15 June, 2022

 

प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली सौरपंपासाठी शेतकऱ्यांची फसवणूक

महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 :  प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

            महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल अॅप तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोट्या संकेतस्थळासह मोबाईल अॅपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनाला बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर, अॅपवर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरु नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

            'प्रधानमंत्री कुसुम योजना' शासनाच्या महाऊर्जा  विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी. अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, सिटी सर्व्हे न. 11149, शॉप न.305, तिसरा मजला, साई ट्रेड सेंटर, रेल्वेस्टेशन रोड,औरंगाबाद फोन. 0240 -2653595 ई-मेल :- domedaabad@mahaurja.com  येथे संपर्क साधावा, असे आवाहनही  विकास रोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*******

No comments: