16 June, 2022

 

पिक कर्जाबाबत येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी

तहसील कार्यालयात कक्ष स्थापन

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 16 : खरीप हंगाम सन 2022 साठी जिल्ह्यातील शेतकरी विविध बँकेकडून पिक कर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. शेतकऱ्यांना बँकेकडून पिक कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात एक कक्ष स्थापन करण्यात यावा. त्यामध्ये तहसील कार्यालयातील अधिनस्त कर्मचारी, बँकेचा एक जबाबदार कर्मचारी व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाचा एक कर्मचारी यांचा समावेश करण्यात यावा व प्राप्त अर्जाच्या नोंदी घेण्यात यावेत.

               या कक्षामध्ये शेतकऱ्यांना बँकेकडून पिक कर्ज मिळण्यासाठीच्या अडचणीबाबतचे अर्ज प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार व शुक्रवार या दिवशी स्वीकारण्यात यावेत. तर मंगळवारी  प्राप्त झालेल्या अर्जावर शुक्रवार पर्यंत कार्यवाही करावी. तसेच शुक्रवारी प्राप्त होणाऱ्या अर्जावर मंगळवार पर्यंत कार्यवाही करावी. शक्य असल्यास तत्पूर्वी तत्परतेने निराकरण करावेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना बँकेकडून वेळेत पिक कर्ज मिळेल याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना व सर्व संबंधित यंत्रणेला पत्राद्वारे दिले आहेत.

****

No comments: