17 March, 2023

 

दहावी व बारावी प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना

क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत दि. 20 डिसेंबर, 2018 रोजी शासन निर्णय झालेला आहे. त्या अनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणेव्दारा आयोजित शालेय जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त वा सहभाग नोंदविलेल्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव प्राचार्य / मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह शारीरिक शिक्षक यांच्यामार्फतच दि. 5 एप्रिल,2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर कुठल्याही परिस्थितीत प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत.

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळण्यासाठी दि. 20 डिसेंबर, 2018 मधील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी आपला परिपूर्ण अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 05 एप्रिल, 2023 पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावा. शासन निर्णयानुसार अहवाल सादर न केल्यास खेळाडूस क्रीडा सवलतीचे गुण मिळण्याबाबतच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खेळ संघटनेवर राहील. त्यामुळे आवश्यक कागदपत्रामुळे क्रीडा गुण सवलतीपासून आपल्या राज्य एकविध खेळ संघटनाव्दारा आयोजित स्पर्धामधील सहभागी खेळाडू वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत यादी प्राप्त झाल्यानंतरच सदर प्रस्तावांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शिफारस करण्यात येईल. जिल्हा व विभागीय स्पर्धेतील खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील सर्व खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळण्यासाठी विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

No comments: