26 March, 2023

 

नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज

                                                                                    - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 





        हिंगोली (जिमाका), दि. 26 :  नदीचे पुनरजीवन करण्यासाठी शासन, प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून आराखडा तयार करुन नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.

            कयाधू नदी नदी संवाद यात्रेचा कार्यक्रम आज हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चला जाणूया नदी राज्य समितीचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्हास्तरीय चला जाणूया नदी समितीचे सदस्य जलप्रेमी डॉ.संजय नाकाडे, सरपंच आसिफ खान पठाण, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी भोजे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी म्हणाले, चला जाणूया नदीला ही नदी जनसंवाद यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये 11 मार्च पासून शिरड शहापूर येथून सुरु झाली आहे. आज नरसी नामदेव येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. नामदेव महाराजाच्या वास्तव्याने पावन झालेल्या कयाधू नदीचे पुनरजीवन करण्यासाठी ही नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे शासन, प्रशासनासोबतच स्वंयसेवी संस्थाव लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांचे अनुभवाचा वापर करुन नदीला पुनरजिवित करण्यासाठी आराखडा तयार करावा व नदीचे पुनरजीवन करण्यासाठी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. शासनामार्फत वृक्ष लागवड, नदीचे खोलीकरण यासह वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे सांगितले.

जलप्रेमी डॉ. संजय नाकाडे यांनी नदीला जीवनदायिनी, जीवनवाहिनी  बनविण्यासाठी आपल्या हृदयात ठेवून तिचा विकास केला पाहिजे. पाच पाटील या माध्यमातून तरुणाची फौज तयार करुन नदीला वाचवण्यासाठी आराखडा तयार करावा. नदीच्या बाजूने महावृक्ष म्हणजे वटवृक्ष लावावेत. त्यामुळे हे पाणी धरुन ठेवते व जमिनीची धूप कमी होते. वन संस्कृती वाढायला लागते. यासाठी आपल्याला सहकार्य करत आहे.  त्यामुळे आपण नदीचे महत्व जाणून नदीला पुनरजिवित करण्यासाठी सर्वांनी पुढे यावेत, असे आवाहन केले. 

            विस्तार अधिकारी श्री. भोजे यांनी नदी पुरजिवित करण्यासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे. नवसंकल्पनावर आधारित काम करण्याची गरज आहे. तसेच पर्यावरण टिकवण्यासाठी हर घर नर्सरी अभियान राबवावा, असे सांगितले.

            यावेळी बोलताना जयाजी पाईकराव यांनी नदी अविरत झाली पाहिजे, नदी स्वच्छ, प्रदमुषण मुक्त, शोषणमुक्त, अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच हिंगोली संत नामदेवाचे तीर्थस्थान असलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. त्यामुळे अस्थी विसर्जन नदी ऐवजी एक जलकुंड बांधून त्यामध्ये केले तर नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच नरसी नामदेव गावातील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. गावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. या माध्यमातून संत नामदेवाच्या शिकवणीप्रमाणे वागणारे गाव असल्याची प्रतिमा निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हरिभाऊ पटेबहादूर यांनी जनसंवाद यात्रेचा उद्देश, रुपरेषा व आढावा मांडला. विलास आठवले, उपसरंपच ज्ञानेश्वर कीर्तनकार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पाणी आणि सामाजिक विषयावर शाहीर धम्मानंद इंगोले, गायिका सुनिता रणवीर, दुर्गाताई इंगोले व संच यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विकास कांबळे यांनी केले. तर ग्रामसेवक ज्ञानेश्वर मालवड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, सिध्दार्थ निनोले, दीपक सागरे, समविचारी संस्था उपस्थित होते. 

****

No comments: