूत्री  आहे. तसेच महिला या शब्दाचे अर्थ सांगताना म- म्हणजे मायाळु, हि- हिम्मत, ला- लाजाळू हे तीन गुण महिलांमध्ये असतात. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजारात किंवा इतरत्र गटामार्फत निर्मित केलेल्या मालाची विक्री करु शकतात आणि त्यामुळे बाजारात उदभवलेल्या परिस्थितीचा सामना करु शकतात. असे उपस्थित बचतगटांच्या महिलांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच बचत गट सक्षम कसे करावयाचे याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर  श्री. बोरगड यांनी नॅशनल कमोडीटी डेरीव्हिटीज ॲन्ड एक्सचेंज यांचे मार्फत खरेदी-विक्रीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. नितीन चव्हाण व्यवस्थापकीय संचालक, गोदाफार्म कळमनुरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कशी करावी व शेतकरी उत्पादक कंपनीला येणाऱ्या अडचणीला मात करुन कंपनी सक्षम कशाप्रकारे करावी  याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कंपनीकडे असलेल्या मर्यादित मनुष्यबळामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव, वजन काट्याचे कॅलिब्रेशन इत्यादी सुविधा शेतकऱ्यांना कशाप्रमारे उपलब्ध करुन दिल्या जातात याबाबत माहिती दिली.

            तदनंतर उगम ग्राम संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने लोकगीताद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना प्रबोधन केले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 26 महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी महिलांनी ज्वारी व बाजरी पासून तयार केलेले विविध पदार्थ जसे, ज्वारीचा केक, अंबिल, आप्पे, पापड्या, खिचडी, घुगऱ्या, उपमा, बाजरीचे शंकरपाळे, हलवा, लाडु, धपाटे, उसळ इत्यादी पदार्थ आकर्षक रित्या प्रदर्शित केले. या स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणुन तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे, गोळेगांव  येथील अन्न तंत्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शितल पवार यांनी जबाबदारी पार पाडली.  परिक्षकांनी केलेल्या  मुल्यमापनानुसार वनिता पंतगे यांनी ज्वारी पासून केलेल्या केकला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.  द्वितीय क्रमांक छाया ठोंबरे यांनी केलेल्या बाजरीचे लाडु या पदार्थाला देण्यात आला. तर तृतीय क्रमांक शिल्पा जंपनगिरे यांनी केलेल्या बाजरीचा हलवा या पदार्थाला देण्यात आला. उत्तेजनार्थ क्रमांक अर्चना सोळंके व माधुरी बोरबळे यांना विभागुन देण्यात आला. स्पर्धेमध्ये विजेत्यांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे व नोडल अधिकारी पौष्टिक तृणधान्य कृषि उपसंचालक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  पाककला स्पर्धेद्वारे स्वत: बनविलेल्या पदार्थाना व्यासपीठ मिळवुन दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्वारी व बाजरी पासुन बनविलेल्या पदार्थांची  विविधता, आकर्षक प्रदर्शन व चव इत्यादीद्वारे उपस्थितांनी स्पर्धेचा आस्वाद घेतला.

            जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता व समारोप कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे व कृषि प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या स्टॉल धारकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवराज शहारे, प्रकल्प संचालक आत्मा, हिंगोली यांनी केले. यामध्ये कृषि महोत्सव 2023 यशस्वी  करण्यासाठी  हातभार लावणाऱ्या सर्व  अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार बंधूचे आभार मानले. महोत्सवाचा केंद्रबिंदु असलेल्या शेतकऱ्यांनी व हिंगोली नगरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही  आभार मानन्यात आले. अशा प्रकारे जिल्हा कृषि महोत्सव-2023 ची सांगता करण्यात आली.

*****

28 March, 2023

 महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी यासाठी विविध योजना राबवत असते. वर्ष 2023-24 साठी महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

एमपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण

एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी  मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने, महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणासाठी रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह 10 हजार विद्यावेतन लागू होईल. एकवेळ आकस्मिक खर्च रुपये 12 हजार देण्यात येईल.

युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण

युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ 12 हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणासाठी निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 13 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ 18 हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा.  

प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

विद्यार्थांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Training 2023-24 यावर जाऊन सर्व अटी व शर्तीचे पालन करुन दिनांक 10 एप्रिल, 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

महाज्योतीच्या एमपीएससी/युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या विद्याथ्याचे मनोगत

 

शीतल घोलप- युपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी

संगणक अभियांत्रिकीमधे पदवी प्राप्त केल्यानंतर मी युपीएससीच्या तयारीला लागले. त्यावेळी लहान भावंडाचेही शिक्षण सुरु होते. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे दिल्ली येथे जाऊन महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नव्हते. सोशल मध्यमातून महाज्योतीचा युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती. सर्व अटी शर्तीसह ऑनलाईन नोंदणी अर्ज दाखल केला. चाचणी परिक्षा दिली. आणि माझी निवड झाली. मला महज्योती मार्फत दिल्लीचा नामांकित श्रीराम आयएएस संस्थेमध्ये पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्यादिवसापासून माझ्या विद्यावेतनास सुरवात झाली. मी परभणीतून दिल्लीला गेले. दिल्लीसारख्या महागड्या शहरात माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आणि राहण्याची सोय झाली. श्रीराम आयएएस संस्थेचे पूर्व, मुख्य आणि वैकल्पिक विषयांची सर्व पुस्तके मिळाली.  

प्रदिप शिंदे - एमपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी

मी प्रदिप नंदकुमार शिंदे. बीफॉर्मचा विद्यार्थी आहे. सध्या एमपीएससीची तयारी करीत आहे. पण प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्याने अभ्यास केल्याचे सामाधान मिळत नव्हते. त्यावेळी फेसबुकवर महाज्योतीच्या एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेबद्दल वाचले. आणि त्यात नाव नोंदविले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. काही दिवसात ऑनलाईन माध्यमातून एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण सुरु झाले. सुरुवातीलाच कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा सांगितले. आपल्या ध्येयाप्रती सजग केले. मी बी फॉर्मचा विद्यार्थी असल्यामुळे मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास हे विषय समजण्यास कठीण जायचे. पण महाज्योतीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविल्या जात असलेल्या शिक्षकांकडून ते मला समजायला सोपे जाऊ लागले. या विषयातील माझा आत्मविश्वास वाढला. महाज्योतीकडून एमपीएससी पुर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी अद्ययावत, दर्जेदार शैक्षणिक साहित्य संचही देण्यात आला. त्यातून अभ्यास करतांना अधिकाधिक पुढे जात आहे. एखादे लक्ष्य गाठायचे असेल तर आपल्या साध्याबरोबर साधनेही सोबत असली पाहिजेत तरच लक्ष्य गाठता येईल. महाज्योती याची पुरेपुर काळजी घेते.

*****

 

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी

बँक खात्याचा तपशील सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र लाभधारकांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतीमहा प्रती लाभार्थी 150 रुपयाप्रमाणे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. या योजनेत आज रोजी 37 हजार 536 शिधापत्रिकाधारक आहेत. थेट हस्तांतरण योजना (DBT-Direct Benefit Transfer)  कार्यान्वित करण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशील दि. 28 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुन्यात संबंधित रास्त भाव दुकानदारांकडे अथवा तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे उचित कागदपत्रे, प्रमाणपत्राची पूर्तता करुन अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे.

या योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते काढून घेणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी (RCMS) संलग्न असणे आवश्यक राहील. म्हणजेच शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर (RCMS) आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उक्त नमूद केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे संबंधित रास्त भाव दुकानदार अथवा तहसील कार्यालय (पुरवठा) विभागाकडे त्वरित उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.    

*****  

 

शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च, 2023 रोजी  जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा उशिरापर्यंत म्हणजेच रात्री 10.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.   

*****

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे

29 व 30 मार्च रोजी आयोजन

           

हिंगोली (जिमाका), दि. 28  :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने  दि. 29 ते 30 मार्च 2023 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..

बंन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली यांचे टेलीकॉलर ची 4  महिलांची पदे, अकाऊंटंट- 2, रिेशेप्श्ननिस्ट-1 महिला, बॅच कॉर्डिनेटर-1, ॲकॅडमिक हेड-1, ऑफिस बॉय/सफाईगार-4 पदे भरण्यात येणार आहेत. टेलीकॉलर पदासाठी शैक्षणिक पात्रता बी.एस्सी पदवी/डी.एड, अकाऊटंट पदासाठी बी.कॉम, टॅली, डीटीपी 1 वर्ष अनुभव, रिसेप्शनिस्ट पदासाठी पदवी, बॅच कॉर्डिनेटर पदासाठी बीएस्सी, ॲकेडमिक हेड साठी एम.एसस्सी बी.एड 1 वर्ष अनुभव, ॲकेडमिक हेड या पदासाठी एम.एससी बी.एड 1 वर्ष अनुभव, ऑफिस बॉय/सफाईगार पदासाठी  दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच डीएसटीए एज्यूकेशन फॉऊंडेशन एमआयडीसी पुणे यांची दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता असलेली 40 पदे, दहावी आयटीआय पात्रतेचे वेल्डरची 20 पदे भरण्यात येणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात बंन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली व डीएसटीए एज्यूकेशन फाऊंडेशन एमआयडीसी चिंचवड पुणे या कंपनीचे 70 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, बी.एससी, डी.एड, बी.कॉम, टॅली आणि डिटीपी या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

****** 

27 March, 2023

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी

तृणधान्य व हळद यासह विविध विषयावर मार्गदर्शन

           




हिंगोली (जिमाका), दि. 27  :  जिल्हा कृषि महोत्सवामध्ये आज दि. 27 मार्च 2023 रोजी  तृणधान्य, हळद या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. हरिहर कौसडीकर यांनी हळद पिकांसाठी जमिनीचे आरोग्य कसे असावे. तसेच माती नमुने काढुन पृथकरण करावे, खते देण्यात यावीत. जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब कमी झाला असुन सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यासाठी सेंद्रीय कर्बाचा जमिनी मध्ये मोठया प्रमाणात वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रल्हाद बोरगड यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावयाची व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची मात याविषयी माहिती दिली. तसेच कंपनी अंतर्गत असणाऱ्या सभासदांना होणारे फायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी जी.बी. बंटेवाड यांनी मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची उदिष्टे व त्यामध्ये समाविष्ट बाबीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात वरद कंपनीचे संचालक श्री. राठोड यांनी शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढविण्यात यावा. ड्रोन शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी कशाप्रकारे वापरावे, त्याचे फायदे, त्याची किंमत इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भविष्य काळात ड्रोनचा वापर शेतीमध्ये फवारणीसाठी मोठया प्रमाणात होईल, असे सुध्दा सांगितले. त्यांनतर पणन मंडळ, संभाजीनगर यांच्या मार्फत खरेदीदार-विक्रेता यांचे संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये नांदेड, सांगली, वसमत व हिंगोली येथील खाजगी व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला व सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या संम्मेलनामध्ये माजी आमदार गजाननराव घुगे यांनी सहभाग घेऊन शेतकरी, व्यापारी व शासकीय विभाग यांच्या अडचणीवर मार्ग काढावा, जेणेकरुन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्राचे  प्रमुख पी. पी. शेळके यांनीही  तांत्रिक बाबीविषयी मार्गदर्शन  केले.

आज सांयकाळी 5.00 वाजेपपर्यंत झालेल्या नोंदणी नुसार 1200 पेक्षा अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुध्दा 1200 पेक्षा अधिक होती, असे  युवराज शहारे, प्रकल्प संचालक, आत्मा हिंगोली यांनी सांगितले .

******

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही विविध विषयावर मार्गदर्शन

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 27  :  उद्या दि. 28 मार्च 2023 रोजी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचा चौथ्या दिवशी विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये  ड्रॅगनफ्रुट लागवड तंत्रज्ञानाबाबत सेनगाव येथील रमेश जाधव यांचे, करवंद लागवड तंत्रज्ञान व त्यावरील यशोगाथे कथन वसमत येथील बालाजी यशवंते यांचे. त्यांनतर एनसीडीईएक्स नागपूर  यांच्यातर्फे शेतमाल खरेदी विक्री बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोदाफार्म शेतकरी उत्पाद कंपनी लि. कळमनुरी याच्यातर्फे शेतकऱ्यांना हळद, सोयाबीन, हरभरा शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत खरेदी/विक्री बाबत मार्गदर्शन करणार आहेत. कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे यांनी  शेतमाल पिकाचे मुल्यवर्धन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर डॉ. साईनाथ खरात कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर यांनी सेंद्रीय/नैसर्गिक शेती पध्दती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जालना येथील श्रीमती. सिताबाई मोहिते यांनी शेतकऱ्यांना फळप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्या शेतऱ्यांना प्रदर्शनाचे स्टॉल पाहत-पाहत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी प्रदर्शन स्टॉलमध्ये मेगा फोनद्वारा व्याख्यानाचे प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुख्य दालनामध्येही  बैठक व्यवस्था केलेली  आहे. तसेच या चर्चासत्रामध्ये होणारी व्याख्याने यूट्यूबच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  विशेषत: हळद उत्पादकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन युवराज शहारे, प्रकल्प संचालक, आत्मा हिंगोली यांनी केले आहे.

******

 

गावात पडणारा पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे

- उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी




 

हिंगोली (जिमाका), दि. 27  :  सर्वानी पाण्याविषयी संवेदनशील झाले पाहिजे आणि पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच पाणी बचतीच्या सवयी आंगीकारले पाहिजे. बहुतांश शेतकऱ्यांकडे बंद किंवा सुरु बोअर असतील तर त्याचे बोअर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरण करुन पाणी पातळी वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या गावात पडणारा पाऊस हा जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  केले .  

जिल्हा प्रशासन व उगम ग्रामीण विकास संस्था आणि हिंगोली जिल्ह्यातील समविचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणुया नदी अभियान हिंगोली तालुक्यातील समगा येथे आयोजित करण्यात आले हाते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  हे होते. यावेळी गट विकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी भोजे, विस्तार अधिकारी आमले, सरपंच सागरबाई इंगळे उपस्थित होते.  

हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की, एकेकाळी बारमाही असणाऱ्या नद्याचा प्रवाह हा वर्षानुवर्षे कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून चला जाणूया नदीला अभियान सुरु करण्यात आले आहे. गावकरी आणि कर्मचारी मिळून प्लॅस्टिक नदी मध्ये फेकणे, नदीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वानी एकजुटीने हे काम हाती घेतले तर नक्कीच नदी बारमाही होईल यात शंकाच नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले की, जलसंधारण करण्यासाठी मनसंधारण करणे आणि त्याची लोकचळवळ होणे गरजेचे आहे. नदीला जिवंत करण्यासाठी शासनाने व गावकऱ्यांनी  समन्वयाने कामे केले तर नक्कीच चांगला परिणाम दिसेल, असे विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले.  

या कार्यक्रमामध्ये बालाजी नरवाडे, दत्तराव घुगे, विलास आठवले, दामोदर घुगे व रामेश्वर मांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर धम्मानंद इंगोले व संच यांनी प्रबोधन केले. तर बाल विवाह विषयी अॅड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, विठ्ठल चव्हाण, सिद्धार्थ निनूले व ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले.

*****

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरण

 


हिंगोली (जिमाका), दि. 27  :  जिल्हयामध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्या अनुषंगाने दि. 25 मार्च, 2023  रोजी  राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी  सन 2013-14, 2014-15 व  2016-17 या तीन वर्षाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन-2013-14 चा सौ. वंदना उमेद सोवितकर यांना, सन 2014-15 चा सौ. सुशिला जयाजी पाईकराव यांना व सन 2016-17 चा श्रीमती सुनिता माणिकराव मुळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार व प्रत्येकी  10 हजार एक रुपयाचा धनादेश, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, शाल व श्रीफळ तसेच पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी खासदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  सरस्वती कोरडे, कायदा तथ परिविक्षा अधिकारी अँड. अनुराधा पंडित, निलेश कोटलवार, क्षेत्रकार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुड़े उपस्थित होते.

 

*****