24 March, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील एक हजार 877 अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना

वाढीव मानधनाचा लाभ

 

हिंगोली (जिमाका), दि. 24  :  राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील 01 हजार 877 अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना या वाढीव मानधनाचा लाभ होईल.

भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने 1975 साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता. आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन 11 ते 18 वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी, गरोदर महिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण, संदर्भ सेवा, पूरक पोषण आहार, पोषण आणि आरोग्य शिक्षण दिले जाते. तसेच 15 ते 45 वयोगटातील अन्य महिलांना पोषण आणि आरोग्याचे शिक्षण दिले जाते. 1 वर्षाखालील व 1 ते 3 वयोगटातील बालंकाना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा आदी सेवा पुरविल्या जातात. तर 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस महत्त्वपूर्ण असा सामाजिक दुवा म्हणून काम करतात.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली प्रकल्पांतर्गत 189, वसमत 225, कळमनुरी 107, आखाडा बाळापूर 145, औंढा नागनाथ 204 व सेनगाव 225 असे एकूण  01 हजार 95 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकाची 963 पदे मंजूर असून 922 पदे भरलेली आहेत. तर 41 पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांची 132 पदे मंजूर असून 130 पदे भरलेली आहेत, तर 02 पदे रिक्त आहेत. तसेच मदतनीसांची 963 पदे मंजूर असून 825 पदे भरलेली असून 125 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस असे एकूण 2058 पदे मंजूर असून 1 हजार 877 पदे भरलेली आहेत. तर 181 पदे रिक्त आहेत. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यरत 1 हजार 877 अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे.

यापूर्वी अंगणवाडी सेविकांना 8 हजार 325 रुपये मानधन होते. ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 10 हजार रुपये झाले आहे. मिनी अंगणवाडी सेविकांना 5 हजार 975 रुपयावरुन 7 हजार 200 रुपये, मदतनीसांना 4 हजार 425 वरुन 5 हजार 500 रुपये मानधन झाले आहे. तसेच अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे भरण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 181 रिक्त पदे भरण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

*****

No comments: