30 March, 2023

 

कयाधू विक्री प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद

दीड दिवसांमध्ये साधारणत: 01 लाख 62 हजाराची उलाढाल

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कयाधू विक्री प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. या महोत्सवामध्ये महिलांच्या उत्पादनास अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या कयाधू जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये एकूण 62 प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, हळद, मसाले, मठ्ठा, प्रसिद्ध गावरान मेवा, दही धपाटा, शीतपेय, कटलेरी व्यवसाय, कापड व्यवसाय, विविध प्रकारच्या डाळी, मशरुम व गटांनी स्वतः तयार केलेले सौंदर्य क्रीम यासारख्या सर्व वस्तू पदार्थ हे स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत. या स्टॉलमध्ये दीड दिवसांमध्ये साधारणत: एक लाख 62 हजार 180 रुपयाची उलाढाल झालेली आहे. आज दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनासाठी आवर्जून भेट देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती श्रीमती रुपालीताई गोरेगावकर, माजी जि.प.सदस्य विठ्ठल चौतमाल व प्रतिष्ठित नागरिक जावेद राज, विलास गोरे, प्रल्हाद मुळे, आदर्श कॉलेजचे डॉ.राजाराम पिंपळपल्ले, पी.जी. माडेवार  बँक शाखा व्यवस्थापक SBI बँक बाळापूर यांनी भेट देऊन सर्व स्टॉलधारक ग्रामीण महिलांचे कौतुक केले व त्यांच्याकडून वस्तू,पदार्थ सुद्धा खरेदी केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे महिलांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.

*****

No comments: