13 March, 2023

 

वसमत तालुक्यातील महागाव येथे पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने

बाल विवाह थांबविण्यास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महागाव येथे दि. 9 मार्च, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याची माहिती पोलोस प्रशासनास मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी (पो.स्टे कुरुंदा), बिट जमादार प्रकाश टारफे यांनी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार कायदा तथा परिविक्षा अधिकारी अँड.अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे यांनी विवाहस्थळी भेट देऊन कुरुंदा पोलीस स्टेशन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील नियोजित बाल विवाह थांबविण्यात यश आले आहे.

या विवाहस्थळी उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बालिकेस बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले.

तसेच ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेऊन गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी चर्चा करण्यात आली व ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक- युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात आली.

या वेळी गावातील सरपंच वंदना नागनाथ खुळखुडे, ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पंकज गंगाराम बर्गे, अंगणवाडी मदतनीस रेखा साहेबराव कुऱ्हे, आशा वर्कर प्रतिभा केशवराव बागल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

****

No comments: