27 March, 2023

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी

तृणधान्य व हळद यासह विविध विषयावर मार्गदर्शन

           




हिंगोली (जिमाका), दि. 27  :  जिल्हा कृषि महोत्सवामध्ये आज दि. 27 मार्च 2023 रोजी  तृणधान्य, हळद या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. हरिहर कौसडीकर यांनी हळद पिकांसाठी जमिनीचे आरोग्य कसे असावे. तसेच माती नमुने काढुन पृथकरण करावे, खते देण्यात यावीत. जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब कमी झाला असुन सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यासाठी सेंद्रीय कर्बाचा जमिनी मध्ये मोठया प्रमाणात वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रल्हाद बोरगड यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावयाची व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची मात याविषयी माहिती दिली. तसेच कंपनी अंतर्गत असणाऱ्या सभासदांना होणारे फायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी जी.बी. बंटेवाड यांनी मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची उदिष्टे व त्यामध्ये समाविष्ट बाबीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात वरद कंपनीचे संचालक श्री. राठोड यांनी शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढविण्यात यावा. ड्रोन शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी कशाप्रकारे वापरावे, त्याचे फायदे, त्याची किंमत इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भविष्य काळात ड्रोनचा वापर शेतीमध्ये फवारणीसाठी मोठया प्रमाणात होईल, असे सुध्दा सांगितले. त्यांनतर पणन मंडळ, संभाजीनगर यांच्या मार्फत खरेदीदार-विक्रेता यांचे संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये नांदेड, सांगली, वसमत व हिंगोली येथील खाजगी व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला व सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या संम्मेलनामध्ये माजी आमदार गजाननराव घुगे यांनी सहभाग घेऊन शेतकरी, व्यापारी व शासकीय विभाग यांच्या अडचणीवर मार्ग काढावा, जेणेकरुन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्राचे  प्रमुख पी. पी. शेळके यांनीही  तांत्रिक बाबीविषयी मार्गदर्शन  केले.

आज सांयकाळी 5.00 वाजेपपर्यंत झालेल्या नोंदणी नुसार 1200 पेक्षा अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुध्दा 1200 पेक्षा अधिक होती, असे  युवराज शहारे, प्रकल्प संचालक, आत्मा हिंगोली यांनी सांगितले .

******

No comments: