10 March, 2023

 


चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत

                            - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

·         अभियानांतर्गत जनसंवाद यात्रेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून   शुभारंभ.

·         जनसंवाद यात्रेद्वारे कयाधू व आसना नदीक्षेत्रातील गावात लोकशिक्षण व जनजागृती करण्यात येणार.

·         जनसंवाद यात्रेचे दि. 11 मार्च ते 29 मार्च 2023 या कालावधीत आयोजन.

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील नद्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना या नद्यांचा समावेश करण्यात आला असून  या नदीक्षेत्रातील गावात नद्यांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी लोकशिक्षण व जनजागृती करण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ‘चला जाणुया नदीला अभियानाचे’ अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, वनविभागाच्या श्रीमती मिनाक्षी पवार, अशासकीय सदस्य जयाजी पाईकराव, डॉ. संजय नाकाडे, डॉ. किशन लखमावार यांच्यासह संबंधित विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदीक्षेत्रातील गावात लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी दि. 11 ते 29 मार्च या कालावधीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 17 ठिकाणी ही जनसंवाद यात्रा  मुक्कामी राहणार असून या जनसंवाद यात्रेनिमित्त  गावा-गावात चला जाणूया नदीला या अभियानाची ओळख, नदीचे होणारे प्रदूषण थांबविणे,  स्वच्छता अभियान, गावातील  गावकऱ्यांची भूमिका, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजलस्तर उंचावणे, नदी-समाज व शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे आदी बाबतीत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांनी परस्पर समन्वयाने कामे करुन नदीचे संरक्षण व संवर्धन हे मुख्य ध्येय ठेवावे.  यामध्ये सर्व लोकांनी तसेच शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकात उगम ग्रामीण विकास संस्थेचे सुशांत पाईकराव यांनी  पॉवर पॉईंट प्रझेन्टेशनद्वारे या जनसंवाद यात्रेनिमित्त लोकसहभागातून नद्याचे संरक्षण व संवर्धनाबाबतीत आराखडे तयार करण्यात येणार असून त्यांना या जनसंवाद यात्रेद्वारे पाणी आराखडा संकल्पना,  माथा ते पायथा संकल्पना, हरित गाव जलसमृध्द गाव संकल्पना, पाण्याचा ताळेबंद संकल्पना, सध्याची पाणी समस्या इत्यादी विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत दि. 11 मार्च पासून होणाऱ्या जनसंवाद यात्रेस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध विभाग प्रमुखांची व नागरिकांची उपस्थिती होती.

*****

No comments: