12 April, 2024

निवडणूक यंत्रणेकडून मतदान केंद्रांमधील सोयीसुविधांची तपासणी

हिंगोली (जिमाका), दि. 12 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार‍ हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदानाच्या दिवशी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री आज निवडणूक यंत्रणेकडून करून घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या नेतृत्वात विविध पथकांद्वारे आज जिल्ह्यातील जवळपास 100 मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची तपासणी करण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संदीप सोनटक्के यांच्यासह विविध अधिकारी –कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा परिसरातील विविध शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगासाठी व्हिलचेअर, रँम्प, पिण्याचे शुद्ध, स्वच्छता गृहे, विद्युत, मतदारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची या पथकांनी पाहणी केली. यामध्ये काही मतदान केंद्रांवर देण्यात येणाऱ्या किमान सोयीसुविधा पुढील दोन दिवसांमध्ये उपलब्घ करून देण्याच्या सूचना संबंधित मतदान केंद्र प्रमुख, शिक्षक, ग्रामसेवकांना दिल्या असून, पुन्हा दोन दिवसांनी या मतदान केंद्रांना भेटी देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीश्री. शेंगुलवार यांनी सांगितले. *****

No comments: