31 March, 2023

 

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार !

समाज कल्याण विभागाचा महिनाभर  सामाजिक न्याय पर्व उपक्रम

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 :  एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तीं यांची जयंती असून 01 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि. 01 एपिल् 2023 ते 01 मे 2023 या  महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. समाज कल्याण आयुक्तांनी याबाबत नुकतेच निर्देश दिले आहेत.

या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सबधित जिल्हाचे पालकमंत्री, व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, दिनांक १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीम चे आयोजन करणे, राज्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यांच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, महाविद्यालय ,आश्रम शाळा ,निवासी शाळा  व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वकृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करणे,

            तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती ,मिनी ट्रॅक्टर लाभार्थी ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रतिनिधिकस्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे. समतादुत यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाथ्य नाटकेद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे ,त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव.

ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे. नवउद्योजकांसाठी उद्योजकता शिबिर आयोजित करणे. समान संधी केंद्रा मार्फत नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची माहिती जनजागृती करणे. तृतीयपंथी व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे. शासकीय वसतिगृह, निवासशाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधने. महाराष्ट्र दिन साजरा करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे. दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याचा अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे, निर्देश समाज कल्याण आयुक्त यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक निवडणुका व आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------------------------------

 चौकट :-

महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरुषांच्या जयंती एप्रिल महिन्यात आहे. या महापुरुषांनी समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी केलेले समाज कल्याणाचे कार्याची प्रेरणा घेऊन समाज कल्याण विभागाने महिनाभर  ‘ सामाजिक न्याय पर्व ’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे .

डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त ,समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे,

---------------------------------------

*****

No comments: