20 September, 2021

 

जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20 :  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात  राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक 21 सप्टेंबर 2021  रोजी तर माँपअप दिन दिनांक  28 सप्टेंबर 2021 रोजी राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेमध्ये वय वर्षे 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना अल्बेंडेझाँलची गोळी देण्यात येणार आहे, 1 ते 19 वर्षे वयोगटामध्ये किमान 28 टक्के बालकामध्ये आतड्याचा कृमीदोष  हा मातीमधून प्रसारित होतो. याचे मुख्य कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे  कारण आहे. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटणे हे यांचे कारण ठरते या सर्व गोष्टीचा अभ्यास करुन शासनाने 1 वर्षे ते 19 वर्षे वयोगटातील शाळेतील, महाविद्यालय, अंगणवाडी, शाळाबाह्य लाभार्थी या सर्व लाभार्थींना गोळी देऊन त्यांचे आरोग्य हे निरोगी व सदृढ ठेवणे, लाभार्थाची पोषण स्थिती व जिवनाचा दर्जा  उंचावणे हे या राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा हेतू आहे.

या मोहिमेमध्ये ग्रामीण भागातील एकूण 2 लाख 61 हजार 96  तर शहरी भागातील 86 हजार 973 असे एकुण 3 लाख 48 हजार 69 लाभार्थांना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. जिल्ह्यात अंगणवाडी-  1192, शाळा- 1290 आहे. या सर्व ठिकाणी लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. शाळेतील 6 वर्षे ते 19 वर्षे वयोगटातील  एकूण 2 लाख 49 हजार 632 लाभार्थी, शाळाबाह्य एकूण  7 हजार 572 लाभार्थी, अंगणवाडी मधील 1 ते 2 वर्षे वयोगटातील एकूण 23 हजार 11 लाभार्थी, 2 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 67 हजार 854 असे एकूण 90 हजार 865 लाभार्थाना जिल्ह्यात दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. यामध्ये राहिलेल्या लाभार्थांना माँपअप दिनी दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही मोहिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी दिली आहे.

21 सप्टेंबर 2021 रोजी जंतनाशक गोळी घ्यावयाची राहून गेली असेल त्यांनी दि. 28 सप्टेंबर  2021 रोजी शासकीय आरोग्य संस्था, शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष 1 ते 19) जंतनाशक गोळी खाऊ घालावी.

जंतनाशक गोळी- एल्बेंडेझॉल 400 मि.ग्रॅम  ही गोळी वय 1 ते 2 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना  अर्धीगोळी म्हणजे (200 मि ग्रॅम) क्रश करुन पाण्यात विरघळून द्यावी. वय 2 ते 3 वर्ष असलेल्या लाभार्थ्यांना एक गोळी (400 मि ग्रॅम) क्रश करुन पाण्यात विरघळून द्यावी. वय :- 3 ते 19 वर्ष असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक गोळी (400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालावी. 

प्रत्येक शासकीय आरोग्य संस्था , शाळा, अंगणवाडीत दि 21 सप्टेंबर, 2021 रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे. शाळाबाह्य मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळ्या देण्यात येणार आहेत.

गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

  • आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे. रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
  • प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
  • आजारी बालकांना गोळी देऊ नये. 
  • गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडी / शाळेमध्ये निरीक्षणासाठी  थांबवून ठेवावे.
  • गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे. त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 
  • ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे, त्या मुलांना गोळी खाल्ल्यानंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही, अशी माहिती  जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.

*****

No comments: