08 March, 2023

 

शेतकऱ्यांनी पीक कर्जाची नियमित परतफेड करुन प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा

                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

* चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये 1 लाख 36 हजार 639 शेतकऱ्यांना 931 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 257 लाभार्थ्यांना 25 कोटी 64 लाख रुपये त्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.  त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नियमित परतफेड करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकाची जिल्हास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे जिल्हा अग्रणी अधिकारी नरसींग कल्याणकर, नाबार्डचे नवसारे, आरसेटीचे संचालक धनाजी बोईले, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एस.डी. सावंत, तसेच सर्व बँकाचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दि. 28 फेब्रुवारी अखेर 1 लाख 36 हजार 639 शेतकऱ्यांना 931 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप करत 76.82 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.  पीक कर्ज वाटपात मागील पाच वर्षातील उच्चांकी कर्ज वाटप आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. पीक कर्जाचे नुतनीकरण दरवर्षी 30 जून पर्यंत केल्यास शासनामार्फत 3 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर व्याज परतावा देण्यात येतो. तसेच वेळेवर पीक कर्जाचे नुतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून शेती सलग्न व्यवसायासाठी कर्ज पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून विविध क्षेत्रासाठी 3593.41 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी शेती व्यवसायासाठी पीक कर्ज व मुदत कर्ज मिळून 1835.83 कोटी रुपये, लघु व मध्यम उद्योगासाठी 287.11 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 19.08 कोटी, गृह कर्जासाठी 350.81 कोटी व इतर कारणांसाठी 1100.58 कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकाकंडे मिळून 541.34 कोटी रुपये थकीत असून त्यामध्ये सर्वात जास्त 459.60 कोटी रुपये हा शेती व्यवसायासाठी दिलेल्या पीक कर्ज आणि मुदत कर्जाचा समावेश आहे, अशी माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.डी. सावंत यांनी दिली.

****

 

No comments: