30 March, 2023

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा

जिल्ह्यातील 1 लाख 95 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीकविमा योजनेत देखील सहभागी होता येणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीत 6 हजार रुपयांची भर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य शासनाचे दरवर्षी 12 हजार रुपये  सन्मान निधीमध्ये ही रक्कम मिळणार आहे. या योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासूनच लाभ घेत असतील, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेसाठी राज्य शासनाने 6 हजार 900 कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे.

                हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील 34 हजार 882 शेतकरी तर वसमत तालुक्यातील 43 हजार 03 शेतकरी, कळमनुरी तालुक्यातील 38 हजार 860 शेतकरी आणि सेनगाव तालुक्यातील 44 हजार 663 शेतकरी असे जिल्ह्यातील पात्र एकूण 1 लाख 95 हजार 833 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

                या योजनेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दरवर्षी केंद्र शासन 117 कोटी 49 लाख 98 हजार तर राज्य शासन 117 कोटी 49 लाख 98 हजार असे एकूण 234 कोटी 99 लाख 96 हजार एवढा निधी प्राप्त होणार आहे.

हिंगोली तालुक्यातील मौजे  भोगाव येथील सय्यद गुलाब सय्यद सरवर हे शेतकरी म्हणतात की, राज्य शासनाने  प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे 6 हजार रुपये मिळत होते. आता त्यात राज्य सरकारने देखील 6 हजार देणार असल्यामुळे एकूण 12 हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत. केंद्र शासनाची 6 हजार रुपये ही रक्कम तोकडी वाटत होती. परंतु, राज्य शासनाने त्यात 6 हजार रुपयांची भर घातल्याने नक्कीच या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

तसेच हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील गोवर्धन नारायण भालेराव या शेतकऱ्याने सांगितले की, केंद्र सरकारपाठोपाठ  राज्य शासनाने घोषणा केली असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतूनही तितकीच रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात ही रक्क्म खते, बियाणे, किटकनाशके विकत घेण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. शेतकऱ्यांना या रकमेतून पेरणीपूर्व हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने घोषणा केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आम्ही शेतकरी  राज्य शासनाचे आभार मानावे तितके कमीच  असल्याचे सांगितले .     

याशिवाय शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम देखील भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना 1 रुपया भरुन योजनेत सहभागी  होता येणार आहे. त्यासाठी 3 हजार 312 कोटी  रुपयांची  तरतूद करण्यात  येणार आहे. 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

No comments: