27 March, 2023

 

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसभर वीज उपलब्ध

 

ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जातात. त्याप्रमाणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऊर्जेची गरजही आता मूलभूत गरज बनली आहे. पारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु आपल्याकडे अपारंपरिक ऊर्जास्रोत देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा वापर होणे ही काळाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस ऊर्जेची गरज वाढत असल्याने या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे आज अनिवार्य ठरत आहे. ऊर्जेचा पुरवठा आणि मागणी यात समन्वय साधने गरजेचे आहे. आजच्या काळात ऊर्जेशिवाय कोणतीही गोष्ट अशक्य असून, राज्याला भारनियमनमुक्त करण्यासाठी इतर ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे ही आजची गरज बनली आहे. राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 30 टक्के ऊर्जेचा वापर केला जातो. राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यादृष्टीने शासनस्तरावर नेहमी प्रयत्न होत असतात. शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलात आणली आहे.

राज्य शासनाने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत 1 लाख सौर कृषी वाहिनी देण्याचे उदिष्ट ठेवले आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत महावितरणने 4 हजार 855 शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीचा लाभ दिला आहे.  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना शेतीकरिता दिवसभर वीज उपलब्ध होत आहे. तसेच महावितरणकडे पारंपरिक वीज जोडणीसाठी ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यांना सौर कृषी वाहिनी जोडणीचा पर्याय महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

राज्यात सौरऊर्जा मुबलक प्रमाणात  उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर केल्यास विजेची वाढती मागणी पूर्ण होऊन आपण स्वयंपूर्ण होत आहोत. या योजनेमुळे शेतकऱ्याला दिवसभर वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरत असून, यामुळे पर्यावरण समृद्धीलाही मदत होत आहे. सौरऊर्जेचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती सुजलाम-सुफलाम करण्याचा शासनाचा प्रयत्न कृषी विकासाला नवे आयाम देणारा ठरत आहे.

 

                                                                                    संकलन :  जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

****

No comments: