08 March, 2023

 

महिलांनी वेळेचा योग्य वापर करुन आपल्या मुलांच्या आर्थिक, शैक्षणिक दर्जा

सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे : उषा पाटील

 




            हिंगोली (जिमाका), दि. 08 :  कुटुंबात महिलेले मोठे स्थान असून महिलांनी वेळेचा योग्य वापर करुन आपल्या मुलांच्या आर्थिक, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यातूनच आपल्या कुटुंबाचे यश आहे, असे प्रतिपादन निर्भय नारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा पाटील यांनी केले.  

महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल रामाकृष्णा इंटरनॅशनल येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उषा पाटील बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.डी. सावंत, उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजी पाईकराव, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. आपल्या हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. कुटुंब घडला तर देश घडेल त्यामुळे महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत. महिलांनी  बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय उभारुन आपले कुटुंब सक्षम करावेत. आपणाला ज्या क्षेत्रात जावयाचे त्याविषयीची पुस्तके वाचली पाहिजेत. संविधान वाचले पाहिजेत. कायद्याची माहिती जाणून घेतली पाहिजे. त्याशिवाय कायदे कळणार नाहीत व आपले हक्क, अधिकारी काय आहेत याची माहिती होणार नाही. त्यामुळे महिलांनी पुस्तकाचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी महिलांसाठीची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या मुलीचे कमी वयात लग्न न करता त्यांना शिकविले पाहिजे. पुढची पिढी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी समानतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. देशाचा अर्थसंकल्प जसा सांभाळला जातो तसा घराचा अर्थसंकल्प स्त्रीने सांभाळला तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. डी. सावंत यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. तर अध्यक्षीय समारोपात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी महिला व बालविकास यांच्यामार्फत महिलांसाठी व अनाथ बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची भूमिका विशद करुन महामंळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली.

आजच्या या नारी सन्मान मेळाव्यात जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला, ग्रामसंस्था, बचत गट, सी आर पी, सहयोगिनी, लेखापाल, व्यवस्थापक यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नपूर्तीचे व्यवस्थापक सुनील चव्हाणयांनी केले. आभार प्रदर्शन महिला आर्थिक विकास महामंडळाचे लेखाधिकारी संकेत महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला कार्यक्षेत्रातील 400 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. *****

No comments: