29 March, 2023

 

कृषि महोत्सवात चौथ्या दिवशी विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

व जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचा समारोप

·         पाककला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या महिलांना बक्षीसाचे वितरण







 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा कृषि महोत्सवामध्ये दि. 28 मार्च, 2023 रोजी चर्चासत्र व परिसंवादात करवंद लागवड तंत्रज्ञान, विक्री व्यवस्था व त्यावर करावयाची प्रक्रिया याबाबत वसमत तालुक्यातील लिंगी येथील पग्रतशील शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नांदेड येथील महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक यांनी त्यांच्याकडून उत्पादित होणारी खते, औषधी  व कृषि औजारे याचे विपणन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. साईनाथ खरात यांनी सेंद्रीय/नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. त्याबाबत करावयाच्या उपायोजनाचे तंत्रज्ञानाविषयी उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले.

जालना येथील सिताबाई मोहिते यांनी बचतगटांनी फळ प्रक्रिया व इतर उद्योगाचे विक्री व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून  यामध्ये ग्राहका सोबत बोलतांना डोक शांत ठेवुन बोलणे, गोड भाषेत संभाषण करणे तसेच ग्राहकासोबत विश्वासार्हता निर्माण करणे ही त्रिसूत्री  आहे. तसेच महिला या शब्दाचे अर्थ सांगताना म- म्हणजे मायाळु, हि- हिम्मत, ला- लाजाळू हे तीन गुण महिलांमध्ये असतात. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजारात किंवा इतरत्र गटामार्फत निर्मित केलेल्या मालाची विक्री करु शकतात आणि त्यामुळे बाजारात उदभवलेल्या परिस्थितीचा सामना करु शकतात. असे उपस्थित बचतगटांच्या महिलांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच बचत गट सक्षम कसे करावयाचे याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर  श्री. बोरगड यांनी नॅशनल कमोडीटी डेरीव्हिटीज ॲन्ड एक्सचेंज यांचे मार्फत खरेदी-विक्रीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. नितीन चव्हाण व्यवस्थापकीय संचालक, गोदाफार्म कळमनुरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कशी करावी व शेतकरी उत्पादक कंपनीला येणाऱ्या अडचणीला मात करुन कंपनी सक्षम कशाप्रकारे करावी  याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कंपनीकडे असलेल्या मर्यादित मनुष्यबळामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव, वजन काट्याचे कॅलिब्रेशन इत्यादी सुविधा शेतकऱ्यांना कशाप्रमारे उपलब्ध करुन दिल्या जातात याबाबत माहिती दिली.

            तदनंतर उगम ग्राम संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने लोकगीताद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना प्रबोधन केले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 26 महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी महिलांनी ज्वारी व बाजरी पासून तयार केलेले विविध पदार्थ जसे, ज्वारीचा केक, अंबिल, आप्पे, पापड्या, खिचडी, घुगऱ्या, उपमा, बाजरीचे शंकरपाळे, हलवा, लाडु, धपाटे, उसळ इत्यादी पदार्थ आकर्षक रित्या प्रदर्शित केले. या स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणुन तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे, गोळेगांव  येथील अन्न तंत्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शितल पवार यांनी जबाबदारी पार पाडली.  परिक्षकांनी केलेल्या  मुल्यमापनानुसार वनिता पंतगे यांनी ज्वारी पासून केलेल्या केकला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.  द्वितीय क्रमांक छाया ठोंबरे यांनी केलेल्या बाजरीचे लाडु या पदार्थाला देण्यात आला. तर तृतीय क्रमांक शिल्पा जंपनगिरे यांनी केलेल्या बाजरीचा हलवा या पदार्थाला देण्यात आला. उत्तेजनार्थ क्रमांक अर्चना सोळंके व माधुरी बोरबळे यांना विभागुन देण्यात आला. स्पर्धेमध्ये विजेत्यांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे व नोडल अधिकारी पौष्टिक तृणधान्य कृषि उपसंचालक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  पाककला स्पर्धेद्वारे स्वत: बनविलेल्या पदार्थाना व्यासपीठ मिळवुन दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्वारी व बाजरी पासुन बनविलेल्या पदार्थांची  विविधता, आकर्षक प्रदर्शन व चव इत्यादीद्वारे उपस्थितांनी स्पर्धेचा आस्वाद घेतला.

            जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता व समारोप कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे व कृषि प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या स्टॉल धारकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवराज शहारे, प्रकल्प संचालक आत्मा, हिंगोली यांनी केले. यामध्ये कृषि महोत्सव 2023 यशस्वी  करण्यासाठी  हातभार लावणाऱ्या सर्व  अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार बंधूचे आभार मानले. महोत्सवाचा केंद्रबिंदु असलेल्या शेतकऱ्यांनी व हिंगोली नगरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही  आभार मानन्यात आले. अशा प्रकारे जिल्हा कृषि महोत्सव-2023 ची सांगता करण्यात आली.

*****

No comments: